योगमार्ग – राजयोग

0
182

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २४८)

(स्वाध्याय – १६)

प्रत्येकाच्या जीवनात बालपणापासून विविध संस्कार होतात. हे संस्कार सुरू होतात आपल्या घरात. ते ही वेगवेगळ्या व्यक्तींकडून. आमच्या लहानपणी एकत्रित कुटुंब असे. त्यामुळे साहजिकच दोन-तीन पिढ्यांच्या व्यक्ती घरात असत- आई-वडील; आजी-आजोबा; पणजी-आत्या-काकी वगैरे. सुटीत मुले आईसोबत आजोेळी जात. तिथेही बरेच नातेवाईक- मामा-मामी आणि जर आजोळ श्रीमंत असेल तर त्या घरचे नोकर-चाकर मंडळी. अशाप्रकारे त्यावेळच्या मुला-मुलींवर प्रत्येकाकडून चांगले-वाईट संस्कार झालेले बघायला मिळत असे. बहुतेक घरात चालता-बोलता संस्कार होत असत. पण संस्कारांची वेळ होती तिन्ही सांजेची आणि जागा होती देवघर! सायंकाळी ७ वाजता त्यावेळचे घरात असलेले म्हणजे आई-आजी-मुले एकत्र बसून प्रार्थना म्हणत. ज्येष्ठ मंडळी मुलांना बोधपूर्ण गोष्टी सांगत. अशी ही घरे म्हणजे वास्तू असत. हाच नियमित ‘‘स्वाध्याय’’ असे.

