योगसाधना – ४६८ अंतरंगयोग – ५३ प्रत्येकाने स्वतःचे रक्षण करावे

0
182
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

आहार-विहार-आचार-विचार… आचरणात आले तर प्रत्येक व्यक्ती चिंतेचा त्याग करून या वैश्‍विक संकटाला सामोरे जाण्यासाठी शूर योद्ध्यासारखी तयार होणार, अगदी कोरोना वॉरियर होऊ शकेल.
योगसाधक आपल्या नियमित साधनेत यातील अनेक गोष्टी करतच असतील. आता इतरांना सांगूया, शिकवूया.

आज विश्‍वाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोना संक्रमण वाढते आहे. भारतीय वैद्यकीय संस्थेच्या अहवालाप्रमाणे ९३ डॉक्टर्स कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मृत्युमुखी पडले- सर्व प्रकारच्या दक्षता घेऊनसुद्धा! त्याचप्रमाणे इतर अनेक कोविड वॉरियर्स रोगाचे बळी ठरले जसे पोलीस, परिचारिका, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, सैनिक… दिवसेंदिवस हे आकडे वाढताहेत.
प्रत्येक देशात विविध क्षेत्रात उपाय चालू आहेत- रोग झालेल्यांवर तसेच प्रतिबंधात्मकसुद्धा! पण अपेक्षित यश मिळत नाही. व्हॅक्सीन तयार करण्यासाठीसुद्धा संशोधन चालू आहे. यश मिळेल पण त्यासाठी संयम आवश्यक आहे. तसेच परिस्थितीशी सामना करण्यासाठी मनबुद्धी बळकट करायला हवी. हे युद्ध विचित्रच आहे. शत्रू अदृश्य आहे आणि तो केव्हाही कुठेही पोचतोच. तो कसलाही भेदभाव करत नाही- राष्ट्रीयत्व, शिक्षण, आर्थिक स्थिती, वय, लिंग, वर्ग, सामाजिक स्थान, पेशा… पण एक गोष्ट नक्की- ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती बळकट आहे त्यांच्यापासून तो दूरच राहतो. तसेच जे यम-नियमांचे पालन करतात, आवश्यक बंधने पाळतात त्यांना तो सहसा बाधत नाही. म्हणजे आपण काय करावे हे सर्वांना माहीत आहे.

इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी-
आम्ही सगळी बंधने पाळतो – मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, हात नियमित साफ करणे… पण इतर पाळतीलच याची खात्री नाही.
* कोरोना पीडित व्यक्ती दुसर्‍याच्या संपर्कात आली आणि त्या दोघांनी सर्व बंधने पाळली तर त्याला रोग लागण होण्याची शक्यता अगदी कमी आहे – २ ते ३%.
* त्या दुसर्‍या व्यक्तीने मास्क घातला नाही, तर त्याला लागण होण्याची शक्यता ५०% होते. आता याला जबाबदार नियम मोडणारी व्यक्ती ठरते.
* तसेच कोरोना झालेल्या व्यक्तीने ‘मास्क’ घातला नाही पण दुसर्‍या व्यक्तीने घातला तर परत शक्यता ५०% होते.
पण यासाठी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती जबाबदार आहे.
* दोघांनी मास्क घातला नाही, आवश्यक अंतर राखले नाही तर शक्यता १००% होते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा तसेच दुसर्‍याचा विचार करून त्याप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. यालाच मानवता म्हणतात.

या विषाणूचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागण कुणाला झाली आहे हे बहुतेकवेळा सुरुवातीला कळतच नाही. काही व्यक्ती निरोगी व धडधाकट दिसतील, पण कदाचित त्यांना संक्रमण झालेले असेल.
तसेच काही लोक आपल्या नातेवाइकांत, मित्रमंडळी, जवळच्या व्यक्तींना भेटताना हवी ती बंधने पाळत नाहीत. कारण त्यांचा गोड गैरसमज असतो की त्यांच्याकडून आपल्याला रोग येणार नाही. हा समज अत्यंत घातक आहे. दुर्भाग्याने असेच सगळीकडे घडताना दिसते आहे.

कोरोनाच्या या अशा विशिष्ट गुणधर्मामुळे आपला मित्र कोण व शत्रू कोण हेच कळत नाही. म्हणून सदासर्वकाळ दक्षता घेऊन आवश्यक बंधने पाळली तर ते आपल्या हिताचेच होईल. तसेच इतरांचे हितदेखील सांभाळले जाईल. हीच सज्जनता आहे.
मग अशा या विचित्र परिस्थितीत जिवाणूची वागणूक, समाजाची बेफिकीर वृत्ती पाहता एकच उपाय उरतो तो प्रत्येकाने स्वतःचे रक्षण स्वतःच करावे. त्यासाठी योगसाधनेतील विविध तंत्रे अत्यंत उपयुक्त आहेत. त्यात विविध स्तरांवर काही उपाय करायला हवेत….
१. कोरोनाचा शरीरात प्रवेश होतो तो नाकपुडीतून, त्यासाठी मास्क. विशिष्ट अंतर ठेवणे, हात नियमित साफ करणे हे उपाय चांगले आहेत. पण ही बंधने सर्वच पाळतील याची खात्री नाही. त्यासाठी योगसाधनेत अत्यंत प्रभावी उपाय आहेत- ते म्हणजे नाकपुड्या आतून साफ करणे. त्या भागात आवरण आहे त्याची प्रतिकारशक्ती वाढवणे.यासाठी हठयोगातील तंत्रे म्हणजे-

