उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल दुसर्यांदा आपल्या मंत्रिगणांसह शपथबद्ध झाले. उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एकदा सत्ता भोगलेला पक्ष पुन्हा निवडून येणे गेल्या कित्येक वर्षांत दुर्मीळ बनले होते. या पार्श्वभूमीवर अँटी इन्कम्बन्सी असताना आणि योगी सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी आकाशपाताळ एक केलेले असतानाही योगी आदित्यनाथ ४०३ पैकी २५५ जागांचे घसघशीत बहुमत मिळवून सत्तेवर आले आणि त्यांनी इतिहास रचला. पाच वर्षे सत्ता उपभोगल्यावर पुन्हा सत्तेचे सुकाणू हाती येण्याचा हा विक्रम प्रस्थापित करीत योगी आदित्यनाथ आणि त्यांचे मंत्रिमंडळ काल अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियममधील डोळ्यांचे पारणे फेडणार्या अभूतपूर्व भव्यदिव्य सोहळ्यामध्ये सत्तारूढ झाले. दोन उपमुख्यमंत्री, सोळा कॅबिनेट मंत्री, नऊ स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि वीस राज्यमंत्री असे हे भरभक्कम मंत्रिमंडळ आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये जातीपातीची समीकरणे कमालीची किचकट असतात. त्यामुळे त्या सर्वांचा समतोल साधत हे मंत्रिमंडळ घडवले गेले आहे. मंत्रिपदाची काल शपथ घेणार्यांत कोणी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय आहे, कोणी भूमीहार, खन्नी, पथरदेवा, जाटव अशा नाना जाती उपजातींच्या गुंत्यातून उत्तर प्रदेशचे नवे सरकार घडले आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली, त्यापैकी केशवप्रसाद मौर्य हे गेल्या वेळी उपमुख्यमंत्री होते, परंतु निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली गेली आहे. दिनेश शर्मा यांच्या जागी ब्रजेश पाठक ह्या सहा वर्षांपूर्वी बसपमधून भाजपात आलेल्या ब्राह्मण नेत्याला दुसरे उपमुख्यमंत्रिपद देऊन जातीय समीकरणे सांभाळण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.
कालचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य होता आणि ते स्वाभाविकही होते. एक म्हणजे योगी आदित्यनाथांनी १९८५ नंतर प्रथमच एखाद्या पक्षाचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकले असल्याने त्या विजयाला तेवढ्याच भव्यतम स्वरूपात साजरा करावेसे पक्षाला वाटले यात नवल नाही. उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाचे राज्य मानले जाते. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता भाजपला तेथे पाय रोवायचे आहेत. त्यामुळेच जोरदार वातावरणनिर्मिती करून योगी आदित्यनाथ सरकारबाबत सकारात्मक भाव जनतेमध्ये निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न आवश्यक ठरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला राज्यात ४१.२९ टक्के मते मिळाली. अयोध्येतील राममंदिरापासून वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरीडॉरपर्यंत आक्रमक हिंदुत्वाचे दर्शन घडवीत आणि बुलझोडरद्वारे माफियाराज संपुष्टात आणीत आक्रमक प्रशासनाचे दर्शन घडवीत भाजपने तेथे हा विजय संपादन केलेला आहे. त्यामुळे हे भगवे वारे पुढील तीन चार वर्षे तरी असेच वाहावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पक्षाला करावी लागणार आहे. कालच्या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा आदी झाडून सारी नेतेमंडळी उपस्थित होती.
हा शपथविधी सोहळा असल्यामुळे तेथे राजकीय स्वरूपाची भाषणे करण्याची प्रथा नसते. त्यामुळे भाषणे जरी झालेली नसली तरी एकूण या शपथविधी सोहळ्याचे भव्यदिव्य स्वरूप पाहता ते एका परीने पक्षाचे शक्तिप्रदर्शनही होते आणि जनमानसावर ठसा उमटवण्याचा प्रयत्नही होता.
आता लवकरच येत्या सोमवारी गोव्याचे नवे सरकार शपथबद्ध होणार आहे. त्यासाठी बांबोळीत श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जय्यत तयारी चालली आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्याचे सरकार शपथबद्ध होताना त्यालाही पंतप्रधान, गृहमंत्री, वगैरे बडी बडी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. स्वतः पंतप्रधान मोदींचे गोव्याशी एक वेगळे नाते आहे, कारण पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा होता होत नव्हती, तेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय गोव्यातील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतच घेतला गेला होता आणि स्व. मनोहर पर्रीकर यांनी ती कोंडी फोडली होती. त्यामुळे गोव्यासारख्या एरवी राष्ट्रीय नेत्यांच्या खिजगणतीतही नसणार्या छोट्या राज्याच्या कारभारामध्येही मोदी जातीने रस घेताना दिसतात. उत्तर प्रदेशमध्ये ताबा घेताच तेथील योगी सरकार कामाला लागले आहे. सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. गोव्यात नवे सरकार सोमवारी सत्तेवर येईल तेव्हा जनतेला जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी किती तत्पर पावले उचलते ते पाहूया.