योगमार्ग – राजयोग

0
234

(योगसाधना – २५०)

(स्वाध्याय – १८)

– डॉ. सीताकांत घाणेकर

‘स्वाध्याय = स्व + अध्याय’. स्वतःबद्दलचा अभ्यास. पतंजलीच्या अष्टांगयोगातील एक नियम. पण या एकाच शब्दाचा अर्थ एवढा खोल व व्याप्ती एवढी प्रचंड की जन्मोजन्मी अभ्यास करूनही न संपणारा विषय. मानवाचा संपूर्ण जीवनविकास साधण्याचा एक उत्तम मार्ग. कदाचित म्हणूनच वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले या महापुरुषाने आपल्या कार्यात स्वाध्यायाचे तत्त्वज्ञान विस्तृतपणे व्यक्तीव्यक्तीपर्यंत पोचवले. त्यांनी ज्ञान, कर्म व भक्ती या तिन्ही योगमार्गांचा समावेश त्यात केलेला आहे. 

‘स्वाध्याय’ करता करता व्यक्तीला ‘‘मी कोण’’ याची जाणीव व्हायला हवी. म्हणजे मी फक्त शरीर, मन किंवा बुद्धी नाही; तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. सुरुवातीला स्थूल शरीराची जाणीव सर्वांनाच असते. प्रगती होते त्याप्रमाणे विचार पहिले मनात नि नंतर बुद्धीत स्थिर होतात. या गोष्टीही सूक्ष्म आहेत. पण तदनंतर अत्यंत सूक्ष्म अशा ‘आत्मा’ या तत्त्वापर्यंत विचार पोचतात.
सर्व संत-महापुरुष सांगतात – तत्त्वमसि! पण नवीन योगसाधकाला त्याची जाणीव होत नाही. पू. पांडुरंगशास्त्री हे कठीण तत्त्वज्ञान तीन पायर्‍यांमध्ये समजावतात…
१. तेन त्वं असि ः त्याच्यामुळे तू आहेस! ही गोष्ट अत्यंत खरी आहे. इथे ‘तो’ म्हणजे विश्‍वकर्मा – देव. त्याच्याशिवाय जग आणि जीव कशालाही अर्थ नाही.
२. तस्य त्वं असि – तू त्याचाच आहेस! खरेच, हे समजल्यावर व्यक्तीचा आत्मसन्मान वाढायला हवा. न्यूनगंड जायला हवा. एरवीदेखील समाजातील मोठ्या माणसाचा नातेवाईक असतो तो गौरवाने जगतो.
३. तत् त्वं असि – तोच तू आहेस! हे शब्द अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. अत्युच्च असे तत्त्वज्ञान या वाक्यात आहे.
अशा तर्‍हेने ‘‘मी’’ कोण आहे हे समजल्यावर माणसावर, त्याच्या वागणुकीवर नियंत्रण येणे अपेक्षित आहे. प्रत्येकाने यावर विचार करायला हवा. मला हे तत्त्वज्ञान समजले आहे का? मी तसा वागतो का? याचा स्वाध्याय हवा.
अनेक तत्त्ववेत्ते म्हणतात- ‘अहं ब्रह्मास्मि!’
– मीच ब्रह्म, परब्रह्म, भगवंत आहे. असे म्हणणे वेगळे आणि त्याप्रमाणे वागणे वेगळे. गर्भितार्थ समजला नाही तर समाजात हिरण्यकश्यपू आणि रावणच वाढतील. ते तर म्हणत की ‘मीच परमेश्‍वर आहे. माझीच पूजा करा.’ असा अहंकार वाढला तर त्यांच्यासारखा नाश होण्याची शक्यता आहे. जीवनविकास सोडाच, अधोगती होणार. म्हणून कुठल्याही शब्दांचा खरा अर्थ व संदर्भ समजायला हवा.
उदा. भारतात पत्नीला लग्नाच्या वेळी सांगितले जाते – ‘पती – परमेश्‍वर’. त्यामुळे ती अर्धांगिनी पतीला देव समजून त्याची सेवा करतच राहते व त्यातच धन्यता मानते. विशिष्ट मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण अनेक वेळा होते उलटेच. पतीच स्वतःला पतीदेव मानतात. पत्नीकडून सर्व तर्‍हेची कामे करून घेतात. एवढेच नव्हे तर दारू पिऊन तिच्यावर अत्याचार करतात. काही महाभाग तर असे आहेत की स्वतः काहीही कमवत नाही उलट पत्नीच्या कमाईवर मौजमस्ती करतात आणि पत्नी असहाय्य होऊन पतीदेवाची सेवा करतच राहते. म्हणून या शब्दांचा खरा अर्थ दोघांनाही समजायला हवा. पतीला ज्यावेळी ‘‘परमेश्‍वर’’ म्हणून संबोधले जाते तेव्हा मुख्य जबाबदारी पतीची असते. त्याने शक्यतो परमेश्‍वरासारखे सर्वगुणसंपन्न असावे, अशी अपेक्षा असते. निदान सद्गुणी, सज्जन असणे आवश्यक आहे.
