यूकेहून आलेल्या २४७ प्रवाशांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह

0
13

युकेहून शनिवारी दाबोळी विमानतळावर आगमन झालेल्या २४६ प्रवाशांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. प्रवाशांनाही योग्य त्या सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन प्रकाराबद्दल केंद्र सरकारने जो प्रोटोकॉल जाहीर केला आहे, त्यासंबंधी दाबोळी विमानतळावर योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ओमिक्रॉन प्रकारासंबंधी जोखीम असलेल्या बारा देशांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या बारा देशांसाठी खास प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. या बारा देशांच्या यादीमध्ये युकेचे नाव आहे. या देशातून येणा़र्‍या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी दाबोळी विमानतळावर खास सोय करण्यात आली आहे. ठराविक शुल्क भरून संबंधित प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते.

दाबोळी विमानतळावर आगमन झालेल्यांची प्रोटोकॉलनुसार चाचणी करण्यात आली. सर्वाचा अहवाल जरी निगेटिव्ह आला असला तरी त्यांना पुढील सात दिवस घरी विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा आपली चाचणी करावी लागली. त्या चाचणीचा अहवाल देण्याची गरज आहे.
जे प्रवासी जोखीम नसलेल्या देशांतून दाबोळी विमानतळावर येतील त्यांपैकी दोन टक्के प्रवाशांची रॅन्डम पद्धतीने आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यासंबंधी प्रोटोकॉलनुसार निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे चोवीस तासांत
३३ बाधित, एकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याचे निदर्शास येत आहे. काल मंगळवारी राज्यात कोरोनाचे ३३ रुग्ण सापडले आहेत. तसेच काल एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील बळींची संख्या ३३८८ एवढी असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४०४ झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ४१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के एवढे आहे. काल मंगळवारी कोरोनाची लक्षणे जाणवल्याने चार रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

काल कोरोनाची सौम्यलक्षणे जाणवल्याने २९ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. काल मंगळवारी राज्यात कोरोनासाठी ३११६ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली.
राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून तिथे रुग्णसंख्या आता वाढून ती ७३ वर पोहोचली आहे. तर नावेली ४२ आणि पणजीत सध्या ४० रुग्ण आहेत.