रंगुनी रंगात साऱ्या…

0
3
  • प्रा. रमेश सप्रे

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारे रंग-संग-नृत्याचे आविष्कार साकारताना कृष्णाची रूपं सतत बदलणारी असली तरी स्वरूप एकच असतं- रंगुनी रंगात साऱ्या… रंग माझा वेगळा!
आपण मात्र होलीच्या रंगोत्सवात अंगप्रत्यंगानं चिंब भिजत एकमेकांना शुभेच्छा देऊया- ‘आपलं सर्वांचं जीवन आनंदरंगात रंगून जाऊ दे!’

आपला भारत ही जशी संतांची भूमी आहे तशीच सणांचीही भूमी आहे. तसेच वेड्या विठ्ठल कुंभाराच्या ‘घटा-घटांचे रूप आगळे’ असते तसे या सणांचे रूप-स्वरूप वेगळे असते. एकादशी तीच, यात्राही तशीच, पण आषाढीला देव झोपतो व कार्तिकीला देव उठतो.

सणांतही एक सण जनावरांचा, तर एक माणसांतील संबंधांचा. गंमत म्हणजे नातं तेच बहीण-भावाचं, पण एक बंधनाचं (रक्षाबंधन) तर दुसरं ओवाळण्याचं (भाऊबीज). एक सण प्रकाशाचा (दिवाळी), तर एक रंगांचा (होळी किंवा रंगपंचमी). हिंदीत ज्याला ‘होली’ म्हणतात, त्यात प्रकाशाची पूजा असते, तसाच रंगांचा उत्सव असतो.
प्रत्येक सणाला एक साज असतो तसाच एक बाजही असतो. होळीचंच पहा ना! आदल्या दिवशी होळी पेटवायची, दुसऱ्या दिवशी तिची राख (धुली) म्हणजे अंगारा किंवा भस्म किंवा विभूती किंवा उदी म्हणून प्रसादभावनेनं कपाळाला लावायची. याला म्हणतात धूलिवंदन. आज ही पावित्र्याची भावना जाऊन एकमेकांवर धूळ किंवा चिखल फेकणारी धुळवड उरलेली आहे. आणि होळीच्या म्हणजे शिमग्याच्या मारलेल्या बोंबा जरी हवेत विरल्या तरी त्यानिमित्तानं अभद्र बोललं गेलेलं कवित्व मात्र उरतं. अर्थात आजच्या भ्रमणध्वनी (मोबाइल) नि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (‘एआय’ म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या) युगात नि जगात सर्वच सणांभोवती असलेलं एक दिव्य नि हृद्य वलय काहीसं निस्तेज होत चाललंय. अर्थात सणांच्या आनंदी, उत्सवी स्वरूपाला गदारोळी, भडक इव्हेंटचे रूप देऊन सणांना जिवंत ठेवणे चाललेय. कालाय तस्मै नमः!
होळीची पोळी आपण मजेत खातो. होळी पेटवून नाचणं-गाणंही करतो. पण होळीचा प्राण असलेला संदेश मात्र लक्षातच घेत नाही. हा संदेश पुराणकाळापासून चालत आलेल्या कथाप्रसंगातून आपल्याला मिळतो. होळीच्या संदर्भात तीन कथा सांगितल्या जातात. तिन्हींचा रूपकात्मक अर्थ विचारात घ्यायला हवा.

