येत्या आठवड्यापासून रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

0
142

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

राज्यातील कोविड-१९ रुग्णांवर येत्या आठवड्यापासून प्लाझ्मा थेरपी म्हणजेच रक्तद्रव उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती काल आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. रुग्णांवर गोमेकॉत प्लाझ्मा थेरपी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रक्तद्रव संक्रमणासाठी लागणारे यंत्र खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य खात्याला यापूर्वीच निधी मंजूर केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. बुधवारपासून कोविड-१९ ची लक्षणे दिसणारे एकूण १०६ रुग्ण मडगाव येथील कोविड इस्पितळात असल्याची माहितीही त्यांनी पुढे बोलताना दिली. या सर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या संसर्गातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा गोळा करण्याची जबाबदारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळावर सोपवण्यात आली असल्याचे राणे म्हणाले.

गंभीर कोविड रुग्णांनाच थेरपी देणार
राज्यात प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आपण गेल्या महिनाभरापासून प्रयत्नरत होतो. कोरोनाच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा गोळा करण्यासाठीची सगळी सोय यापूर्वीच करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. गंभीर अवस्थेतील कोविड रुग्णांनाच प्लाझ्मा थेरपी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून नवी दिल्लीतील ज्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती, अशा काही रुग्णांशी आपण बोललो व त्यांचा अनुभव जाणून घेतला, असे राणे यांनी स्पष्ट केले.

मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळात खाटांची उणीव नसल्याचे सांगून ज्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. कोविड इस्पितळात खाटा उपलब्ध आहेत, असे सांगून गरज भासलीच तर आणखी एका कोविड इस्पितळाची सोय केली जाईल, असे त्यांनी पुढे सांगितले.