आमच्या पिढीतल्या प्रत्येकाजवळ असे अत्यंत सुखद अनुभव असतील. दुर्भाग्याने आता राहिल्या फक्त आठवणी. त्यांचीच उजळणी मनात व हृदयात करून सुख व आनंद मानावा लागतो. आजच्या विभक्त कुटुंबात घरचे सर्व सदस्य आपल्या विविध कामात दंग असतात. तसे पाहिले तर विविध यंत्रे कामासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळेची बचत होते. वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर थोडातरी वेळ आपण अशा स्वाध्यायासाठी काढू शकतो. पण त्याला अग्रक्रम द्यायला हवा. खंत एकाच गोष्टीची वाटते की अगदी बोटांवर मोजता येईल… अशा मोजक्याच घरात आज स्वाध्यायाला महत्त्व दिले जाते.
आपण बहुतेकजण .. सामान्य-धुरीण-राजकारणी-विद्वान.. वेळ मिळेल तेव्हा आपल्या जाहीर भाषणात मूल्याधिष्ठित शिक्षणावर वारंवार बोलतो. पण हे असे शिक्षण ज्या ठिकाणी दिले जात असे म्हणजे त्याची सुरुवात होत असे तेच बंद झाले आहे. मूल्यांची शिकवण देण्यासाठी घराशिवाय आणखी एक जागा म्हणजे शाळा किंवा शैक्षणिक संस्था. तिथे मूल्यशिक्षण हा विषय मुलांना शिकवला जातो. पण त्याचे महत्त्व समजून ते शिकवले जाते का? हा प्रश्‍नच आहे.
सारांश… मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी ज्या मुख्य जागा व वेळ होती तिथेच ते दिले जात नाही. त्यामुळे आज जगातील परिस्थिती बिघडलेली दिसते. सगळीकडे अत्याचार, अनागोंदी वाढतच आहे.
आज बहुतेकांच्या घरात तिन्ही सांजेच्या वेळी दूरदर्शन सुरू होतो. तो मग मध्यरात्रीपर्यंत चालतो. हे एक प्रभावी माध्यम आहे- संस्कार देण्यासाठी. तसे काही कार्यक्रमही दाखवले जातात. पण तशा कार्यक्रमांना अग्रक्रम दिला जात नाही, हीच खरी शोकांतिका आहे. अर्थात काही अपवाद वगळता!
तसेच इंटरनेटसुद्धा अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. पण त्याचाही उपयोग कसा करून घेतला जातो हे बघायला हवे.
इथे एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवी की संस्कार देणार्‍याने सर्व पैलूंचा विचार करायला हवा. नाहीतर गैरसमज होऊन दुष्परिणाम होऊ शकतात. अनेक पालक मुलांवर संस्कार करताना विचित्र वागतात. ते मुलांवर मालकी हक्क गाजवतात, जणू काय मुले म्हणजे वस्तूच आहे. अशा पालकांना खलील जिब्रानचे विचार अभ्यासायला हवेत.
* जिब्रान पालकांना सांगतात की पालकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की मुले म्हणजे त्यांच्या मालकीची वस्तू नाही. फक्त जन्म त्यांचा या जगात पालकांमुळे होतो. म्हणून मुलांवर त्यांचा मालकी हक्क गाजवू नये. चुकीचे विचार त्यांना शिकवू नयेत, कारण पालकांच्या वेळचे विचार कदाचित आज योग्य ठरणार नाहीत. त्यांचे उद्याचे जग कसे असेल याची साधी कल्पनासुद्धा तुम्ही करू शकणार नाही.
नंतर ते एक चांगले सोपे उदाहरण देतात-
* मुले ही बाणासारखी आहेत. पालक धनुष्य आहेत. धनुष्याने बाण फक्त धरून ठेवायचा असतो. तो बाण कुठे जाणार हे धनुष्य ठरवू शकत नाही. त्याला दिशा देण्याचे काम ज्याच्या हातात धनुष्य आहे तो ठरवतो म्हणजे ईश्‍वर! त्याने सर्व आधीच ठरवलेले असते की तो विशिष्ट बाण कुठे जाईल ते.
सारांश.. पालकांनी उत्तम संस्कार द्यावेत. त्यांच्या आयुष्याची दिशा व गती त्यांचा पुरुषार्थ ठरवेल. त्यासाठी सर्वज्ञानी-विश्‍वकर्ता समर्थ आहे.
अनेकवेळा आपण पूर्वसुकृताविषयी ऐकतो की शेवटी जे प्रारब्धात आहे तसेच घडते. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान|’ तसेच माणसाचा स्वभाव बदलणेही कठीण आहे. एका गाजलेल्या नाटकातील एक वाक्य आहे- ‘हत्ती सरळच चालणार, उंट तिरकाच चालणार, घोडा अडीच घरे चालणार, बरोबर आहे. कारण हे बुद्धिबळाचे प्यादे आहेत आणि ते जनावरांसाठी आहे… माणसासाठी नाहीत.!’
मानवावर चांगले पुरुषार्थप्रधान संस्कार झालेत तर तो म्हणेल, ‘‘मी पर्वत हलवू शकेन, प्रसंगी वाळूतून तेलही काढू शकेन’’. त्यासाठीच नियमित स्वाध्यायाची गरज आहे.
अंगुलीमलला ज्ञान दिल्यावर बुद्धांनी त्याला अहिंसक ज्ञान दिले. त्यानंतर ते शिष्यांबरोबर चर्चा करीत होते. तेव्हा बुद्ध जे म्हणाले ते ज्ञान वरील संदर्भात अत्यंत उद्बोधक आहे…
* बुद्ध म्हणाले, – अंगुलीमल अज्ञानामुळे तसेच विपरीत ज्ञानामुळे अंधःकारात होता. आम्ही जेव्हा जंगलातून जायला निघालो तेव्हा तुम्ही सर्व त्याच्या भीतीमुळे माझ्याबरोबर यायला तयार झाला नाहीत. याचे कारण तुमच्या मनातही भयरूपी अंधकार होता. पण माझ्या मनात भय नसल्यामुळे लख्ख उजेड होता. त्यामुळे मी अंगुलीमलकडे आत्मविश्‍वासाने गेलो. त्याला जीवनाबद्दल ज्ञान दिले. त्यामुळे त्याच्या मनातील अंधकार दूर झाला. तो जन्माने भिल्ल असूनही सज्ञानी झाला. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी व ती म्हणजे जेथे अंधकार असेल तिथे प्रकाश नेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पुढील आयुष्यात हा सिद्धांत लक्षात ठेवा.
खरेच भगवान बुद्धांचे म्हणणे किती सत्य आहे! यामुळेच अनेक ऋषी-महर्षी-महापुरुष-संत आपल्या भारताच्या काना-कोपर्‍यात जातात. अखंड भारताची परिक्रमा करतात. पुराणकाळापासून आजपर्यंत असे अनेक आहेत- महर्षी नारद, श्रीआद्यशंकराचार्य, स्वामी विवेकानंद..!
स्वाध्याय करताना आपल्यातील प्रत्येकाने हा विचार करायला हवा की आपणही अशी परिक्रमा… जशी जमेल तशी केली तर आम आदमीशी आपला संपर्क वाढेल. भारताच्या महान संस्कृतीचे दर्शन होईल. स्वतःबरोबर इतरांचा जीवनविकासही साध्य होईल. तसेच भौतिक प्रगतीबरोबर आध्यात्मिक प्रगतीदेखील साधली जाईल. विश्‍वाला या दोन्ही तर्‍हेच्या प्रगतींची अत्यंत आवश्यकता आहे.