  • कथा पहिली ः ही कथा शिवचरित्रातली. तारकासुर नावाचा राक्षस सर्वप्रकारचे अत्याचार करीत होता. तिन्ही लोकांत त्याने हाहाकार माजवला होता. त्याचा संहार विश्वातील दोन महान शक्तींच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या पुत्राकडूनच होणार होता. हिमालयाच्या पायथ्याशी गौरी (पार्वती) कैलासावरील योगीश्वर शिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत होती. पण शिवशंकराची ध्यानावस्था काही संपत नव्हती. त्याचं ध्यान भंग करण्याची कामगिरी इंद्राने रती-मदन या सर्वसुंदर दंपतीकडे सोपवली. मदनानं कैलासावर विविध सुवासांच्या फुलांचं उद्यान निर्माण केलं. केवळ नाकातूनच नव्हे तर शरीरावरच्या रंध्रारंध्रातून तो गंध शंकराच्या अंतरंगात शिरला पण ध्यान भंगलं नाही. मग रतीनं पायातील नूपुरांचा मंजुळ ध्वनी, ध्यानस्थ शंकराभोवती पदन्यास करत नर्तन-गायन सुरू केलं. पण तो ध्वनी, ती हालचाल, ते गीत शंकराला गाढ समाधीतून उठवू शकले नाही. शेवटचा उपाय म्हणजे स्पर्श. मदनानं फुलांचा धनुष्यबाण तयार करून पुष्पबाण मारून शंकराला स्पर्श केला. समाधी भंग पावलेल्या शिवानं क्रोधानं डोळे उघडले तर दृष्टीला पडला मदन. शिवानं तिसऱ्या डोळ्यातून योगाग्नी निर्माण करून मदनाला जाळून टाकलं. रतीनं शंकराची आर्त प्रार्थना करून पतीचे प्राण परत मागितले. दया येऊन शंकराने त्या राखेतून मदनाची फक्त रूपरेखा असलेली आकृती निर्माण केली. मदनाला त्यामुळे अनंग (शरीर नसलेला) म्हणू लागले. या मदनदहनाचं प्रतीक म्हणून आपण होळी पेटवू लागलो. पण आपल्या सर्व कामनांचा, वासनांचा उपभोग अतिशय आसक्त भावनेनं घेत राहिलो. उपभोग रसिकतेनं भोगताना त्यापासून अलिप्त (डिटॅच्ड) राहण्याचा महत्त्वाचा संदेश या ‘अनंग’ प्रसंगातून मिळतो. आजच्या उपभोगांच्या सर्वप्रकारच्या वस्तूंची चंगळ असलेल्या काळात अनासक्त ‘अनंग’ भावनेने सारे उपभोग मनसोक्त भोगण्याचा संकल्प होळीच्या अग्नीपासून प्रेरणा घेऊन करायला हवा. यासंदर्भात एक प्रार्थना चिंतन करण्यासारखी आहे.

होलिकायां भवेत्‌‍ भस्मं ईर्ष्या द्वेष अघानि च॥
म्हणजे, होलिकेच्या (होळीच्या) अग्नीने आमच्यातील मत्सर, द्वेष, पापबुद्धी जळून जाऊ देत. भस्मीभूत होऊ देत.
यापुढच्या काळात किती महत्त्वाचा आहे हा संदेश!

  • कथा दुसरी ः ही कथा भागवतातील आदर्श भक्त प्रल्हादाची. बालक प्रल्हादाचा पिता हिरण्यकशिपू आपल्या मुलाच्या मुखातून अखंड होणाऱ्या ‘नारायण’ नामाचा उच्चार (जप) ऐकून अस्वस्थ होत असे. प्रल्हादाला विषारी काळ्या सर्पाकडून दंश करवणे, हत्तीच्या पायाखाली तुडवणे, डोंगराच्या उंच कड्यावरून ढकलून देणे, मोठ्या कढईतील (काहिलीतील) उकळत्या तेलात फेकणे अशा साऱ्या शिक्षा निरुपयोगी ठरल्यावर एक घटना घडली. त्याची बहीण म्हणजे बाल प्रल्हादाची आत्या होलिका राजवाड्यात आली. तिला अग्नीत बसूनही न जळण्याचं वरदान मिळालं होतं. तिच्या योजनेनुसार एक चिता रचली गेली. त्यावर आपल्या भाच्याला कौतुकानं मांडीवर घेऊन होलिका बसली. प्रल्हादाला ती लाकडं, ती चिता, ती आत्या, तो अग्नी या साऱ्यात प्रत्यक्ष नारायणाचं दर्शन होत होतं. प्रल्हादाच्या मनात भाव होता- ‘हिरण्यं अनलं वंदे समृद्धं विश्वतोमुखम्‌‍।’ असे म्हणतात की अचानक वेगानं वारा (प्रभंजन) सुटला नि होलिकेवरच्या अंगावरचे अग्नीविरोधी कवच उडून प्रल्हादाच्या अंगावर पडले. याचा परिणाम म्हणून त्या चितेत होलिका भस्मसात झाली नि प्रल्हाद जिवंत राहिला. अग्नीतून तावून-सुलाखून निघालेल्या सुवर्णासारखा. या प्रसंगात दुष्ट हेतू ठेवून अग्नीत बसलेल्या होलिकेची होळी झाली, तर सर्वात नारायणाचं (भगवंताचं) दर्शन घेणारा प्रल्हाद सुखरूप राहिला.
    होळी पेटवताना सगळीकडे ‘अहम्‌‍’ (देहोऽहम्‌‍) पाहणारी आपली स्वार्थी, संकुचित दृष्टी नि वृत्ती सर्वात देव पाहणारी शिवसुंदर झाली पाहिजे, नव्हे ती तशी बनवण्याचा निर्धार तरी आपण केला पाहिजे.
  • कथा तिसरी ः ही कथा सर्वात महत्त्वाची. राधाकृष्णाच्या होलीची म्हणजे रंगपंचमीची. याचा आध्यात्मिक अर्थ पाचही इंद्रियांतून भोग-उपभोगांची पंचरंगी पिचकारी श्री-कृष्णावर म्हणजेच राधाकृष्णावर उडवायची नि आपण आतून निर्लिप्त, निरासक्त, निःसंग होऊन जायचं. हे अवघड वाटलं तरी इच्छाशक्ती वापरली तर अशक्य निश्चित नाही. असो.

