योगसाधना – ४६५ अंतरंग योग – ५१ यम-नियमांचे पालन आवश्यक

0
139
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

मानवाने सृष्टीमध्ये वावरताना कसलीही बंधने पाळली नाहीत. फक्त तो इंद्रियसुखाच्या मागे लागला. निसर्गाला त्याने नष्ट केले. योगसाधनेची जी चार मुख्य अंगे आहेत- आहार- विहार- आचार- विचार… यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नाही. मग पालन कुठून होणार?

विश्‍वात अनेक राष्ट्रे- राज्ये आहेत. इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला की लक्षात येते की विविध राजांच्या राजवटी दीर्घकाळ टिकल्या नाहीत- मग ते राजे चांगले असू देत अथवा वाईट! काळवेळ कुणासाठीही थांबत नाही. राजा कितीही दुष्ट, अत्याचारी असला तरी प्रजेला त्रास सहन करावेच लागतात. पण शेवटी कुणाचे राज्य किती टिकेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते….
* राजाची शक्ती, त्याचे मंत्री- कारभारी- सैन्य. लोकांचे सहकार्य, प्रजेचा प्रतिकार… हे सर्व त्या त्या राज्याचे विषय.
* शेजारी राजे आक्रमण करतात तेव्हा हेच मुद्दे त्यांना लागू असतात.

आज सर्व विश्‍वात एका फार मोठ्या, हुशार राजाचे राज्य आहे- राजा कोरोना. कितीतरी महिने त्याची अमर्याद सत्ता चालू आहे. प्रत्येक देशात धुमाकूळ चालू आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कुठलेही शस्त्र नसताना प्रजेला त्रास होतो. अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडतात. मग ते कितीही शूरवीर सैनिक असू देत. सर्वांना ठाऊक आहे ते कोण आहेत ते… मोठी यादी आहे – डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, साफसफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते… या सर्व व्यक्ती सेवाभावी वृत्तीने आपले कर्तव्य करतात.
आपण बालपणी वाचत असू की राक्षस मायावी होते. घोर तपश्‍चर्या करून असे अनेक राक्षस स्वतःच्या स्वार्थापोटी व स्वरक्षणार्थ भगवंताकडून विविध वर घेत होते- मग तो हिरण्यकश्यपू असो वा रावण. युद्ध करताना ते अदृश्य होत असत.

हा कोरोना असाच मायावी राक्षस वाटतो. तो अदृश्य आहे. केव्हा, कुणावर आक्रमण करेल याची काहीही खात्री नाही.
सत्तेत असणारे राजकारणी, त्यांचे सचिव, विविध खात्याचे अधिकारी, वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ… अनेक उपाय सुचवताहेत व करताहेत. पण अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती चिंतेत आहेत.
आणखी एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या कोरोनाने राज्याच्या आर्थिक क्षेत्रातदेखील धुमाकूळ घातला आहे.

सारांश काय तर प्रत्येक क्षेत्रात या राजाचा हस्तक्षेप बिनधास्त चालू आहे. मानवाची असहायता दिसते आहे. त्यामुळे सामान्य व्यक्ती भयभीत होत आहे. त्याला चिंता वाटते – माझे काय होणार, माझ्या परिवाराचे काय होणार, विश्‍वाचे काय होणार?? असे वाटणे साहजिक आहे कारण कुणालाही आशेचा किरण दिसत नाही. सगळेच अनिश्‍चित.
या चिंतेमुळे अनेक मनोदैहिक रोग वाढले आहेत. प्रत्येकाला माहीत आहे-

* चिता व चिंता या शब्दांमध्ये फरक आहे फक्त एका बिंदूचा, पण चिंता सजीवाला जाळते व चिता निर्जीवाला.
प्रत्येकाच्या मनात एक विचार नक्की येतो की अशा परिस्थितीत करायचे काय?
– काहींना नोकर्‍या आहेत पण कामावर जाता येत नाही.
– काहींना पगार मिळतो पण मालक मेटाकुटीला आला. कामगारांना पगार द्यावा लागतो पण उत्पन्न कुठे आहे?
– थोड्या गावात लॉकडाऊन आहे, त्यामुळे नोकरीवर जाता येत नाही. काहींजवळ पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही.
– मुलांचे शिक्षण बंद झाले आहे. काहींचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. पण थोड्या गावात नेटवर्कच नाही.
सारांश काय तर प्रत्येक क्षेत्रात विविध समस्या… हा सगळा झाला नकारात्मक विचार. पण योगसाधक तोच जो नकारात्मक विचारांवर अभ्यास करून व चिंतन करून त्यावर आवश्यक उपाय शोधतो व अमलात आणतो. त्याचे धैर्य व आत्मिक शक्ती उच्च कोटीची असते कारण तो नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना करतो. सर्व योगमार्गांचे व पैलूंचे व्यवस्थित पालन करतो.

