रंगसाधक

0
27

गोव्याच्या रंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारा एक तारा काल निखळला. विजयकुमार नाईक नावाचा एक ‘हंस’ निजधामाला गेला. नाट्यलेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि नाट्यप्रशिक्षक ह्या सर्व अंगांनी रंगभूमीची तहहयात सेवा करणाऱ्या ह्या तरुण रंगकर्मीचे असे ध्यानीमनी नसताना आपल्यातून निघून जाणे चटका लावणारे आहे. वारखंडे – फोंडा येथील ‘हंस’ही प्रतिष्ठित आणि नावाजलेली संस्था. स्व. विश्वनाथ नाईक यांनी फोंड्यामध्ये रंगदेवतेच्या उपासनेचे हे पीठ निर्माण केले. स्व. सूर्या वाघ यांची साथही त्यांना लाभली आणि मुळातच नाट्यवेड्या असलेल्या गोमंतकाची आपल्या उत्तमोत्तम नाट्यनिर्मितीद्वारे त्यांनी उदंड आणि अविरत सेवा केली. नाईक यांच्या घरासमोरच्या मांडवात रात्ररात्र चालणाऱ्या नाटकांच्या तालमी पाहतच त्यांची मुले मोठी झाली आणि त्यांनीही तनमनधनपूर्वक नाट्यसेवेलाच वाहून घेतले. वास्तविक, नाटकवाल्यांच्या जीवनात त्यांची पुढची पिढी त्या क्षेत्रात येण्याची शक्यता दुर्मीळच असते. नाटकामुळे आपल्या वाट्याला जी अस्थिरता आली, ती निदान आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये अशीच बहुतेक रंगकर्मींची निदान जुन्या काळी तरी भावना असे. परंतु विश्वनाथ नाईक यांच्या सर्व मुलांनी नाट्यसेवेचा हा वसा आणि वारसा उत्स्फूर्तपणे हाती घेतला आणि सांभाळला. प्रामुख्याने दिलीपकुमार, सोमनाथ आणि विजयकुमार हे तिघेही बंधू नाटकांच्या विश्वात नुसते रमलेच असे नाही, तर त्यांनी तेथे आपापले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिलीपकुमार यांनी कुंकळ्ळीच्या लोकलढ्यावर ‘एक सावर सैरभैर’ सारखे नाटक लिहिले. सोमनाथ यांनी ‘कोर्ट मार्शल’, ‘कोऽहम्‌‍’ सारखी नाटके लिहून आपले नाव नाट्यलेखक म्हणून प्रस्थापित केले. विजयकुमार यांनी तर नाटकाच्या सर्व अंगांगांमध्ये संचार करीत आपली एक वेगळी ओळख गोवा आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. खरे म्हणजे ‘हंस’ ही पारंपरिक वळणाची नाट्यसंस्था होती. संगीत आणि ऐतिहासिक नाटके उत्सवी रंगभूमीवर आणि व्यावसायिक पातळीवर सादर करण्यात तिचा हातखंडा होता. मात्र, नाईकांच्या नव्या पिढीने ह्या संस्थेला नवा बाज दिला. ‘हंस’ने कात टाकली आणि नवनव्या प्रयोगांची ही संस्था म्हणजे जननीच बनली. विजयकुमार नाईक यांच्या प्रयोगशीलतेला तर सीमा नव्हती. रंगयात्रापासून ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटरपर्यंतचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले. गोमंतकाच्या भूमीचे उपजत नाट्यवेड लक्षात घेऊन येथील मुलामुलींमध्ये नाट्यप्रेमाचे अंकुर उमलवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी शास्त्रशुद्ध नाट्यप्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याचा त्यांनी सपाटा लावला. मुलांसाठी, तरुणांसाठी शिबिरे, निवासी नाट्यशिबिरे, विशेष मुलांसाठी शिबिरे अशा विविध शिबिरांमधून शेकडो शिबिरार्थ्यांना रंगमंचावर आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा आणि ऊर्जा दिली. आजकाल नाट्यप्रशिक्षण हा धंदा बनलेला आहे, परंतु विजयकुमार नाईक आणि ‘हंस’ची ही नाट्यशिबिरे निव्वळ नाट्यविषयक कळकळीतून निर्माण झाली होती. स्वतः विजयकुमार यांनी त्यासाठी रंगभूमीचा कसून अभ्यास केला. त्यावर अधिकारवाणीने पुस्तक लिहिले. दीडदोनशे कार्यशाळा, शंभराहून अधिक नाट्यशिबिरे, निवासी नाट्यशिबिरांचे यशस्वी आयोजन त्यांनी ‘हंस’च्या वतीने केले आणि त्यातून नाट्यक्षेत्रासाठी समर्पित पिढीच्या पिढी तयार केली. स्वतः सृजनशील लेखनातही ते आघाडीवर होते. जवळजवळ तेवीस एकांकिका, एकवीस पूर्ण लांबीची नाटके, सात बालनाट्ये, चार एकपात्री प्रयोग, पाच नभोनाट्ये अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. गोमंतकीय रंगभूमीवरील हिंदू आणि ख्रिस्ती प्रभाव हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. वयाच्या सातव्या वर्षी रंगभूमीवर त्यांचा पहिल्यांदा प्रवेश झाला होता, तेव्हापासून जवळजवळ दीड हजारांवर नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यातील दीडशेहून अधिक नाट्यकृती ही त्यांची स्वतःची निर्मिती होती. फक्त नाटक हेच क्षेत्र त्यांनी स्वतःभोवती आखून घेतले होते. तोच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. संतकवी कृष्णंभट्ट बांदकरांच्या नाट्यकृतीचा शोध घेण्यापासून हिराबाई पेडणेकरांसारख्या उपेक्षित स्त्री नाटककाराची जीवनकहाणी रंगमंचावर साकारीपर्यंत विजयकुमार यांनी अनेक धाडसी प्रयोग केले. ह्या साऱ्या वाटचालीत गोव्यातील युवा सृजनपासून रंगसन्मानपर्यंतचे पुरस्कार तर त्यांना लाभलेच, सोलापूरच्या एका संस्थेने त्यांचे चौफेर कार्य लक्षात घेऊन ‘रंगसाधक’ हा पुरस्कारही त्यांना प्रदान केला होता. हा सच्चा रंगसाधक आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्यासाठी अश्रू ढाळणारी नाट्यप्रेमी नवी पिढी त्यांचा वारसा पुढे चालवील आणि गोमंतकांच्या नाट्यवेडाला गुणात्मक उंचीही देईल अशी अपेक्षा करूया.