खूप पूर्वी प्राथमिक शाळांत स्नेहसंमेलनात कृष्ण-राधेचं एखादं नृत्य असायचंच. काहीशा बोबड्या स्वरात म्हटलेली ती बाळबोध गाणी अजून कानामनात रुंजी घालतात. हे असेच एक गाणे-
नको रे कृष्णा रंग फेकू चुनरी भिजते।
मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते॥
‘थंडी वाजते’ म्हणताना त्या छोटुकलीनं कुडकुडण्याचा केलेला निरागस अभिनय अजूनही डोळे मिटले की दिसतो. जरा वरच्या वर्गात गाणं असायचं-
आज गोकुळात रंग खेळतो हरी।
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी॥
एकूण काय, त्यावेळी सभोवती असलेल्या बऱ्यापैकी निरामय असलेल्या समाज-जीवनाचं प्रतिबिंब शाळांतील सांस्कृतिक कार्यक्रमात दिसून येत असे. ते कार्यक्रमही संस्कृतीचं दर्शन घडवणारे असे ‘सांस्कृतिक’ असत. असो.
एक लोकप्रिय कथा गोकुळातील यशोदा-कान्हा यांच्या संबंधातील आहे. एका अर्थी तिला होलीचा आरंभही म्हणायला हरकत नाही. अनेकदा नंदलाल कृष्ण यशोदामातेकडे तक्रार करायचा की राधा कशी गोरी आहे अन्‌‍ मी काळा का? यावर आधारित एक गोड गीतही आहे.
यशोमती मैय्या से बोले नंदलाला।
राधा क्यूँ गोरी मैं क्यूँ काला?॥
यावर यशोदेचं एक उत्तर असतं- ‘काली अंधियारी राती में तू आया (जन्मलास)’ म्हणून तू काळा. कृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षातील अष्टमीच्या मध्यरात्री नाही का झाला? शिवाय ‘काली नैनोंवाली राधा’च्या डोळ्यातील काजळाच्या प्रभावामुळे तू असा काळासावळा झालास. यावर उपायही यशोदा सुचवते. हातात रंग घेऊन जा आणि राधेच्या गालांवर-तोंडावर फासून ये. नुसते रंग फेकू नकोस. नंदलालानं तसं केलं नि तेव्हापासून एकमेकांच्या अंगावर रंग उधळण्याची नि निरनिराळ्या रंगांचं पाणी पिचकारीतून एकमेकांवर उडवण्याची प्रथा-परंपरा सुरू झाली. आरंभी अशी ही रंगीतसंगीत होली सुरू झाली.
व्रजभूमीत. गोकुळ-नंदगाव (कृष्मजन्मस्थळ)- बरसाना (राधारानीचं जन्मस्थान) वृंदावन अशा सर्व प्रदेशाला ब्रजभूमी म्हणत. आणि कृष्णाला ब्रिजपाल- बिरज का छोरा- व्रजकिशोर अशा नावांनी लोक संबोधू लागले.
या होली उत्सवाच्या साजरीकरणाचे अनेक प्रकार आहेत.