सगळ्यात मुख्य म्हणजे योगसाधकाचा स्वतःवर व सृष्टिकर्त्यावर विश्‍वासच नव्हे तर दृढ श्रद्धा असते. त्यामुळे त्याचा संकल्पदेखील तसाच असतो.
भगवंताच्या वचनावर विश्‍वास ठेवून अशा व्यक्ती जीवनाला सामोर्‍या जातात.
कुणी एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे ….
* ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या आपण बदलू या.
ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार करू या आणि भगवंताकडे मागू या की आम्हाला या गोष्टी समजण्यासाठी बुद्धिचातुर्य दे.
म्हणून चिंतनशील व्यक्ती व्यर्थ चिंता न करता संकटाला सामोरी जाते. योगसाधक संपूर्ण गीतेचा अभ्यासक आहे. त्याला भगवंताचे वचन माहीत आहे-
‘‘जेव्हा जेव्हा विश्‍वात अधर्म वाढेल तेव्हा साधूंचे रक्षण करण्यासाठी मी अवताररूपात येईन.’’
तसेच त्याला गीतेचा शेवटचा श्लोक आश्‍वासन देतो –
‘‘जेथे श्रीकृष्ण आहे, गांडीवधारी अर्जुन आहे, तेथे लक्ष्मी, विजय, वैभव, अढळ न्यायनीती आहे.’’ (गीता १८.७८)
हे ज्ञान असल्यामुळे तो साधू म्हणजे साधू वृत्ती, सज्जनवृत्ती आचरण्याचा नियमित प्रयत्न करतो. विश्‍वाचे व जन्म-मरणाचे तत्त्वज्ञान त्याला माहीत असते त्यामुळे तो तणावरहित असतो. त्याला ज्ञात असते की भगवंत माझ्याबरोबरच आहे. तो माझा योगक्षेम वाहणार.

महाभारतात एका चिमणीची छान बोधदायक गोष्ट आहे. – कुरुक्षेत्रावर एक चिमणी आपले घरटे बांधत होती. आसपास सगळीकडे युद्ध चालू होते. विविध शस्त्रे-अस्त्रे चालत होती. सामान्य सैनिक तलवारी, भाले, धनुष्यबाण यांचा वापर करीत होते. तर ज्ञानी धनुर्धर अनेक प्रकारची शस्त्रे – अस्त्रे वापरीत होते- पाशुपतास्त्र, अग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र… काहीजण गदायुद्ध करीत होते. चहूबाजूला किंकाळ्या ऐकायला येत होत्या. रक्ताचे पाट वाहत होते. लढवय्ये मृत्युमुखी पडत होते. म्हणजे सगळेच विनाशक कार्य चालले होते. कुठेही दया-करुणा दिसत नव्हती.

चिमणीला म्हणे आश्‍चर्य वाटले आणि दुःखही झाले की हा मानव स्वतःला एवढा बुद्धिमान समजतो आणि असा काय विचित्र वागतो? कारण ती चिमणी घरटे बांधायचे विधायक कार्य करत होती जेथे ती आपल्या पिल्लांना जन्म देणार होती. आणि स्वतःचा संसार उभा करणार होती- अगदी प्रेमाने कुटुंबपालन करणार होती.

खरेच किती विरोधाभास होता त्या दृश्यांत! पण चिमणी शांत होती. समाधानी होती कारण या सर्व दुःखदायक घडामोडीत तिला सतत भगवंताचे दर्शन घडत होते. त्याचा ती परमानंद घेत होती.
या गोष्टीतील स्थूल मुद्दे सोडूया. पण एक सूक्ष्म मुद्दा म्हणजे कसलेही कर्म करताना भगवंताचे ध्यान करणे म्हणजे त्याच्या सहवासाची अखंड जाणीव ठेवणे. मनातील सगळे नकारात्मक भाव, चिंता, नैराश्य, भीती… नष्ट होतात. उच्च कोटीच्या योगसाधकांना तर तहान, भूक, झोप शरीराच्या संवेदना… कशाचीही जाणीव नसते. ते अगदी समाधीवस्थेत राहून आपले कार्य करतात – खरे म्हणजे तो त्यांचा कर्मयोग असतो.  दुसरा एक सकारात्मक विचार आपण करू शकतो.
कोरोना हा विषाणू जरी यमराजासारखा दिसला तरी तो आपला मित्र आहे. मानवाने सृष्टीमध्ये वावरताना कसलीही बंधने पाळली नाहीत. फक्त तो इंद्रियसुखाच्या मागे लागला. निसर्गाला त्याने नष्ट केले. योगसाधनेची जी चार मुख्य अंगे आहेत- आहार- विहार- आचार- विचार… यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नाही. मग पालन कुठून होणार?

राजयोगातील जी पहिलीच अंगे आहेत-
* यम ः व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश. – अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह.
* नियम ः स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश. – शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वर प्रणिधान.
चौफेर विश्‍वात नजर फिरवली तर यातील प्रत्येकाचे उल्लंघन केलेले दिसते. मग आरोग्य, सुखशांती यांची अपेक्षा आपण कशी ठेवू शकतो. अपवाद अवश्य आहेत आणि अशा व्यक्ती शांत आहेत. ते आपल्या विधायक कार्यात चोवीस तास गुंतलेले आहेत. अगदी चिमणीसारखे भगवंताला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या स्मृतीत.
आपण सर्व योगसाधक तरी या संदर्भात विचार करू या का? अनेक वर्षे आपला शास्त्रशुद्ध अभ्यास चालू आहे.