रक्त शुद्धीकरणाची सोय आता राज्यात

0
19

>> गोवा वैद्यकीय महाविद्यालयात खास यंत्र उपलब्ध

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये थेरोपॅटिक प्लाझ्मा एक्सचेंज थेरपीची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांना रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी यापुढे परराज्यात जावे लागणार नाही. या उपचार पद्धतीसाठी अंदाजे ४० लाख रुपये खर्चून खास यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

गोमेकॉमध्ये थेरोपॅटिक प्लाझ्मा थेरपीची सोय उपलब्ध नसल्याने राज्यातील रुग्णांना या थेरपीसाठी मेडिक्लेेम योजनेअर्तंगत परराज्यातील हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागत होते. आता नवीन यंत्र उपलब्ध करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांच्या रक्ताचे शुद्धीकरण करण्याची व्यवस्था आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

गोमेकॉमध्ये या उपचार पद्धतीद्वारे एका रुग्णावर उपचार करण्यात आले असून, त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गरज भासल्यास आणखी एकदा थेरपी केली जाणार आहे. गोमेकॉमध्ये कोविड महामारीमुळे प्लाझ्मा थेरपीसाठी मशीन आणण्यात आले होते. त्या मशीनचा या थेरपीसाठी उपयोग केला जात आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला गोमेकॉच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. टेरेझा परेरा, गोमेकॉच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. मल्ल्या याची उपस्थिती होती.