अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत गोव्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने काल वर्तविली आहे. हवामान विभागाने गडगडाट आणि विजेच्या लखलखाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात १९ ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढण्यास प्रारंभ झाला आहे. चोवीस तासांत राज्यातील सर्वच विभागात पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे सर्वाधिक १.८८ इंच, काणकोण येथे ०.७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव, साखळी, ओल्ड गोवा, पणजी, पेडणे, म्हापसा, मडगाव, दाभोली येथेही पावसाची नोंद झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत ६.७३ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे सर्वाधिक ११.२० इंच पावसाची नोंद झाली आहे. या ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत पावसाचे सरसरी प्रमाण ३१ टक्के जास्त आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात १६५ इंच पावसाची नोंद झालेली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे २३ ऑक्टोबरनंतर गोव्यातील पावसाचे प्रमाण कमी होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.