अगदी अशीच गोष्ट काही राक्षसांच्या बाबतीत घडते. ते स्वतःला सामर्थ्यवान समजतात. अहंकारी बनतात आणि जनतेवर अत्याचार करतात.
खरे म्हणजे या तत्त्वज्ञानात स्थूलातून सूक्ष्माकडे प्रवास आहे. स्थूल शरीर ते सूक्ष्म आत्मा व नंतर परमात्मा. असले तत्त्वज्ञान समजावणे व समजणे अत्यंत कठीण आहे. कारण सुरुवातीला अहंकार वाढण्याची फार शक्यता असते. म्हणून संत-महात्मे म्हणतात-
‘‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’’, पू. पांडुरंगशास्त्रींेनी आपल्या प्रवचनांतून सांगितले, ‘स्वाध्याय – एक आगळे व्रत आहे. त्यांच्या प्रवचनांवर आधारित ‘एषः पन्या एतत्कर्म’ या पुस्तकामध्ये ते म्हणतात- ‘‘विसाव्या शतकात, भोगवाद व भौतिकवाद मानवासाठी अधःपतन घेऊन आलेले आहेत. यंत्राच्या सतत सान्निध्यामुळे मानव जड, भावशून्य, स्वार्थपरायण, संधिसाधू तसाच कांचनमूल्यवादी बनला आहे. त्याचे वैयक्तिक जीवन चिंता, उद्विग्नता व निराशा यांनी भरलेले आहे. त्याग आणि तप, स्नेह आणि सहकार यांच्या पायावर उभे असणारे त्यांचे कौटुंबिक जीवन आज भावापेक्षा भोगाला, धर्मापेक्षा धनाला आणि स्नेहापेक्षा स्वार्थालाच केंद्रबिंदू मानत असलेले दिसत आहे. समाज-जीवनातून स्वस्थता, शांतता आणि समाधान गमावले गेले आहे. मानव वोट, नोट व लोट (पीठ-भाकरी) गोळा करण्यातच अडकून पडलेला आहे, झगडत राहिलेला आहे. राष्ट्रीय जीवनात स्वार्थांधतेला मर्यादा राहिलेली नाही. तरूण पिढी स्वतंत्रतेच्या विकृत कल्पनेच्या आहारी जाऊन स्वच्छंद व उत्छृंखल बनत चालली आहे आणि सनातन मूल्यांना आव्हान देत आहे. पैसा जमा करणे, भोग भोगणे, स्वतःचे घरदार सांभाळणे व सुखी होणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता समजून माणूस ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’चे समर्थन करीत आहे. याच्यापलीकडे त्याची दृष्टीच पोचत नाही. तो अन्य विचारच करीत नाही आणि याच्याशिवाय वेगळे काही करावे असे त्याला वाटतच नाही. ‘फायदा’ त्याची गती आहे, ‘वायदा’ त्याचे जीवन आहे आणि ‘कायदा’ त्याचा व्यवहार आहे.
विश्वात भव्य अशी भारतीय संस्कृती आहे; पण तिची आज विटंबना चाललेली आहे. मानवाच्या समृद्ध भौतिक जीवनाबरोबर त्याच्या पारलौैकिक व आध्यात्मिक जीवनाला मार्गदर्शन करणारी वैदिक संस्कृती आज रडत आहे. हजारों वर्षांपासून मानवाला मार्गदर्शन करीत असलेली संस्कृती उभी करण्यासाठी आपले अवतार-रामकृष्णादि महापुरुष सतत कार्यप्रवृत्त राहिले. ऋषींनी अविरत रक्त सांडून तिला टिकवून धरली. संतांनी अविश्रांत प्रयत्नांनी प्रेरणेचे पीयुष पाजून आपल्यामध्ये संस्कार जिवंत ठेवले. या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्याचा कोणी कधी विचार करतो का? आपले हृदय रात्रंदिवस चालू राहण्यासाठी प्रभू खबरदारी घेऊन सेवा करतो. प्रभूच्या या ऋणातून मुक्त होण्याचा कोणी कधी विचार करतो का?
