येत्या अर्थसंकल्पात ‘स्वयंपूर्ण गोवा’वर भर

0
117

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

राज्याच्या आगामी वर्ष २०२१- २०२२ च्या अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा आणि प्राथमिक साधन सुविधांवर भर दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या विविध खात्याच्या अधिकार्‍यांशी अर्थसंकल्प पूर्व बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. आगामी अर्थसंकल्पाबाबत मंत्री, आमदारांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. विरोधी आमदारांकडून त्यांच्या प्राधान्यक्रमाबाबत सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय आहे. प्रशासकीय पातळीवर नवीन सुधारणांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आंतर खात्यातील प्रश्‍न सोडविण्याबाबत निर्णय जाणार आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक खात्याच्या कारभार, समस्यांची सविस्तर माहिती मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन गोष्टींचा समावेशाबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. मंत्री, आमदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी वित्त खात्याशी चर्चा करून अर्थसंकल्पाची अंतिम रूपरेषा निश्‍चित केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.