* जलनेती व * कपालभाती.
कपालभातीमध्ये – नाकपुड्यांतून जोराने झटके देऊन श्‍वास बाहेर फेकायचा असतो. मग तो परत आत आपोआप येतो. हे तंत्र दोन्ही नाकपुड्यांतून बरोबर श्‍वास बाहेर सोडून करता येते अथवा त्यापेक्षा परिणामकारक म्हणजे एका एका नाकपुडीतून श्‍वास बाहेर फेकायचा असतो (उजवी-डावी; उजवी-डावी). ही क्रिया सुरुवातीला २० वेळा करून ती थोडीथोडी वाढवायची असते. शेवटी ५० ते १०० वेळा केली तरी चालेल. असे चार-पाच वेळा करावे.

* भस्त्रिका – या क्रियेत श्‍वास जोराने (झटके देत) बाहेर फेकून तसाच आंत घ्यायचा असतो. त्याबरोबर जर दोन्ही हात भुजांकडून वरखाली घेतले (प्रत्येक झटक्याबरोबर) तर ही क्रिया करायला जरा सोपे होते. पण ही क्रिया फक्त १० वेळाच करायची असते.
या दोन्ही क्रियांमुळे नाकपुड्यांचा आतील मुळातला भाग साफ होतो. त्या भागाचे यामुळे घर्षण होते. त्या आवरणाची प्रतिकारशक्ती वाढते.
जलनेती – कपालभाती- भस्त्रिका या क्रियांमुळे ज्या भागातून किटाणू आंत घशांत व फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात ते भाग साफ राहतात. रोगाची लागण होण्याची शक्यता कमी होते.
त्याशिवाय या दोन्ही क्रियांमुळे दोन्ही पुड्या संपूर्णपणे उघड्या होतात. श्‍वास सुलभ होतो. हवा भरपूर प्रमाणात फुफ्फुसात जाते. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. फुफ्फुसे कार्यरत होतात. त्यामुळेही कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते.
त्याचबरोबर आणखी एक अत्यंत उपयुक्त तंत्र म्हणजे…

* गरम पाण्याची वाफ नाकातून घेणे. ही वाफ आत घेतली तर ती नाकपुड्यांतून आत गालाखाली व डोळ्यांखाली असलेली कवटीच्या पोकळीत जाते(सायनस). त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते, असा अनेकांचा कयास आहे.

* गरम पाण्याच्या गुळण्या, घशामध्ये घेतल्या तरीही त्याचा फायदा होतो. त्या पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्या तर ते आणखी फायदेशीर आहे.
या दोन्ही गोष्टी भारतीयांना नव्या नाहीत. अनेक वर्षे ही दोन्ही तंत्रे सर्व भारतभरात प्रचलीत आहेत. सर्दी-खोकला झाला तर औषधांबरोबर हे असले घरगुती उपाय प्रत्येकाला माहीत आहे. आता फक्त संदर्भ वेगळा म्हणजे – कोरोनाचा प्रतिबंध!
या हठयोगातील अत्यंत उपयुक्त शुद्धीक्रियांनंतर एक अत्यंत उपयुक्त पैलू म्हणजे – प्राणायाम… अष्टांगयोगातील चौथा पैलू.
दोन्ही नाकपुड्या व्यवस्थित पूर्णपणे उघड्या झाल्यानंतर प्राणायाम फारच परिणामकारक ठरतो. त्याचे फायदे अनेक आहेत.
– रक्तात प्राणवायूचे प्रमाण वाढणे
– नाडीशुद्धी होणे (ईडा-पिंगला)
– सर्व श्‍वाससंस्था – नाकपुड्या ते फुफ्फुसे – निरोगी राहणे.
– रोगप्रतिकारशक्ती वाढणे
– मनावर नियंत्रण येऊन ताणतणाव कमी होणे
त्यानंतरचा पैलू म्हणजे ध्यान (सातवा पैलू).
प्राणायाम केल्यानंतर ध्यान व्यवस्थित होते.
चित्तएकाग्रता वाढते आणि मुख्य म्हणजे व्यक्तीची आत्मशक्ती वाढते.
योगसाधनेतील इतर पैलू-
आहार-विहार-आचार-विचार… आचरणात आले तर प्रत्येक व्यक्ती चिंतेचा त्याग करून या वैश्‍विक संकटाला सामोरे जाण्यासाठी शूर योद्ध्यासारखी तयार होणार, अगदी कोरोना वॉरियर होऊ शकेल.
अशा या विश्‍वात जिथे बंधनाचा तिटकारा आहे, इतरांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःची प्रतिकारशक्ती – आत्मशक्ती वाढवली तर हितावह होईल. शेवटी प्रत्येक आत्म्याने स्वतःचा मार्ग शोधायचा असतो. कारण प्रत्येकजण एकटाच येतो व एकटाच जातो.
आणि शेवटी जायचे तरी कुठे?
परमधामात? तिथे तर आनंदच आनंद आहे. जिथे परमात्मा- आमची माता- आमचा पिता प्रत्येक मुलाची वाट बघतो. त्यामुळे भीती, चिंता हे असले नकारात्मक शब्द योगसाधकाच्या मनाला स्पर्श करायला नकोत.
योगसाधक आपल्या नियमित साधनेत यातील अनेक गोष्टी करतच असतील. आता इतरांना सांगूया, शिकवूया. पुण्य लाभेल… हो ना?