- डॉ. सीताकांत घाणेकर
आपण फुलपाखरासारखे करायला हवे. तो फुलावर बसून मध प्राशन करतो आणि माशी? ती घाणीवरच बसते. म्हणून बालपणापासूनच मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. त्यामुळेच पूर्वी लहान मुलांना प्रत्येक दिवशी यशस्वी व्यक्तींच्या गोष्टी नियमित सांगत असत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस- २१ जून. अनेक राष्ट्रे, लाखो व्यक्ती, शेकडो संस्था… या दिवशी विविध कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी ही घटना आहे.
भारतीय संस्कृती फार पुरातन आहे. सृष्टी, सृष्टीरचयिता.. अशा विविध विषयांवर आपल्या ज्ञानी ऋषी-महर्षींनी सखोल अभ्यास व चिंतन करून विश्वातील मानवाला अनेक शास्त्रे दिली. त्यात एक आहे ‘योगशास्त्र’. गेली कित्येक वर्षे आपण योगसाधनेवर विचार करत आहोत. या शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास व चिंतन करीत आहोत.
विश्वातील सर्व राष्ट्रांना ‘कोरोना’ या छोट्याशा व्हायरसने गाठले आहे. शासकीय व वैद्यकीय स्तरावर उपाय चालूच आहेत. संपूर्ण जगातील व्यवहारात पुष्कळ बदल करावा लागतो आहे. तसेच योगदिवसाचे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनेच चाललेत. अन्य उपाय नाही. मुख्य म्हणजे प्रत्येकामध्ये असलेला उत्साह!
यावर्षी तर योगसाधनेला आगळेवेगळेच महत्त्व आलेले आहे. योगसाधनेचा उपयोग – सर्व मनोदैहिक रोग व जीवनपद्धतीमुळे होणारे रोग. यासाठी विविध देशात अनेक संस्थांतर्फे संशोधन चालू आहेच. योगथेरपीचे फायदे अनेकजण घेताहेत. पण कोरोना संक्रमणामध्ये जी रोगप्रतिकारशक्ती लागते ती शक्ती योगसाधनेमुळे वाढते. तसेच आयुर्वेद औषधांमुळेही वाढू शकते.
मुख्य म्हणजे अशा वेळी प्रत्येकाची आध्यात्मिक पायरी उच्च स्थितीची असणे अत्यावश्यक आहे. त्याबद्दलच आपण ‘पहाटेची अमर्याद शक्ती’ या विषयावर विचार करीत आहोत. त्यासाठी हेल एरॉल्ड यांच्या अनुभवांवर आधारित सकाळी उठल्यावर काय काय करायचे, हे आपण बघत आहोत.
त्यासाठी सहा गोष्टी करायच्या आहेत. डअतएठड – या कोडवर्डमध्ये येतात.
१. ड – सायलेन्स – ध्यान
२. अ – अफर्मेशन्स – सकारात्मक स्वयंसूचना
३. त – व्हिज्युअलाइज – चांगल्या कल्पना मनात घोळवणे
४. ए – एक्सरसाईझ – व्यायाम
५. ठ – रीडिंग – वाचणे
६. ड – स्क्रायबिंग – लिहिणे
यातील पहिल्या दोन मुद्यांवर आपण विचार केलेला आहे.
३. व्हिज्युअलाइज – चांगल्या कल्पना मनात घोळवणे.
आपल्या मनात बहुतेकवेळा वाईट विचारच जास्त असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम अंतर्मनावर होतो. मानवाला विविध शक्ती भगवंताने प्रदान केलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कल्पनाशक्ती. ती तर अफाट आहे. प्रत्येक व्यक्ती कसल्याही व कितीही कल्पना करू शकते.
आपण फुलपाखरासारखे करायला हवे. तो फुलावर बसून मध प्राशन करतो आणि माशी? ती घाणीवरच बसते. म्हणून बालपणापासूनच मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. त्यामुळेच पूर्वी लहान मुलांना प्रत्येक दिवशी यशस्वी व्यक्तींच्या गोष्टी नियमित सांगत असत. आतासुद्धा गोष्टीरूपी साहित्य पुस्तक रूपात उपलब्ध आहेत. तसेच दूरदर्शनवर विविध वाहिन्यांवरून अत्यंत उपयुक्त कार्यक्रम असतात. पण प्रश्न हा आहे की आपणातील किती कुटुंबं त्यांचा उपयोग करून घेतात?
प्रत्येक माणसाला एक विशिष्ट ध्येय ठरवणे गरजेचे आहे. इथे दररोज आपले ध्येय पूर्ण झाले आहे हे मनात घोळवायला हवे. आणि ते ध्येय साकार झाल्याचा आनंदसुद्धा व्यक्त करायला हवा.
यशस्वी व्यक्तींची या संदर्भात मतं बघू या…
*े ऑलिम्पिक विजेती ऍथलीटलेन बीचले म्हणाली होती – मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते. ते म्हणजे – मी हातात विजेतेपदक घेऊन उभी आहे आणि माझ्यावर शँपेनचा वर्षाव होतो आहे.’’
* मायकेल स्मिथ म्हणतो – ‘‘मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो. स्वप्नांबद्दल टिपण हिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतींनी त्याला डोळ्यासमोर उभे करतो.’’
* अझीम प्रेमजी त्यांच्या यशाच्या रहस्याबद्दल सांगतात – ‘‘यश दोनदा मिळते- एकदा मनात आणि दुसर्यांदा जगात.’’
* पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकल फेल्प्स म्हणतो – ‘‘ज्यावेळी मला झोप येऊ लागते तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.’’
