योग्य परवाने नसतील, तर भूतानी कंपनीचा प्रकल्प बंद पाडा : मुख्यमंत्री

0
3

>> नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना थेट आदेश

सांकवाळ-कुठ्ठाळी येथील भूतानी इन्फ्रा कंपनीचा नियोजित मेगा प्रकल्प नियमबाह्य असल्यास तो बंद करण्याचा निर्देश नगरनियोजनमंत्र्यांना देण्यात आला आहे. या प्रकल्पाला मिळालेले भूरुपांतर, पर्यावरण दाखला व अन्य परवाने योग्य नसतील, तर तो प्रकल्प बंद पाडावा, अशा सूचना नगरनियोजनमंत्र्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. याशिवाय राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सुकाणू समितीचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांकडे येणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भूतानी कंपनीचा जो सांकवाळमध्ये जो मेगा प्रकल्प होऊ घातला आहे, त्याबाबत वाद सुरू आहे. कुठलाही मोठा प्रकल्प असो वा छोटा, त्याच्या फाईल्स थेट मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत. आपल्याकडील खाती किंवा सीएमओकडेही येत नाहीत. मुख्यमंत्री या नात्याने किंवा आपल्याकडील कुठल्याही खात्याने भूतानीच्या मेगा प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भूतानी मेगा प्रकल्पाचे प्रकरण वर्ष 2007 सालापासून सुरू आहे. भूतानी कंपनीचा मेगा प्रकल्प नियमाला अनुसरून नसल्यास त्यांचे परवाने त्वरित रद्द करावे. लोकांना त्रासदायक ठरणारे प्रकल्प आम्हाला नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नगरनियोजन खात्याने सुकाणू समितीच्या बैठकीत मेगा प्रकल्पांवर चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. अशा मोठ्या प्रकल्पांसाठी अनेक खात्यांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे सर्व खात्यांना विश्वासात घेऊन मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.