>> मुख्यमंत्री डॉ. सावंत; देश प्रथम ही भाजपती नीती
पन्नास वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही तो विकास भाजप सरकारने 14 वर्षात करताना प्रत्येक घरात समृद्धी आणण्याचे दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 2027 मध्ये 27 उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार असून देश प्रथम ही भाजपची नीती आहे. त्यामुळे त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपल्या राज्य आपला गाव व देश मजबूत करण्यासाठी सातत्याने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केले. भारतीय जनता पक्ष डिचोली मतदारसंघ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. दीनदयाळ भावनात आयोजित मेळाव्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रदेश सचिव सिद्धार्थ कुंकळकर, दयानंद कारबोटकर, अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, वल्लभ साळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, प्रदीप रेवोडकर, विश्वास गावकर आदी उपस्थित होते.
पुढे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी, कशाप्रकारे संघटन कौशल्य मजबूत करावे, देश, राज्याबाबत कार्यकर्त्यांनी कसे योगदान द्यावे याची माहिती दिली. राज्याच्या वेगवेगळ्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
डिचोलीतून भाजपलाच
विजयी करण्याचे आवाहन
डिचोली मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार विजयी करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मागील निवडणुकीत डिचोलीतून भाजप उमेदवार विजयी झाला नाही याची खंत आहेच. पण यापुढे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहावे. कार्यकर्ता दुर्लक्षित होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा असून डिचोलीत विकासाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आलेली आहे. आमदार डॉ. शेट्ये हे विकासाबाबत फास्टट्रॅकवर कार्यरत आहेत. मात्र त्यांना आपण थोडे स्लो राहा असे आवाहन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दामू नाईक यांचा सत्कार
गोवा प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्याने डिचोली भाजप मंडळ समितीतर्फे दामू नाईक यांचा गुलाब पुष्पांचा भव्य हार घालून मुख्यमंत्री डॉ. सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दामू नाईक यांनी, कार्यकर्ते ही आमची शक्ती असल्याचे सांगितले. जुन्या नव्यांना बरोबर घेऊन जाताना भाजप संघटना मजबूत करून आगामी निवडणुकांत मोठे यश प्राप्त करण्यासाठी अविश्रांत कार्य करावे असे आवाहन केले. देश प्रथम ही भाजपची संकल्पना असून देशहितासाठी सर्वानी संघटित राहण्याची गरज आहे.
भाजप मजबूत करित मोदीजींचे हात बळकट करणे गरजेचे असून डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सत्तावीसमध्ये सत्तावीस उमेदवार विजयी करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन केले.