रंग पत्रांचे…

0
462
  • सौ. प्राजक्ता प्र. गावकर
    (नगरगाव-वाळपई)

पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला तर पत्र म्हणजे जीव की प्राण असतो.
आपला जीव देशाच्या रक्षणासाठी हातात घेतलेल्या जवानाला केवळ आपल्या आईवडलांच्या किंवा बायकोच्या आलेल्या एका पत्रानेसुद्धा किती उभारी येते.

‘‘जा जा पत्रा, मार भरारी जाऊन बैस माझ्या प्रिय व्यक्तीच्या हातावरी
आठवण येते क्षणोक्षणी पण तीच आहे दूर ठिकाणी’’.
आपल्या प्रिय व्यक्तीला स्वतःच्या मनातल्या भावना सांगायचा एक उत्तम प्रकार म्हणजे पत्रलेखन. घरापासून दूर शिक्षणासाठी राहिलेल्या आपल्या मुलानं आईवडलांना लिहिलेलं पत्र, नोकरीसाठी आपल्या खेड्यापासून दूर शहरात राहिलेल्या घरातील कर्त्या मुलाने आपल्या म्हातार्‍या आईवडलांच्या काळजीने लिहिलेलं पत्र किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना लिहिलेलं पत्र असू दे, ते एक मनातले गोड किंवा तिखट, आंबट, कडू गुपित बाहेर काढणारे प्रभावी अस्त्र.
पूर्वीच्या काळी आत्तासारखे फोन नव्हते. त्यामुळे सर्व लोक पोस्टमनची वाट आतुरतेने पाहत असत. टपाल खात्यात नोकरी करणार्‍याला विशेष करून मोठा मान असे.

माझ्या माहेरीपण दुपारच्या वेळी पोस्टमनची वाट पाहत लोक आपापल्या दारात बसत. पोस्टमन आला रे आला की लोक विचारत, ‘‘काय अण्णा, आज तरी आलीय का चिठ्ठी-चपाटी?’’
पोस्टमन म्हणायचा, ‘‘आली असती तर थांबलो असतो ना घडीभर’’.
तोच पोस्टमन जरासा पुढे जाऊन एखाद्याच्या दारात उभा राहिला की मग बाकीच्यांना त्या घरातल्या लोकांचा हेवा वाटायचा. का? त्यांना वाटायचे.. आम्हाला कुणाचंच पत्र येत नाही आणि यांना मात्र पत्र आलं.
कुणीतरी एकटा पत्र आलेल्या घरात विचारी, ‘‘काय तात्या? कुणाचं पत्र आलंय?’’ तात्या मग छाती फुगवून सांगत, ‘‘लेकाचं पत्र हाय माझ्या.’’ लेकाचं पत्र पाहून तात्यांच्या गगनात आनंद मावेनासा होई.

आपल्या मुलीला किंवा मुलाला पत्र लिहून ते पोस्टात टाकायला जाताना हवेत तरंगत गेल्यासारखे वाटते. वाटेत कुणीही विचारले, ‘‘काय अप्पा, इकडे कुठे गेलेला?’’ तर अप्पांचा ऊर भरून येऊन अप्पा म्हणतात, ‘‘लेकरं शिकायला घरापासून दूर राहतात रे बाबा. त्यांची ख्याली-खुशाली विचारायला पत्र पाठवलेय.’’
विचारणारा मनात म्हणतो, ‘‘अप्पांनी आपल्या लेकरांना पत्र पाठवले. कारण त्यांची लेकरं दुसरीकडे राहतात. आमची चिल्ली-पिल्ली तर इथेच मराठी शाळेत शिकतात. मग आम्ही कुणाला पत्र पाठवणार?… अन् मग आम्हाला तरी कुणाचे पत्र येणार?? अप्पा गेलेल्या वाटेकडे वळून वळून पाहत. तो जातो.

असेच एकदा शेजारच्या महेशकडे गावातलंच एक वृद्ध जोडपं आलं. नवरा-बायको दोघंही अशिक्षित होती. शिवाय वय झाल्यामुळे त्यांना नीट दिसतही नव्हते. त्यांच्या शहरात राहणार्‍या मुलाने पत्र पाठवले होते. ते पत्र वाचून दाखव म्हणून सांगायला ते जोडपे महेशकडे आले होते.
महेशने त्यांना पत्र वाचून दाखवले, तो म्हणाला, ‘‘काका, काकू काय बी काळजी करू नका. रमेश दिवाळीच्या सुट्टीत इथे येणार. मग मुलगी बघुया… असे म्हणतोय’’.
त्याला तुमची खूप काळजी वाटतेय. एकदा लग्न झालं की घरात वावरणारं माणूस येणार. ते काळजी घेणार तुमची. आता जरा दिवाळीपर्यंत कळ काढा. हे पत्र ऐकायला शेजारची माणसंसुद्धा जमली होती. त्यातलाच एकटा म्हणाला, ‘बघा बघा, काकांचा रमेश कसा त्यांची काळजी घेतोय. नाहीतर आमची पोरं… चार वाटेनं गेली, आपलं घर सोडून बायकोच्या तालावर नाचत. आम्हाला दोघा म्हातार्‍यांना बघायला कोण कुत्रं बी नाय. म्हातार्‍या आईबाबांचं काय होणार… असं जरासुद्धा त्यांच्या मनात आलं नसणार. दुर्दैव आमचं. चार पोरं असून बी निपुत्रिकच आम्ही.’
बघा पत्राचे चमत्कार, आमच्या लहानपणी फोन नव्हते. सर्व नातलगांना पत्र लिहूनच एकमेकांची ख्यालीखुशाली समजायची. त्यात एक बरं असायचं की जास्त बोलण्याने फोनमधील पैसे संपू शकतात किंवा बॅटरी संपू शकते. फोन परत परत चार्ज करावा लागतो. ती भीती इथे नसते. आणायचं अंतर्देशीय पत्र आणि मनातलं सारं सविस्तर लिहून काढायचं. व्यवस्थित बंद करून पोस्टपेटीत टाकायचं. एकदमच सोपं.