तसे बघितले तर या सर्व गोष्टी तेवढ्या कठीण नाहीत. दुर्भाग्याने आपल्या शिक्षणपद्धतीत त्या नाहीत. आपला जास्त भर पाठांतरावरच आहे. तसेच आजच्या परिक्षेत व्यक्तीची स्मृती तपासली जाते. त्याचे ज्ञान नाही.
अपवाद अवश्य आहेत. विश्वात काही संस्था अशाही आहेत ज्या ठरलेल्या वाटेने न जाता काहीतरी अभिनव पद्धती शोधून काढतात. मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांना यशाच्या शिखरांपर्यंत पोचवतात, पण यांची संख्या अत्यल्प आहे.
भारतात ध्यान आदिकाळापासून लोकमान्य व लोकप्रिय आहे. विविध व्यक्ती ध्यान वेगवेगळ्या पद्धतींनी करतात. पद्धती वेगळ्या असल्या तरी मुख्य ध्येय व परिणाम एकच आहे. काहीजण आपल्या देवदेवतांवर ध्यान करतात तर इतर काही चिन्हावर उदा. ॐ. काही लोक निसर्गावर – बर्फाच्छादित हिमालय, घनदाट झाडी असलेला पर्वत, वाहती नदी, प्रातःकाळ – सायंकाळी, सूर्य… ज्यावेळी रंगांच्या विविध छटा दिसतात, निरभ्र निळे आकाश, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र… शेवटी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’.
इथेसुद्धा मनातील विचार महत्त्वाचे – ते सकारात्मक असायला पाहिजेत.
मूर्तीवर ध्यान करणे त्यामानाने सोपे आहे कारण त्यावेळी त्या मूर्तीचे गुण मनात आणायचे असतात. भगवंताची पवित्रता लक्षात घ्यायची असते. तद्नंतर त्या देवाचे विशिष्ट गुण आहेत त्यांची उजळणी करायची असते. आपले गुण कुठले आहेत यावरही विचार करायचा असतो.
विवाहसमयी ज्योतिषी होणार्या दांपत्याचे गुण त्यांच्या कुंडलीप्रमाणे बघतो. हे गुण म्हणे ३६ आहेत. जास्तीत जास्त गुण बरोबर झाले तेवढे वैवाहिक जीवन यशस्वी होईल असे मानतात. तसे सर्व गुण कुणाचेही मिळत नाही.
शास्त्रकार सांगतात की ध्यान करताना ईश्वराचे व ध्यान करणार्याचे सर्व छत्तीस गुण मिळाले पाहिजेत. तरच भगवंताशी पत्रिका जुळेल. चांगला योग येईल.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित ‘तुलसीदल’ या पुस्तकात महत्त्वपूर्ण व अत्यंत गूढ अशी माहिती देतात. ते म्हणतात – ‘‘प्रभूचा व्हायचे असेल तर भगवंताशी लग्न लावले पाहिजे. भगवंताशी जीवात्म्याचे लग्न लावायचे असेल तर त्याच्या व भगवंताच्या कुंडलीतील गुण जमले पाहिजेत. त्याशिवाय भगवान लग्नाला तयार होणार नाहीत. जर छत्तीस गुण असतील तर भगवंताशी पत्रिका जमते. पस्तीस असले तरी चालणार नाही. यद्यपि व्यवहारात एकोणीस गुण जुळले तरीही वधु-वरांची पत्रिका जुळली असे समजून त्यांचे लग्न लावून देण्यात येते. परंतु जर जीवात्म्याला भगवंताशी लग्न लावायचे असेल तर त्याने गीतेच्या बाराव्या अध्यायात (भक्तियोग) भगवंताने धर्म्यामृतमध्ये जे छत्तीस गुणांचे वर्णन केले आहे ते गुण स्वतःच्या जीवनात आणले पाहिजेत तरच त्याची पत्रिका भगवंताशी जुळेल व तो भगवंताशी लग्न लावू शकेल. एकदा जीवाचे भगवंताशी लग्न लागले की तो भगवंताच्या घरात पोचला. तेथून जीवाला परत फिरायचे नसते.’’
‘‘गीतेत भगवंत सांगतात –
‘यद्गत्वा न निवर्तन्ते तद्वाम परमं मम’
– जीवात्म्याचे हे निजधाम आहे. तेथे पोचल्यावर जीवात्मा पुन्हा येथे परत येत नाही.
ध्यान करताना आपले मन परत परत बाहेर जाते. म्हणून त्याला गुंतवून ठेवण्यासाठी प्रभूच्या एक एक गुणाचे चिंतन करायला हवे. त्यासाठी पुष्कळ अभ्यास हवा. आधी हे छत्तीस गुण कुठले हे समजून घेणे आवश्यक आहे, तद्नंतर त्यावर सूक्ष्म चिंतन.
सुरुवातीला ही प्रक्रिया कठीण वाटते. पण एकदा सवय झाली की आपले मन त्या चिदानंद स्थितीत राहण्यातच धन्यता मानते. इंद्रियसुखाची ओढ थोडी थोडी कमी होते. कदाचित ही अवस्था प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म लागतील पण केव्हातरी सुरुवात करायलाच हवी.
पांडुरंगशास्त्री पुढे म्हणतात – ‘‘जगात येऊन जो छत्तीस गुण प्राप्त करतो तो भगवंताशी लग्न करतो. चांभाराची मुलगी – पण राजाला आवडली तर राजा तिच्याशी लग्न करतो. ज्या क्षणी चांभाराच्या मुलीचे राजाशी लग्न लागते, त्याच क्षणी ती राणी बनते. तिला प्रधानदेखील नमस्कार करतो. तसे जीवनात छत्तीस गुण आणून जे भगवंताशी लग्न लावतात त्यांना नमस्कार केला पाहिजे.’’
आपणही अशा चांगल्या कल्पना मनात घोळवू या.(संदर्भ- पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित ‘तुलसीदल’)