>> भव्य सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांसह ५० जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
योगी आदित्यनाथ हे सलग दुसर्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून, काल राजकीय व अन्य विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी योगी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर ५० आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसर्यांदा उपमुख्यमंत्री पद दिले. तसेच ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा इकाना स्टेडियममध्ये संपन्न झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगींना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
योगींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विविध कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.