पत्राचे रंग खूप असतात. एखादा प्रियकर जेव्हा आपल्या प्रेयसीला पत्र पाठवतो, तेव्हा तो लिहितो… ‘लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में, हजारो रंग के नजारे बन गये….’या शब्दातूनच त्याच्या भावना प्रगट होतात. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीला आपण मनातलं सांगतो. ती आपली सखी, आपली प्रेयसी आपल्याला कशी प्रतिसाद देते याची त्या प्रियकराला चुटपुट लागून राहते.
कल्पनेतले प्रियकर-प्रेयसी कधी भ्रमराला तर कधी कबुतराला, कधी वार्‍याला तर कधी चंद्राला आपले प्रेमपत्र किंवा प्रेमभावना आपल्या प्रियकरापर्यंत किंवा प्रेयसीपर्यंत पोचवायला सांगतात. जणू ते पोस्टमन होतात.

सासरी नांदत असलेली सासुरवाशीणसुद्धा सासरच्या लोकांचा डोळा चुकवून पोस्टमनची आतुरतेने वाट पाहत असते. कारण माहेरच्या प्रेमाने ओलावलेले पत्र येणार असते आणि ते प्रेमरसात ओथंबून गेलेले पत्र कितीदा वाचू आणि कितीदा नको असे तिला होऊन जाते. त्यातले शब्दन् शब्द अक्षरशः तोंडपाठ होतात. काळजाच्या तुकड्यासारखे ती ते पत्र प्राणापलीकडे जतन करून ठेवते. म्हणजे पत्र हे सासर आणि माहेरचे ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट करते, असेच म्हणावे लागेल.
आता सर्वत्र फोन आले. सर्वांच्या हातात मोबाईल असतात. आठवण आली रे आली की लावला फोन. अगदी दुबई-अमेरिकेसारख्या ठिकाणी असलेल्या मुलीला, मुलाला किंवा जावयाला अथवा मित्रमैत्रिणीला क्षणात फोन लागून त्यांचा हालहवाल विचारता येतो. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलसुद्धा करता येतो. म्हणजे जिथेकुठे भारतात अथवा भारताबाहेर आपले नातलग आहेत, त्यांना आपण समोरासमोर पाहू शकतो, बोलू शकतो.

पण… पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला तर पत्र म्हणजे जीव की प्राण असतो.
आपला जीव देशाच्या रक्षणासाठी हातात घेतलेल्या जवानाला केवळ आपल्या आईवडलांच्या किंवा बायकोच्या आलेल्या एका पत्रानेसुद्धा किती उभारी येते. आवेश येतो. त्या आवेशातच तो जवान शत्रूसैन्यावर तुटून पडतो.

त्या पत्राने त्याला आतून-बाहेरून गलबलल्यासारखे होते. कारण त्याच्या घरचे लोक म्हणजे त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण, त्याची बायको, मुले सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याला पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं असतं- तू घरी कधी येणार? तू पत्र पाठव, कधी येणार ते लिही. तुझ्याशिवाय हे घर भरलेलं असूनही सुनं सुनं आहे.
मग घरच्या लोकांची ही आर्जव पाहून त्याच्या मनात कालवाकालव झाल्यासारखी होणार नाहीतर काय?
या पत्रानेच अकबर बादशहाची बायको जोधाबाई हिने हुमायूंला धर्माचा भाऊ मानल्याचं पत्र अन् राखी पाठवली आणि पेशवाईमध्ये श्रीमंत राघोबा यांनी श्रीमंत माधवराव यांचे बंधू विश्‍वासराव यांना ‘ध’रावे असे पत्र लिहून दिले असता… आनंदीबाईने म्हणजे राघोबांच्या दुसर्‍या पत्नीने त्या पत्रात ‘ध’रावे चे ‘मा’रावे असे करून विश्‍वासरावांना मारायला लावले. हाच या पत्राचा चमत्कार.