आज चोहीकडे अशांती पसरलेली आहे. सर्वत्र असमाधान व्यापलेले आहे. भोगलालसा अमर्याद वाढलेली आहे. त्याच्या परिणामामुळे दुःखाने त्रासलेला व ग्रासलेला समाज आजच्या बुद्धिमंतांना व जागृत अंतःकरणाच्या व्यक्तींना आव्हान करीत आहे. आजचे युगच आव्हानाचे आहे! सहृदयी विचारशील व शिक्षित मानव आज व्यथित झालेला आहे. वेदना अनुभवित आहे. या वेदना प्रसूति-क्षणाचे चिन्ह तर नाहीत ना? ‘क्षतात् त्रायते-’ म्हणजे धर्माला, संस्कृतीला जो विनाशापासून वाचवतो तो क्षत्रिय असे म्हणतात. आज गरज आहे अशा सांस्कृतिक क्षत्रियांची. म्हणून काळाचे हे आव्हान प्रभूवरील प्रेमामुळे, कृतज्ञभावाने स्वीकारले पाहिजे आणि ‘संघे शक्तिः कलौयुगे’ हा न्याय लक्षात घेऊन यथाशक्ती, यथामती संस्कृतीची सेवा करण्यासाठी काळाचे आव्हान स्वीकारायला तयार झाले पाहिजे.’’
शास्त्रीजी फक्त प्रवचनांतून ज्ञान देऊन गप्प राहिले नाहीत तर स्वतः कर्म करायला लागले व इतरांना देखील आपल्या कार्यांत सहभागी करून घेतले. हाच त्यांचा ‘‘स्वाध्याय परिवार’’.
हे असे तेजस्वी विचार नियमित माधवबाग, मुंबईतील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेमधून दिले जातात. त्याशिवाय गावागावात स्वाध्याय केंद्रे चालतात. तिथून लाखो कृतीशील स्वाध्यायी तयार होतात. तेदेखील स्वाध्याय करतात. विविध प्रयोगांद्वारे जीवनविकास करतात. पू. पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय अगदी सोप्या, साध्या, सरळ शब्दात समजावला. ते सांगतात की स्वाध्याय हा पंथ, पक्ष, गट, संप्रदाय, धर्म किंवा संस्था नाही. मग ‘स्वाध्याय’ आहे तरी काय? ‘‘स्वाध्याय’’ – एक प्रवृत्ती आहे. चळवळ किंवा आंदोलन नाही.
– वृत्तीला मुख्य, उत्कृष्ट व श्रेष्ठ बनवते तसेच मनुष्याला श्रेष्ठाचा – भगवंताचा – बनवते तिचे नाव प्रवृत्ती.
– स्वाध्याय म्हणजे धर्म व संस्कृती समजावणारा खरा दृष्टिकोन. प्रभूचे काम करण्याची प्रवृत्ती.
– स्वाध्याय म्हणजे समजुतदारपणा, विवेक, ध्येय-आदर्शनिष्ठा, जीवन-निष्ठा, कर्तव्यपरायणता, प्रभूप्रेम.
– स्वाध्याय म्हणजे ‘स्व’चा अभ्यास आणि ‘स्व’ म्हणजे शरीरात असलेले चैतन्य तत्त्व, त्याला चिकटलेला अहम् व इच्छा!
या सर्व गोष्टी व सर्व अर्थ वाचले की मनाला पटते की हा विषय व्यापक तसाच खोल व सूक्ष्म आहे.
शास्त्रीजी एक सुंदर व्याख्या सांगतात-
‘‘स्वतःचा ‘स्व’ ओळखणे व दुसर्‍याच्या ‘स्व’बद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय.
ते म्हणतात, ‘गुळाची गोडी वर्णनाने कळत नाही. त्यासाठी गूळ खावा लागतो. स्वाध्याय देखील असाच आहे. तो समजून घेतला पाहिजे, खर्‍या अर्थाने केला पाहिजे, दुसर्‍यांकडून करवला पाहिजे आणि शेवटी तसे जीवन जगले पाहिजे.
खरेच. हे महापुरुष कठीण तत्त्वज्ञान अगदी सोपे करून आमच्यासारख्या सामान्यांना सांगतात पण ते समजण्यासाठी प्रत्येक योगसाधकाने स्वाध्याय करायला आळस करू नये. मग लागूया ना आम्ही सर्व कामाला?…