झारखंडमध्ये स्पष्ट बहुमतात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत रघुवर दास यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी सर्वांनुमते निवड झाली आहे. त्यामुळे दास यांच्या रूपाने बिगर आदिवासी चेहर्याला झारखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार हे निश्चित झाले आहे. काल झालेल्या बैठकीला जे. पी नड्डा, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासहीत माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा उपस्थित होते.दास लवकरच झारखंडच्या राज्यपालांची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. रघुवर दास जमशेदपूर-पूर्व मतदार संघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. अर्जुन मुंडा यांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी दास यांचेच नाव आघाडीवर होते.
झारखंडची ही दहावी विधानसभा असून पाचव्यावेळी भाजपचे सरकार या राज्यात शपथग्रहण करणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८१ सदस्यीय सदनात भाजपा आणि आजसूने ४२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे.