योगमार्ग – राजयोग

0
605
नारद मुनी

योगसाधना – २४३ (स्वाध्याय – ११)

– डॉ. सीताकांत घाणेकर

विश्‍वातील प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारचे ज्ञान असते. हे झाले सामान्य ज्ञान. विषय तर अनेक आहेत. प्रत्येकाची गरज, इच्छा, ऐपत आणि सामाजिक परिस्थिती यानुसार व्यक्ती ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते. पण यामध्ये भौतिक विषयांचे ज्ञान घेण्याचा प्रयत्नच जास्त असतो. त्यात गौण काही नाही. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे ज्ञान अत्यावश्यक आहेच. पण जीवनविकासासाठी किंवा मानवाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी ते उपयोगाचे नाही. त्यासाठी प्रत्येकाने ‘स्वाध्याय’ करायला हवा. म्हणूनच या सूक्ष्म विषयावरील साहित्याचा अभ्यास नियमित, न चुकता करावा.

स्वाध्याय करता करता जसे दिवस-महिने-वर्षे लोटतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात एक गोष्ट येते की ‘स्व-(मी)’ म्हणजे शरीर, मन, बुद्धी, प्राण यातील एकही गोष्ट नसून ‘मी’ म्हणजे ‘आत्मा’ आहे. हा विषय अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच एखाद्या सद्गुरूंचे मार्गदर्शन जरुरीचे असते. खरे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन हे लागतेच पण अध्यात्मशास्त्राच्या संदर्भात अनेकांच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक जण भरकटत जातात. त्यांपैकी काही अनावश्यक कर्मकांडात गुंतून राहतात. त्यामुळे त्यांचा अपेक्षित जीवनविकास होत नाही.
योग्य दिशेने स्वाध्याय केल्यावर आत्मज्ञान होते. मग पुढील पायर्‍यांचे ज्ञान होते. उत्तरोत्तर प्रगती होतच राहते. त्यात वेगवेगळ्या विशिष्ट पायर्‍या असतात.
प.पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात, ‘‘सुरुवातीला मानवाला आपल्यामध्ये व विश्‍वामध्ये अत्यंत बलशाली अशी अदृश्य शक्ती म्हणजे भगवंत याचे ज्ञान होते. त्याला कळते की सर्व विश्‍व त्याच्या इच्छेप्रमाणे चालते. मानवाने आपले सत्कर्म करत राहायला पाहिजे. त्यानंतर त्याला उमजते की ही शक्ती मातापित्यासारखी माझ्या जीवनविकासाची चिंता करणारी आहे.’’
‘तत्त्वमसि’ या शब्दाचा अर्थ ते सांगतात तो असा- सुरुवातीला भक्ताला पटते की ‘‘मी त्याच्यामुळे आहे’’. त्यानंतर त्याला कळते की ‘‘मी त्याचा आहे’’. आणि शेवटी ज्ञान होते की ‘‘तो मीच आहे’’.
तत्त्ववेत्ते म्हणूनच म्हणतात ‘‘अहं ब्रह्मास्मि’’, मीच ब्रह्म आहे. ही अत्यंत सूक्ष्म अशी अत्युच्च पायरी आहे. जगात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्यामुळे काही जणांना फार कठीण वाटते. त्यामध्ये असेसुद्धा आहेत की ज्यांना ही गोष्ट अशक्यच वाटते. याचे कारण म्हणजे अज्ञान किंवा विपरीत ज्ञान. म्हणून योग्य ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे.
सामान्य व्यक्तीला साध्या-सोप्या पुराणातील किंवा इतिहासातील गोष्टी सांगून त्यांनी आपला जीवनविकास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करता येते. लहान मुलांना तर त्या संस्काररुपी गोष्टी ऐकण्यात फार रस असतो. अशा अनेक कथा आहेत. त्यात एक उपयुक्त अशी वाल्या कोळ्याची कथा…
