>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या वर्गाबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबतचा एक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालावर विचारविनिमय केला जाणार आहे. विद्यालयीन वर्गाच्या विषयावर गरज भासल्यास संबंधितांशी पुन्हा एका चर्चा करून दहावी आणि बारावीच्या वर्गाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिक्षण खात्याला राज्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ, शिक्षण संस्था, शिक्षक, पालक व इतरांशी चर्चा करून विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. शिक्षण खात्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना अहवाल सादर केलेला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यासंबंधी वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे.
कोळसा हाताळणी कर
वसुलीस प्राधान्य
मुरगाव बंदरात कोळशाची हाताळणी करणार्या कंपन्यांकडील थकीत २०८ कोटींचा कर वसूल करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा कर वसूल करण्यात आलेला नाही. संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. हा थकीत कर वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.