रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडून ‘जन सुराज’ पक्षाची स्थापना

0
6

पाटण्यातील सभेत घोषणा; बिहारच्या जनतेला आता नव्या राजकीय पक्षाचा पर्याय; बिहार विधानसभेची आगामी पोटनिवडणूक लढवणार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता राजकारणात धडाक्यात प्रवेश केला आहे. पाटणा येथे बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष मोठा करिश्मा करुन दाखवेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनोज भारती हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात.

प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाची घोषणा पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर केली. यानंतर त्यांनी लोकांना संबोधित केले. मागच्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरू होती. निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतरित्या पक्षाचा दर्जा दिला आहे. हे नाव योग्य आहे ना? असेही प्रशांत किशोर यांनी जमलेल्या गर्दीला विचारले.

पक्षाच्या स्थापनेच्या आधी प्रशांत किशोर यांनी जी मोहीम चालवली त्यात त्यांनी चंपारण येथून राज्यात सुमारे 3 हजार किलोमीटरची पदयात्रा केली. ही पदयात्रा दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती. 2 ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी पक्षाची घोषणा केली. बिहारच्या जनतेला आता नव्या राजकीय पक्षाचा पर्याय या निमित्ताने निर्माण झाला आहे.

एससी समुदायातून आलेल्या मनोज भारती यांना जन सुराजचे पहिले कार्यवाहक अध्यक्ष बनवण्यात आले आहे. मनोज भारती यांची अध्यक्षपदी निवड दलित समाजातील असल्याने नव्हे, तर ती सक्षम आणि दलित समाजातील असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. 4 देशांचे राजदूत राहिलेले मनोज भारती मूळचे मधुबनीचे आहेत. नावाची घोषणा होताच त्यांनी हात जोडून अभिवादन केले. माजी आयएफएस अधिकारी मनोज भारती यांचा कार्यकाळ मार्चपर्यंत असेल. यानंतर अध्यक्ष निवडीसाठी आणखी एक निवडणूक होणार आहे.

जन सुराज पक्षाचे संविधान देखील निश्चित करण्यात आले आहे. अध्यक्षाचा कार्यकाळ 1 वर्षांचा असेल. लीडरशिप काउंसलिंगचा कार्यकाळ हा 2 वर्षांचा असणार आहे. पक्षाच्या संविधानात राईट टू रिकॉल असेल. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जर भ्रष्टाचार केला तर अडीच वर्षात प्रतिनिधीला परत बोलावले जाईल.

जन सुराज पक्ष 4 जागांवर पोटनिवडणूक लढवणार

प्रशांत किशोर यांनी 2025 पर्यंत आपला पक्ष थांबणार नसल्याचे जाहीर केले. बिहारमधील इतर पक्षांना 2024 मध्येच हिशोब दिला जाईल. नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार विधानसभेच्या 4 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. जन सुराज पक्ष रामगढ, तारारी, बेलागंज आणि इमामगंज या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.