- पौर्णिमा केरकर
प्रेम प्रगल्भ असते. ते जगणं शिकवते. मला जी व्यक्ती हवीहवीशी वाटते, जिच्यावर माझं प्रेम आहे, ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही असो, ती सुखी राहो ही मनोकामना कधीच मनाला निराश करत नाही.
थोर देशभक्त, क्रांतिकारक गळ्याभोवती आवळला जाणारा फास हा फुलांचा हार समजून हसत हसत फासावर चढले. अवघ्या तेवीस वर्षांचे भगतसिंग! २८ सप्टेंबर हा या हुतात्म्याचा जन्मदिवस. याच दिवशी गोव्याच्या वर्तमानपत्रांत बातमी येते ती दोन कोवळ्या युवांच्या मृत्यूची. हे प्रेमीयुगुल. अशा बातम्या वर्तमानपत्रांना आणि समाजाला काही आगळ्यावेगळ्या नाहीत. आजकाल अशा बातम्या रोजच्याच झाल्या आहेत. त्यामुळे त्यात काही स्वारस्य वाटत नाही. काही काळासाठी परिणाम होतो तो कुटुंबीयांवर… जवळच्या नातेवाईकांवर. काळ हे सर्वच गोष्टींवरील प्रभावी औषध असल्याने कालांतराने अशा घटना विस्मृतीतच जातात. ही घटनाही तशीच आहे. असे असले तरी यावर लिहावेसे वाटते. लिहून मन हलके करावेसे वाटते.
अलीकडे कोणालाच वेळ नाही अशा घटनांवर विचारमंथन करण्यासाठी. माझी पिढी वाढली- घडली ती देशभक्तांचा, क्रांतिकारकांचा, विचारवंतांचा, शौर्यवंतांचा, संत-महंतांचा आदर्श नजरेसमोर ठेवून! साने गुरुजींनी प्रेमाची भाषा शिकविली. प्रेम म्हणजे सेवा… प्रेम म्हणजे त्याग… प्रेम ही एक निःस्वार्थी, अकलंकित भावना. ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही असो, ती नेहमीच सुखी-समाधानी राहो, अशी नितळता त्यात प्रतिबिंबित होते. परंतु अलीकडे ही भावनाच नष्ट होत चालली आहे. मुळात प्रेम कशाशी खातात हेच माहीत नसताना प्रेम या उदात्त भावनेचा चेहरामोहरा युवामनांनी बदलून टाकला आहे. ज्या वयात भगतसिंगसारख्या युवकांनी देशासाठी आत्मबलिदान देण्याची स्वप्ने पहिली, त्याच वयात स्वातंत्र्याच्या कालखंडातील नवी पिढी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या नावाखाली एकमेकांचे गळे घोटण्यासाठी आसुसलेली दिसते. तू माझी झाली नाहीस तर कोणाचीच होता कामा नये, ही एक बाजू तर तुझ्यासारखे मला छप्पन मिळू शकतील ही दुसरी बाजू.
केपे तालुक्यातील कावरे गाव किंवा खेडे पाडी गाव. ही दोन्ही गावे निसर्गसमृद्ध. आदिवासी वेळीप समाजाची सांस्कृतिक, नैसर्गिक समृद्धी येथे भेट दिलेल्यांना अचंबित केल्याशिवाय राहात नाही. नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली अनिशा आणि घरीच असलेला सर्वेश यांची अशीच एका नकळत्या क्षणी भेट होते. पुढे मग या भेटीगाठी वाढत जातात आणि वाटते की आपण दोघेही आता एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. हे असते खरेतर फक्त आकर्षण!
कुमारवयीन वय… भोवतालचे सर्व जग गुलाबीच भासते. आकर्षणात आकंठ बुडताना घरची, आपली माणसे आठवत नसतात. आता तर अशा जोड्या शालेय जीवनापासूनच जुळतात, जुळवल्या जातात.
मग या कुमारवयीन शालेय जीवनाची वाटचाल करणार्या मुलांची पालकांशी, शिक्षकांशी खोटे बोलण्याची, सबबी सांगण्याची सवय वाढतच जाते. बर्याच पालकांना आपली मुले काय करतात, कोठे जातात, त्यांची मित्रमंडळी कोण याविषयी माहिती नसते. शिवाय कावरे, खेडे पाडीसारखी दुर्गम पण निसर्गसमृद्धी असलेली गावे आजही शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, अज्ञान, दारिद्य्र यांच्या विळख्यात सापडली आहेत. आताची पिढी शिकत आहे, पण या शिक्षणामागचा संस्कार, त्यातून येणारे स्वावलंबन, ज्या परिस्थितीत आपण आहोत ती बदलवून टाकण्याचे सामर्थ्य इथे दिसत नाही. हे फक्त या गावापुरतेच मर्यादित नाही तर सधन कुटुंबे, शहरांत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. फरक असेल तो वरवरच्या आधुनिक राहणीमानात, आर्थिक स्थैर्यात! कुमारवयीन मुलांचे प्रश्न अधांतरीच राहतात. बर्याचदा अशा दुर्गम गावात जिथे कोणत्याही सुविधा नाहीत. आरोग्याच्या समस्या घेऊन शहराच्या ठिकाणी जायचे तेही पायपीट करून तर संपूर्ण दिवस वाया जातो. उजाडणारा प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्यात पोटापाण्याची चिंता घेऊनच उजाडतो. अशा पार्श्वभूमीवर मुलांसाठी वेळ ही कल्पनाही न केलेली बरी. उच्च शिक्षण, चांगले विचार घेऊन पुढे जाताना गाव बदलण्याची स्वप्ने, हे सर्व हळूहळू एकेक करीत वाटेत कधी गळून पडतात ते लक्षातही येत नाही. प्रेमभंगाच्या वैफल्यातून केलेले खून ही आता गोव्याची ओळख बनत चालली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात असे गुन्हे घडत आहेत.
