युवा धोरण विधानसभेत सादर

0
107

युवक ही या देशाची खरी शक्ती असल्याने त्यांच्यात राष्ट्रीयत्व, सामाजिक सहिष्णूता निर्माण करून नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना तत्पर बनविण्याच्या हेतूने क्रीडा व युवा व्यवहार खात्याने तयार केलेले युवा धोरण काल सभागृहात सादर केले. १५ सप्टेंबरपर्यंत जनतेकडून सूचना स्वीकारतील तर त्यानंतर ऑक्टोबर दरम्यान हे धोरण अधिसूचित करतील, असे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.
युवकांमध्ये समानता व एकमेकांविषयीचा आदरभाव निर्माण करणे, शाश्‍वत पद्धतीने पर्यावरणचे संवर्धन करण्याबाबत जागृती, विज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी उपक्रम राबविणे, स्थानिक युवकांना रोजगार निर्माण करणे, त्याचप्रमाणे अन्य भागातून नोकरी व्यवसायासाठी येथे येणार्‍या युवकांविषयी त्यांच्यात सामंजस्याची भावना तयार करणे, त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा, नेहरू युवक केंद्र, स्काऊट, एनसीसी, रेडक्रॉस या संस्थांची मदत घेणे, यावर या धोरणात भर दिला आहे. या धोरणाच्या माध्यमातून युवकांसाठी तीन टप्प्यात उपक्रम राबविले जातील. ताबडतोब हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांमध्ये परिसंवाद, कार्यशाळा व वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, योग शिक्षणाविषयी जागृती करणे, आध्यात्मावरील शिबिरे, समुपदेशन गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करणे आदी कार्यक्रम पहिल्या टप्प्यात असतील. दुसर्‍या टप्प्यात विद्यार्थी नसलेल्या युवकांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करणे, पारंपरिक खेळांचे आयोजन, क्रीडा मेळावे, तसेच नागरी कायद्याचे ज्ञान युवकांना देण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, यावर भर दिला आहे तर तिसर्‍या टप्प्यात गोवा राज्य युवा कल्याण मंडळाची स्थापना, तालुका पातळीवर युवकांसाठी रिसोर्स केंद्रे उघडणे, माहितीसाठी संकेत स्थळे तयार करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान ङ्गहबफ स्थापन करणे, युवकांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, पूनर्वसन केंद्रांची स्थापना करणे, युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी पूनर्वसन केंद्रे स्थापन करणे यावर भर दिला आहे.