रणजीतच्या हत्येप्रकरणी राम रहीम निर्दोष

0
16

>> हरयाणा उच्च न्यायालयाचा निर्णय; अन्य चौघांचीही निर्दोष मुक्तता

रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्यासह 5 जणांची काल उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. रणजीत सिंह हा ‘डेरा’चा माजी व्यवस्थापक होता. दरम्यान, राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात अन्य एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे.

ही घटना 22 वर्षे जुनी असून, तब्बल 19 वर्षांनंतर सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते.
10 जुलै 2002 रोजी कुरुक्षेत्र येथील रहिवासी रणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात गुरमीत राम रहिमकडून महिलांचे लैंगिक शोषण कसे केले जात आहे, हे सांगणारे पत्र प्रसारित करण्यात रणजीत सिंह यांच्या कथित भूमिकेमुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिस तपासावर असमाधानी रणजित सिंह यांचा मुलगा जगसीर सिंह याने जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. 2021 साली केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने गुरमीत राम रहीम आणि इतर चौर आरोपींना रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

रणजीतने आपल्या बहिणीला साध्वींच्या लैंगिक शोषणाबाबत निनावी पत्र लिहायला लावल्याचा संशय डेराला असल्याचा दावा सीबीआयने केला होता. हे पत्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. हे पत्र नंतर सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर 21 नोव्हेंबर 2002 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.