येणार्‍या सरकारने लता व दीनानाथांचे स्मारक साकारावे

0
32

>> मंगेशीतील श्रद्धांजली सभेत आवाहन

मंगेशी आणि गोव्याचे भूषण असलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गोव्याशी असलेल्या नात्याचे स्मरण येणार्‍या पिढ्यांना राहावे यासाठी गोव्यातील आगामी सरकारने त्यांचे व दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक साकारण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. आनंद वाघुर्मेकर यांनी काल मंगेशी येथे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या बाराव्या दिनी आयोजिण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत केले. लता मंगेशकर यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

लता मंगेशकर यांना त्यांच्या प्रिय मंगेशी गावाने एका श्रद्धांजली सभेद्वारे भावपूर्ण आदरांजली वाहिली. मंगेशीच्या मांगीरिश युथ क्लबच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई, ज्येष्ठ कोकणी कवी संजीव वेरेकर, सामाजिक कार्यकर्ते ऍड. राजू मंगेशकर, तसेच चित्रपट निर्मात्या व कलाकार ज्योती कुंकळकर सहभागी झाल्या होत्या. डॉ. मधु घोडकिरेकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व संचालन केले. या कार्यक्रमात दीनानाथ मंगेशकर यांचे कुटुंबीयही आवर्जून सहभागी झाले होते.
श्री. वाघुर्मेकर यांनी लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू सांगताना अशा व्यक्तीचे नाते मंगेशी आणि गोमंतकाशी आहे हे भूषणावह असल्याचे उद्गार काढले.

दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. पिता दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून लतादीदींकडे स्वाभिमान, साधेपणा, यासारखे गुण आणि देव, देश आणि संस्कृतीची भक्ती यांचा वारसा कसा चालत आला त्यावर त्यांनी विवेचन केले. दीनानाथ आणि लतादीदींच्या मंगेशी आणि गोव्याशी निगडित विविध प्रसंगांचेही त्यांनी स्मरण करून दिले. आपली लतादीदींची संस्मरणेही त्यांनी यावेळी सांगितली.

ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी लतादीदी व पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याकडे पित्याचा स्वाभिमानाचा वारसा कसा चालत आला आहे, त्याची एक आठवण विशद केली, तर ज्योती कुंकळकर यांनी आपण लतादीदींच्या घेतलेल्या मुलाखतीची आठवण सांगितली.

ज्येष्ठ कवी संजीव वेरेकर यांनी लता मंगेशकर यांची थोरवी सांगताना त्यांच्यासारख्या व्यक्ती हे मंगेशीचेच नव्हे, तर गोव्याचे भूषण असल्याचे प्रतिपादन केले.

राजू मंगेशकर यांनी आपल्या ‘मंगेशकर’ या नावामुळे जेथे जाईन तेथे लतादीदींसंदर्भात कशी विचारणा होते याविषयीचा किस्सा सांगून लतादीदींच्या थोरवीसंदर्भात प्रतिपादन केले. डॉ. घनश्याम म्हार्दोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. घोडकिरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मंगेशी व राज्याच्या विविध भागांतील मंगेशकरप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.