राधारानीच्या बरसानात ‘लाठीमार होली’ खेळली जाते. या सर्व महिला हातात लाठ्या घेऊन येतात नि एकत्र जमलेल्या पुुरुषांना बडवतात. अर्थात पुरुषांनी डोक्यावर घमेली, पत्र्याचे जाड तवे घेऊन स्वतःचं रक्षण करायचं असतं. आतल्या दबलेल्या भावभावनांना वाट मोकळी करून देणारा हा होलीचा प्रकार वाईट नाही. विशेष म्हणजे तो राधेच्या बरसाना गावी होतो.
() गोकुळात फुलांचा, पाकळ्यांचा वर्षाव एकमेकांवर करून ‘फुलांची होली’सुद्धा खेळली जाते.
() मोठमोठ्या राजेरजवाड्यांची होली- विशेषतः राजस्थानातील उदेपूर- जयपूर अशा राजघराण्यांतील स्त्री-पुरुषांची होळी अतिशय भव्य अन्‌‍ नेत्रदीपक असते.
() होलीचा एक संकेत म्हणजे वसंत ऋतूच्या, रंगीबेरंगी फुलाफळांच्या आगमनाची, ऋतुराज वसंताची सुरुवात. म्हणूनच कविमनाच्या नि रसिकवृत्तीच्या रविंद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनात होलीच्या निमित्तानं गायन-वादन-नर्तनाचा ‘वसंतोत्सव’ सुरू केला.
() आज जगातील अनेक देशांत- विशेषतः जिथे भारतीयांची वस्ती आहे त्या भागात- मोठ्या उमेदीने नि उत्साहाने होली-उत्सव साजरा केला जातो.
() अनेक साधुसंतांच्या आश्रमात, विशेषतः वैष्णव संप्रदायांच्या आश्रमात हजारो शिष्यांच्या उपस्थितीत होली साजरी केली जाते. त्यावेळी आश्रमातील प्रमुख स्वामी- महाराज, संन्यासी पंपानं विविध रंगांच्या पाण्याचा मोठा फवारा उडवून हजारो उपस्थितांना चिंब भिजवून टाकतात. यावेळी होणाऱ्या पाण्याच्या अतिवापरामुळे तसेच गैरवापरामुळे त्यावर नियंत्रण आणून ‘कोरडी होली’ (नुसते रंग फेकून) खेळण्याचं बंधन काही ठिकाणी घातलंय ही चांगली गोष्ट आहे.
() मोठ्या-मोठ्या जलोद्यानात (वॉटर पार्कस्‌‍) मात्र अक्षम्य असा पाण्याचा गैरवापर (उधळपट्टी) केली जाते. अनेक धनदांडगे श्रीमंत लोक समाजाविषयी, बहुसंख्य सामान्य जनांविषयी बिलकूल बांधिलकी, जाणीव नसल्यामुळे वर्षानृत्य (रेनडान्स), जलक्रीडा (ज्यात उत्साह कमी पण उन्माद (माज) अधिक असतो) यांना महत्त्व देतात. फक्त धंदा नि देहाचे उपभोग याचा विचार जिथं होलीसारख्या सणाच्या निमित्तानं होतो तिथं बंधनं घातलीच पाहिजेत.

  • होळी पेटवण्यासाठी आणलेली लाकडं, होणारं प्रदूषण, कर्कश संगीत हा पर्यावरण प्रदूषणाचा मोठा प्रकार आहे. इथं सण हे उत्सव उरत नाहीत तर भव्य प्रमाणावर होणारे इव्हेंट्स मात्र बनतात.
  • होली उत्सवाचे सकारात्मक परिणाम (लाभ)
  • यात्रा, कुंभमेळा, वारी याप्रमाणे यात जात-धर्म-भाषा-देश अशा कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. ही सर्वसमावेशकता हा महत्त्वाचा लाभ आहे.
  • सर्वांच्यात समतेची, बंधुभावाची भावना निर्माण करण्याची क्षमता होली उत्सवात आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजमनाच्या शुद्धीकरणासाठी मोठी संधी यानिमित्ताने मिळते. हेवेदावे, वैर, सूडभावना संपून सौहार्दाचे-प्रेमाचे वातावरण यातून निर्माण होते. सहिष्णुता (सहनशीलता) नि समरसता हे मोठे लाभ राष्ट्रीय पातळीवर होतात.
  • लोककला, लोकसंगीत, लोकसंस्कृती यांच्या मुक्त आविष्कारासाठी होली हे चांगले माध्यम आहे.
    शेवटी- कृष्णभक्तीची दोन रूपं. राधा नि मीरा. ‘राधा का भी श्याम और मीरा का भी श्याम।’ मीरेला कृष्णाबरोबर होली खेळण्यात एक अडचण आहे. ती म्हणते-
    किणु संग खेलु होली, पिया तज गये है अकेली।
  • प्रियसखा कृष्ण सोडून गेलाय मग होली कोणाबरोबर खेळू?
    हा प्रश्न राधेला पडत नाही, कारण ती आणि कृष्ण यांच्यात अखंड अद्वैत आहे. ही राधा अर्थात कवी जयदेवाच्या ‘गीतगोविंद’मधली नि त्यानंतरच्या असंख्य राधाकृष्ण शृंगाराचं वर्णन करणाऱ्या रचनांमधली.
    राधा-मीरा दोघींनाही एकच अनुभूती येत असते, ती म्हणजे, अंतरंगातल्या श्रीरंगात रंगून जाण्याची!
    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारे रंग-संग-नृत्याचे आविष्कार साकारताना कृष्णाची रूपं सतत बदलणारी असली तरी स्वरूप एकच असतं- रंगुनी रंगात साऱ्या… रंग माझा वेगळा!
    आपण मात्र होलीच्या रंगोत्सवात अंगप्रत्यंगानं चिंब भिजत एकमेकांना शुभेच्छा देऊया- ‘आपलं सर्वांचं जीवन आनंदरंगात रंगून जाऊ दे!’
    ॥ भवत्‌‍ जीवनं रंगैः आल्हादमयं भवेत्‌‍ इति कामना॥