प्रेम आणि आकर्षण यांच्यातील फरक लक्षात घेतला जात नाही. आता तर सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र मोबाईल हातात असल्याने ऑनलाईन वर्गाची सबब सांगून घरात सर्वांसमक्षसुद्धा आपल्या आवडत्या व्यक्तीशी चॅटिंग केली तरी पालकांच्या कोठे लक्षात येते? जे वय उच्च शिक्षण घेण्याचे, करियर करून स्थिरस्थावर होण्याचे, आईवडिलांच्या मेहनतीचे पांग फेडण्याचे, त्याच वयात अलीकडे ही कुमारवयीन पिढी बॉयफ्रेंड,गर्लफ्रेंडच्या चर्चा करताना दिसते. एका बाजूला आपल्या जीवनात आपले आईवडील सर्वस्व आहेत, त्यांच्याशिवाय जगणं व्यर्थ अशा आशयाचे स्टेटस, आपल्या माणसांना आलिंगन देऊन त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखविण्याचे नाटकी तंत्र अवलंबित असलेली ही पिढी पालकांना अंधारात ठेवून, त्यांच्याशी खोटे बोलून, वागून अशा तकलादू प्रेमात गुरफटून जातात. या पिढीला याच वयात भगतसिंगच्या पिढीला पडत असलेली स्वप्ने पडत नाहीत. मान्य आहे की आता आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, पण याचा अर्थ असा नाही की देशाला कोणत्याच समस्या भेडसावत नाहीत. पर्यावरण, बेरोजगारी, व्यसने अशा कितीतरी समस्या आहेत. प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो.
या समस्या जाणून घेत निदान आपण तरी सुजाण नागरिक बनूया ही भावना निर्माण व्हायला हवी. ती होत नाही याचीच खंत वाटते. अकरावी-बारावीच्या मुलांना शिकवत असताना आता तर या संभाव्य धोक्यांची जाणीव तीव्रतेने होते. एरव्ही विद्यार्थी वर्गात नजरेसमोर असायचे. तेव्हा डोळ्यात डोळे घालून बोलता यायचे. शिक्षकांची तळमळ विद्यार्थ्यांच्या काळजाला भिडायची. सर्वच्या सर्व नाहीत तर थोडे तरी विद्यार्थी बदलायचे. जीवनात अशा आकर्षणापलीकडे वेगळे जग आहे, तिथे वाचन, मनन, चिंतन गरजेचे आहे. अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत जी निव्वळ समाजाच्या हिताचाच विचार करतात. आपला वर्तमान इतरांच्या भविष्यासाठी बहाल करतात. ती आहेत म्हणून तर आपले भविष्य टिकून आहे ही जाणीव जरी हृदयकुपित जपली तरी जगण्याला भिडण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. परंतु प्रत्यक्षात दिसणारे चित्र भयावह वाटते.
आता तर या ऑनलाईन शिक्षणप्रणालीत प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर शिक्षकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतो. मनात इच्छा नसतानाही मुलांच्या स्टेटसवर लक्ष जाते. त्यात असते दिल, प्यार, यारचीच भाषा! पूर्वी मुलींसाठी पालक मंडळी किंवा एखादा मध्यस्थ स्थळ घेऊन यायचे. संसार जरी मुलीला करायचा असला तरी निवड पालकच करायचे. अजूनही लोकमनाची मानसिकता तेवढीशी बदलली नसली तरी शिक्षणाने मुलीला विचाराने सक्षम होण्याची वाट मोकळी करून दिलेली आहे. हा मोकळेपणा अवेळी बंधनात अडकण्यासाठी वापरला तर मुलींचे पुढचे भवितव्य धूसर आहे. वय, शिक्षण आणि अनुभवातून आलेली परिपक्वताच या अशा वाटेवरून जाताना कुमारवयीन मुलांना तोल सावरून न भरकटता चालायला शिकवेल.
या वयाला हवे वाचन, मनन, चिंतन… अनुभवातून येणारी प्रगल्भता आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव करून देते. पालकांप्रति, समाजाप्रति प्रेम वाटल्याने वाढते… उन्नत होते. आणि एकदा का मन उन्नत झाले की सहसा चुका होत नाहीत. सर्वेशची आत्महत्या आणि त्यापूर्वी त्याने अनिशाचा केलेला खून हे क्रौर्य म्हणजे प्रेम असूच शकत नाही. कुमारवयीन पिढीला गरज आहे मार्गदर्शनाची! जीवन खूप सुंदर आहे. करण्यासारख्या खूप गोष्टी सभोवताली आहेत. प्रेम प्रगल्भ असते. ते जगणं शिकवते. मला जी व्यक्ती हवीहवीशी वाटते, जिच्यावर माझं प्रेम आहे, ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही असो, ती सुखी राहो ही मनोकामना कधीच मनाला निराश करत नाही. खूप गरज आहे कुटुंब, समाज, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्थांनी मिळून या वयोगटाला समुपदेशन करण्याची! अन्यथा युवा म्हणजे प्रेमभंग, वैफल्य, आत्महत्या, खुन्नस, व्यसनाधीनता, दंगली ही आणि अशीच व्याख्या समाजमनात निर्माण होईल.