- डॉ. सीताकांत घाणेकर
थोडा सखोल विचार केली की सगळ्यांना कळेल की आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत कारण पारतंत्र्य म्हणजे गुलामी.. मग ती इंग्रजांची असू दे, पोर्तुगिजांची असू दे किंवा अन्य कुणाची!
योगसाधनेवर विचार व चिंतन करताना अभिप्रेत आहे ती अत्यंत सूक्ष्म गुलामी… आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या षड्रिपूंची!
श्रावण महिन्यात कितीतरी चांगले चांगले सण आले- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपालकाला… या सर्व धार्मिक सणांचे महत्त्व प्रत्येकाला ठाऊक आहे. भारतभर आणि परदेशातसुद्धा हे सण आनंदाने साजरे केले जातात. सर्वत्र अत्यंत आनंदीआनंद असतो. या वर्षी कोरोनामुळे लोक थोडे नाउमेद झाले आहेत, तरीपण काही प्रमाणात थोड्या लोकांच्या उपस्थितीत का होईना प्रत्येक ठिकाणी सण साजरे केले गेले. थोडीतरी आध्यात्मिक ऊर्जा सर्वांना मिळाली. आपले सर्वच सण असे उत्साहजनक असतात. सणांच्या आधी व नंतर सगळीच धावपळ असते- पूर्वतयारीची, सणाच्या दिवशीची आणि आवराआवरीची. यात सगळेच सहभागी होतात – बालगोपाल, तरुण, वयस्कर, वृद्ध पुरुष-महिला, शेजारी- पाजारी; अख्खा गावही एकत्र येतो.
प्रत्येक सणाचे महत्त्व, त्यामागील भाव व मुख्य म्हणजे तत्त्वज्ञान वेगळे असते. पण मुख्य मुद्दा म्हणजे समाजाने, कुटुंबाने एकत्र येऊन भगवंताच्या सान्निध्यात, पवित्र वातावरणात देवाच्या सर्व लेकरांनी – कसलाच भेदभाव न बाळगता, जुने हेवेदावे, भांडणे विसरून, मिळून-मिसळून थोडा वेळ एकत्र घालवावा.
याच श्रावणात कृष्ण एकादशीचा, तसेच आणखी एक राष्ट्रीय सण आला – भारताचा स्वातंत्र्यदिन. हा दिवससुद्धा आपल्या धार्मिक सणांइतकाच महत्त्वाचा नि पवित्र. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपली सुटका झाली. अनेक वर्षे संघर्ष चालला. कितीतरी नुकसान झाले. अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन आपल्या तारुण्याचे बलिदान दिले. त्यातील काहींनी प्राणदान दिले. हा दिवस त्यांचे स्मरण करण्याचा होता. हुतात्म्यांना सगळीकडे श्रद्धांजली दिली गेली. झेंडावंदन झाले. पोलीस, मिल्ट्री यांची परेड झाली. प्रमुख व्यक्ती- राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी,… चांगली चांगली भाषणे झालीत. प्रधानमंत्र्यांचे भाषण तर लाल किल्ल्याहून काही विशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीत झाले- भविष्यातील आयोजने, वचने, आश्वासने लोकांसमोर आली. सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे बहुतेकजण घरीच होते. कोरोनामुळे एरवीसुद्धा लॉकडाऊनमुळे आपण पारतंत्र्यातच आहोत ही गोष्ट वेगळी पण थोडा सखोल विचार केला की सगळ्यांना कळेल की आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत कारण पारतंत्र्य म्हणजे गुलामी.. मग ती इंग्रजांची असू दे, पोर्तुगिजांची असू दे किंवा अन्य कुणाची असू दे, पण ही सामाजिक व वैयक्तिक गुलामी झाली.
योगसाधनेवर विचार व चिंतन करताना अभिप्रेत आहे ती अत्यंत सूक्ष्म गुलामी… आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या षड्रिपूंची!
- काम- क्रोध- लोभ- मोह- मद- मत्सर. ती तर बहुतेकांची चालूच आहे. त्यात आणखी भर अहंकाराची.
आपण भाषणात रामराज्याच्या गोष्टी बोलतो. तशा घोषणा करतो. पण रामराज्य कुठेही दिसत नाही. सर्वत्र दृष्टिक्षेपात येते ते रावणराज्य. विकारांचे राज्य, मायेचे राज्य.
सर्व षड्रिपू वाईट व भयानक आहेत पण सर्वांत महाभयंकर म्हणजे काम. तो सर्वांचा नाश करतो. त्या व्यक्तीचा व इतरांचासुद्धा!
काम या रिपूला विविध पैलू आहेत. त्यामध्ये मानवाच्या विविध प्रकारच्या छोट्यामोठ्या इच्छा अभिप्रेत आहेत. पण इथे संदर्भ बघायचा आहे तो म्हणजे कामभावनेवर, विशेषतः जननेंद्रियांबद्दल.
