रणजी : गोव्याने पराभव टाळला

0
99

डावखुरा फिरकीपटू सुमीत रुईकर याने सामन्यात घेतलेल्या १० बळींनंतरही छत्तीसगडला गोव्याविरुद्धचा रणजी सामना जिंकता आला नाही. पहिल्या डावात १८१ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर छत्तीसगडने गोव्यावर फॉलोऑन लादला. शदाब जकाती व अमित यादव यांनी ८० चेंडू खेळून काढताना गोव्याचा पराभव टाळला.

छत्त्तीसगडच्या पहिल्या डावातील ४५८ धावांना उत्तर देताना तिसर्‍या दिवसअखेर गोव्याने ४ बाद २२३ अशी सुस्थिती गाठली होती. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी गोव्याने आपले उर्वरित ६ गडी ५४ धावांत गमावले. चार दिवसीय सामन्यात फॉलोऑनचे अंतर १५० धावांचे असल्याने छत्तीसगडने गोव्यावर फॉलोऑन लादला.

पहिल्या डावाप्रमाणे दुसर्‍या डावातही सुमिरन आमोणकरने अर्धशतक लगावताना ५३ धावा केल्या. त्याने दर्शन मिसाळ (२१) याच्यासह चौथ्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. सौरभ बांदेकर यानेदेखील २५ धावांचे योगदान दिले. शदाब जकाती २२ व अमित यादव १२ धावा करून नाबाद राहिले. पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर छत्तीसगडने ३ गुणांची कमाई केली. गोव्याला एका गुणावर समाधान मानावे लागले. गोव्याचा पुढील सामना धरमशाला येथे १४ ऑक्टोबरपासून हिमाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे.

धावफलक
छत्तीसगड पहिला डाव ः सर्वबाद ४५८
गोवा पहिला डाव ः सर्वबाद २७७
गोवा दुसरा डाव (फॉलोऑन) ः सुमिरन आमोणकर झे. कैफ गो. रुईकर ५३, स्वप्निल अस्नोडकर झे. मनोज सिंग गो. शाहनवाज १, सगुण कामत पायचीत गो. रुईकर १२, रिगन पिंटो पायचीत गो. रुईकर ४, दर्शन मिसाळ झे. पंकज राव गो. रुईकर २१, सौरभ बांदेकर झे. कैफ गो. जतीन सक्सेना २५, समर दुभाषी झे. मनोज सिंग. गो. रुईकर ८, शदाब जकाती नाबाद २२, अमित यादव नाबाद १२, अवांतर १२, एकूण ६७ षटकांत ७ बाद १७०
गोलंदाजी ः शाहनवाज हुसेन १२-३-२९-१, अभिमन्यू चौहान ५-१-१४-०, सुमीत रुईकर २१-७-२९-५, पंकज राव ४-२-३-०, जतीन सक्सेना १९-४-६८-१, आशुतोष सिंग ४-१-१३-०, साहील गुप्ता २-०-८-०