यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रवाना झाले. बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमधील ‘बीएपीएस’ मंदिराचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर येत्या 1 मार्चपासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
या दौऱ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर पोस्ट केली असून, त्यात या दौऱ्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. अबुधाबीची राजधानी अबू मुरैखामध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराला एकूण 7 शिखरे आहेत. या प्रत्येक शिखरामध्ये हिंदू देव-देवतांच्या कथा, शिकवण चित्र वा प्रतिकृतींच्या माध्यमातून दर्शवण्यात आल्या आहेत. गेल्या 3 वर्षांपासून राजस्थान व गुजरातमधील तब्बल 2 हजार कारागीर हे मंदिर बांधण्यासाठी राबले आहेत.