उत्तर गोव्यातील पेडणे ते दक्षिण गोव्यातील काणकोण या दरम्यान येत्या दोन ते तीन वर्षांत ‘वंदे भारत’ ही जलद रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली.
पेडणे ते काणकोण या दरम्यान ही रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर उत्तरेतून दक्षिण व दक्षिणेतून उत्तर गोव्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होईल. या रेल्वेसेवेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
2025-26 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे गोव्यात आरोग्य पर्यटन, वारसा पर्यटन, पायाभूत सुविधांचा विकास आदी क्षेत्रात लाभ होणार असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, वृद्धाश्रम चालवणाऱ्या बिगर सरकारी संघटना, तसेच अन्य सामाजिक संस्था यांना समाजकल्याण खात्याच्या योजनेंतर्गत राज्य सरकारी मासिक 2 लाख रुपयांपर्यंतचा विशेष निधी देणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निधीचा वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
आयआयटीसाठी सर्व ती आर्थिक तरतूद केली जाणार आहे. गोव्यात आयआयटीसाठी कायमस्वरूपी संकुल उभारले जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेली जमीन लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयआयटीसाठी नेमकी कुठली जमीन संपादित केली जाणार ते स्पष्ट केले नाही. मिळालेल्या माहितीनुसार धारबांदोडा येथील बंद पडलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याची जागा आयआयटी संकुलासाठी संपादित केली जाणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.