इच्छा वस्तूची होते अथवा व्यक्तीची होते. ती पूर्ण झाली नाही की क्रोध सुरू होतो. क्षणोक्षणी तो वाढतच जातो. श्रीकृष्ण या काम-क्रोधाबद्दल म्हणतात- - रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम व क्रोध हेच सर्व पापाला कारण आहेत. हे महाशन म्हणजे अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारे मोठे पापी आहेत. (गीता ३.३७)
- धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा जसा आच्छादलेला असतो किंवा गर्भ जसा वेष्टिलेला असतो तसे त्याने (काम-वासनेने) हे सर्व गुरफटून टाकलेले आहे (गीता-३.३८)
- हे कौंतेया! कधीही तृप्त न होणारा अग्नी, ज्ञानियांचा नित्य वैरी अशा या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. (गीता ३.३९)
- इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे अधिष्ठान (आश्रयस्थान) आहेत. यांच्या आश्रयाने हा ज्ञान झाकून टाकतो आणि मनुष्याला मोहात पाडतो. (गीता ३.४०)
सृष्टिकर्ता भगवान श्रीकृष्णाकडून अर्जुनाला गीतेतून सांगितलेले हे ज्ञान बघण्याचा मूळ हेतू म्हणजे – - ज्यावेळी महाभयंकर कोरोनाचे अनियंत्रित थैमान जगभर चालू आहे, लाखो लोक मृत्युमुखी पडताहेत. गोव्यामध्येसुद्धा हे प्रमाण वाढतेच आहे. अशा वेळी भयानक मनःशांती बिघडवणार्या बातम्या येतात.
- समुद्रकिनार्यावरील हॉटेलमध्ये ‘रेव्ह पार्टी’- ज्यामध्ये बॉलिवूडमधील नट व काही परदेशी नागरिक स्थानिक लोकांबरोबर एकत्र येतात.
- भारताच्या विविध भागातून लहान मुलींना गोव्यामध्ये वेश्याव्यवसायासाठी आणतात.
- देशाच्या काही ठिकाणी तरुण मुली व महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून करतात…
या बातम्या वाचल्या की मन बेचैन होते. वाटते की कुठे आहेत… मोठमोठी भाषणबाजी करणारे राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस… पण हा विचार मनात येताच दुसरी बातमी असते की या गुन्ह्यात अनेक ‘मोठ्या!’ लोकांचा सहभाग आहे. त्यांच्या आशीर्वादानेच या सर्व गोष्टी राजरोसपणे चालू आहेत. वाढताहेत.
हीच आहे का आपली लोकशाही (डेमोक्रसी)?
ही तर आहे गुंडशाही, झुंडशाही (मोबोक्रसी). याचसाठी का आपल्या निःस्वार्थी, शूर स्वातंत्र्यसेनानींनी व सैनिकांनी बलिदान केले? हाच का तो आपला तथाकथित भारत देश? - यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमते देवाः|
असे मानून नारीला पूजनीय मानणारी संस्कृती आमची. - अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा|
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशतम् ॥ - गौतमऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभू रामचंद्राची पत्नी सीता, राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती, रावणाची पत्नी मन्दोदरी या पाच महासतींचे जो नामस्मरण करतो त्याचा महान पातकांचा नाश होतो.
अशावेळी आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी मोगलांकडून व आपल्याही लोकांकडून होणारे स्त्रियांवरचे अत्याचार थांबवले. त्याचवेळी त्यांची माता- जीजामाता- ज्यांनी बाल शिवाजीला उच्च संस्कार दिले… यांचेदेखील स्मरण होते. दोन्ही हात आदराने जोडले जातात. माणूस नतमस्तक होतो- तेथे कर माझे जुळती..
थोडा विचार केला तर लक्षात येते – कुठे आहेत आपल्या महिला संस्था ज्यांनी वेळोवेळी अशा घटनांचा निषेध व प्रतिकार केला? का होत नाहीत त्या दुर्गा? झाशीची राणी लक्ष्मीबाई?
इथे विभुतीयोगातील श्रीकृष्णाच्या विचारांचे स्मरण करणे योग्य वाटते. कामभावनेबद्दल – (गीता १०.२८) - शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये कामधेनू, सृजनशीलेमध्ये शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचा हेतू कामदेव, सर्वांमध्ये वासुकी मी आहे.
कामभावना जागृत होणे साहजिक आहे. पण जननेंद्रियांचा उपयोग प्रजोत्पादनार्थ करायचा असतो, संभोगार्थ नाही. या कृतीला पवित्रता आहे म्हणून भगवंताचे हे स्पष्ट विचार आहेत. त्याशिवाय आपल्या संस्कृतीत कामदेव आहे. म्हणजे इथे दैवी प्रतिष्ठान आहे. दुर्भाग्य या देशाचे की असे शुद्ध विचार नष्ट पावताहेत आणि आपल्यातील बहुतेकजण भीष्म पितामहांसारखे गप्प आहोत. ‘कलियुगात असे होणारच आणि त्याच श्रीकृष्णांनी म्हटले आहे.’ - यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् |(गीता- ४.७) - जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्माचे प्राबल्य माजते तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो म्हणजे प्रकट करतो.
हे बरोबरच आहे. केव्हा, कसे, कुठे, कुठल्या रूपात प्रकट व्हावे हे त्या परमपित्याला चांगलेच ठाऊक आहे. मूर्ख मुलांना कसा धडा शिकवायचा हेसुद्धा त्याला माहीत आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे त्यापुढचा श्लोक… - परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे! (गीता- ४.८) - साधूंचे संरक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्मसंस्थापना यासाठी मी युगायुगात अवतीर्ण होतो.
मुद्दाम लक्षात घ्यायला हवे की साधू म्हणजे जटा वाढवलेले, भगवे वस्त्र परिधान केलेले, भिक्षा मागणारे…हेच फक्त साधू नाहीत तर सत्याने, नीतिमत्तेने चालणारेसुद्धा साधूच आहेत. याचा अर्थ अशा साधूंची संख्या वाढवायला हवी. दुष्कृत्ये करणार्या व्यक्तींना समजावण्याचे कार्य त्यांनी करायला हवे.