वाल्या कोळी हा निर्जन ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या लोकांना लुटत असे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवी. अज्ञानामुळे त्याला त्यात गैर काही वाटत नव्हते. आजही समाजात असे लुटणारे लोक अनेक आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यात सामान्य आहेतच पण उच्चशिक्षितदेखील आहेत.
एक दिवस नारद मुनी त्या गावात आले. त्यांना वाल्यानी पकडले. नारदांनी सांगितले की त्यांच्याजवळ तंबोर्‍याशिवाय आणखी काही नाही. तेव्हा नारदांनी कोळ्याला विचारले, तू असा लोकांना का लुटतोस?
वाल्या म्हणाला, ‘मी गरीब आहे. माझ्या घरी आईवडिल, बायकामुले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाकरिता मला हे करावे लागते.’
नारद म्हणाले, ‘हे पाप आहे. या पापाचा भार तुला एकट्यालाच वाहावा लागतो आहे. ज्या कुटुंबियांसाठी तू हे करतोस त्यांना जाऊन विचार की त्यातील कोण-कोण तुझ्या पापाचा वाटा उचलण्यासाठी तयार आहेत? मी इथेच थांबतो’.
वाल्या घरी गेला. सर्वांना ही गोष्ट सांगितली. पण त्याच्या पापाचा वाटा उचलण्याऐवजी सर्वांनी त्याची कानउघाडणी केली. उलट त्याला सांगितले, ‘‘आम्हाला वाटत होते की तू मासळी पकडून आम्हाला पोसतोस. तुझी ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. अशा पाप्याच्या घरात आम्ही क्षणभरही राहणार नाही’’.
वाल्याला त्याची चूक कळली. त्याने नारदाला ही गोष्ट सांगितली. त्याने त्यांची क्षमा मागितली व ज्ञान दिल्याबद्दल आभार मानले. नारदांना तो शरण गेला. त्यानंतर नारदाने त्यांना ‘‘राम’’नाम दिले व जप करायला सांगितले व कष्ट करून उदरनिर्वाह चालवणे कसे त्याच्या हिताचे आहे हे समजावून सांगितले.
वाल्या कोळी सद्वर्तनी झाला. तसेच रामनामाचा जप करून तो फार मोठा महर्षी वाल्मिकी झाला. त्याने रामायण लिहिले.
बालपणी मीठ-मसाला लावून घरच्या ज्येष्ठांनी सांगितलेली ही गोष्ट अनेकांना माहिती आहे. पण त्यानुसार आचरण करणारे किती लोक आहेत? हल्ली अशा गोष्टी सांगितल्या जातात का? बालसंस्कार केंद्रात सांगतात पण आपल्या घरी?
म्हणूनच प्रत्येकाने बहुत करून सूज्ञ माणसाने विचार करायला हवा. मग स्वाध्यायाचे महत्त्व पटेल. फक्त ‘‘जग बिघडले आहे’’, असे म्हणून फायदा नाही.
स्वाध्याय केल्यानंतर ‘‘जीव-जगत्-जगदीश’’ यांचा संबंध कळतो. मी कोण आहे हे कळते. त्यानंतर इतर कोण आहेत याची जाणीव होते. दैवी भ्रातृभाव जागृत होतो. हळुहळू काम-क्रोध-लोभ- मोह-मद-मत्सर- हे षड्‌रिपु व अहंकार कमी होतात. इतरांसाठी काही करावे ही भावना जागृत होते व व्यक्ती कार्यरत होते.
या संदर्भात रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी देवी श्रीशारदामाता यांची वाक्ये फार बोधप्रद आहेत-
‘‘तुम्हाला जर मनाची शांती हवी असेल, तर इतरांचे दोष शोधत राहू नका. त्यापेक्षा आपले स्वतःचे दोष पहा. संपूर्ण जग आपलेसे करण्यास शिका. माझ्या मुला, या जगात परका असा कुणीही नाही. संपूर्ण जग तुमचेच आहे’’.
– देवी श्रीशारदा माता.
हाच खरा स्वाध्याय. श्री रामकृष्ण व देवी शारदामाता यांच्याकडून ज्ञान व प्रेरणा ज्यांना मिळाली ते स्वामी विवेकानंद म्हणतात-
‘‘जे दुसर्‍यांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जिवंत असतात, बाकीचे सारे जिवंत असले तरी मेल्यासारखेच होत.’’
या सर्व विचारांचा अभ्यास स्वाध्यायाकरिता आवश्यक आहे. त्यानंतर चिंतन केले की प्रत्येक स्वाध्यायीच्या मनात एक प्रश्‍न यायला हवा, ‘‘आपण जिवंत आहोत का?’’