येत आहे १२ वे महिला साहित्य संमेलन

0
136
योजकतेने आयोजित केलेले कार्यक्रम आणि महिलांचा उत्साही सहभाग ही महिला साहित्य संमेलनांची खासीयत.

– सौ. लक्ष्मी जोग
फोंड्याची श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था गेली काही वर्षे नेमाने अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनांचे आयोजन करते. यंदा या संस्थेचे बारावे संमेलन राजधानी पणजी शहरात इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये पुढील रविवारी म्हणजे १९ ऑक्टोबरला होणार आहे. त्या निमित्ताने या संमेलनाच्या परंपरेविषयी – 

मराठी भाषेचे वर्णन करताना संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,‘‘माझ्या मराठीचा बोलु कौतुके| अमृतातेंहि पैजा जिंके |’ आणि साहित्याला ‘नाना नवरससुधाब्धि’ असे प्रेमाने व आंतरिक जिव्हाळ्याने ते गौरवतात. श्री ज्ञानेश्‍वरीतील सहाव्या अध्यायात ते एका ओवीत सांगतात,‘‘तैसे शब्दांचे व्यापकपण| देखिजे असाधारण | पाहातया भावज्ञां फावती गुण| चिंतामणीचे ॥ या ओवीद्वारे साहित्याची महती किती थोर आहे ते समजते. मानवाची चिंता दूर करण्याची असाधारण ताकद साहित्यात आहे. म्हणून साहित्य निर्मिती ही व्हायलाच हवी. त्याचबरोबर त्याचा आस्वाद घेणारी मनेही निर्माण व्हायला हवीत. निर्माण झालेले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे पवित्र काम साहित्य संमेलने करतात, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. अनादि काळापासून बघितले तर साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात महिलावर्ग थोडा मागेच असल्याचे दिसते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लेखिकांची नावे पूर्वी वाचायला मिळत, परंतु आता मात्र लेखिकांची मंदियाळीच म्हणावी अशी नावे सांगता येतील.
दरवर्षी अखिल भारतीय व प्रादेशिक स्तरावर मराठी साहित्य संमेलने होत असतात. गोमंतकीयही होतात. मराठीला राजभाषेचे स्थान डावल्यावर तर मराठी साहित्य संमेलनेच जास्त होतात. त्यात महिला साहित्य संमेलन म्हटले की फोंड्याच्या श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेचे दरवर्षी भरणारे संमेलन गोव्यातल्या भगिनींना प्रथमतः आठवते. या संमेलनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाची सर्व कामे महिलाच करतात.
दिंडीतील पालखी खांद्यावर घेण्यापासून ते ध्वनीवर्धकापर्यंत अर्थात काही कामांत पुरुषांचा सहभाग असतो, पण तो नाममात्र. या संमेलनाचा पाया आम्हा सर्वांच्या आवडत्या ज्येष्ठ लेखिका सौ. माधवीताई देसाई यांनी घातला. सलग १० संमेलने त्यांच्या उत्साहभरल्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे भरवली. दुर्दैवाने १० व्या संमेलनानंतर पाच-सहा महिन्यांनी माधवीताई आम्हाला सोडून गेल्या.
आमच्या संमेलनाची कीर्ती सर्वदूर पसरल्यामुळे गोमंतकातील साहित्यप्रेमी, वाचनप्रेमी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला. उत्तम संयोजन, शिस्तबद्धता, कार्यतत्परता व अगत्य यांच्या सहाय्याने महिलाही एखादे कार्य करू शकतात हे लोकांना आम्ही दाखवू शकलो. १० व्या संमेलनानंतर ११ वे संमेलन गतवर्षी शिरोडा येथे तिथल्या कलासक्त व साहित्यप्रेमी महिलांनी अतिशय देखणेपणाने भरवून सर्वांची मने जिंकून घेतली. नवी स्फूर्ती, नवे नियोजन नव्या उत्साहाने भारलेल्या युवती यांनी खूप परिश्रमपूर्वक हे संमेलन साजरे केले.
अगदी पहिल्या संमेलनापासूनच अनेक नामवंत लेखिका, विदुषी, नाट्य-चित्र कलावती यांना आमंत्रित करून त्यांचे प्रगल्भ विचार ऐकण्याची गौरवशाली परंपरा आमच्या संमेलनांनी निर्माण केली होती. त्यामुळे ‘श्री शारदेचे’ महिला साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक पंचपक्वान्नांची मेजवानी असे समीकरण समस्त गोमंतकीय साहित्यनिर्मितोत्सुक, श्रवणोत्सुक महिला वर्गाच्या मनात तयार झाले, यात नवल नव्हते.
संमेलनस्थळी प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांचे अगत्याने केलेले स्वागत, माधवीताईंचा लोभस, प्रेमळ सहवास त्यांच्या मनावर ठसत असे. माधवीताईंचा घरंदाज, अदबशीर वावर, त्यांचे मृदुमधूर बोलणे आम्हीही विसरू शकत नाही. त्यांचे आस्थापूर्वक भाषण ऐकताना महिला पुढच्या संमेलनाला यायचे निश्‍चितच करायच्या.
यंदाचे १२ वे संमेलन पणजीत म्हणजे गोव्याच्या राजधानीत रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी भरवण्याचे निश्‍चित झाले आहे. ताळगाव येथील महिला मंडळाने ही जबाबदारी घेतली आहे. स्थळ आहे मिनेझिस ब्रागांझा हॉल. वेळ सकाळी ९ ते संध्या. ५.३० वाजेपर्यंत. संमेलनाच्या उद्घाटिका आहेत गोव्याच्या राज्यपाल आणि लेखिका मा. मृदुला सिन्हा. संमेलनाध्यक्षा आहेत प्रसिद्ध लेखिका श्रीमती मंगला गोडबोले, विशेष अतिथी म्हणून सुकन्या कुलकर्णी-मोने व सन्माननीय अतिथी लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत श्रीमती निर्मला खलप. तत्पूर्वीच्या या बाराव्या संमेलनाला सर्व गोमंतकीय वाचन-लेखनप्रेमी महिला-पुरुषांनी उपस्थित रहावे असे अगत्याचे आमंत्रण.
आजपर्यंतची सर्व संमेलने ज्या आनंदोत्सवाने पार पडली, त्याचप्रमाणे हेही संमेलन तितक्याच उत्साहाने साजरे होणार यात शंकाच नाही.
आपल्या देशात वर्षभरात आपण अनेक सण-उत्सव, जयंत्या, महोत्सव नित्यनियमाने साजरे करतो. अगदी दरवर्षी तेच तेच असूनसुद्धा ते नवेपणाने, आळस, कंटाळा, चालढकल न करता, नवीन उन्मेषाने साजरे करतो. कशासाठी करतो? तर उत्सवी वातावरणामुळे जीवनानंद लुटण्याची ओढ वाढावी म्हणूनच. शिवाय मुलाबाळांवरही संस्कार व्हावे म्हणूनही. तसाच हा साहित्योत्सव व शब्दोत्सवाचा सण-सोहळा आपण साजरा करूया. पुन्हा पुन्हा साजरा करूया. साहित्याचा जागर करूया.