>> भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांचा आरोप
तत्कालीन यूपीए सरकारने त्यांच्या सत्ताकाळात विविध कंपन्यांना ३६ लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जमाफी दिली असा आरोप काल भाजपचे राष्ट्रीय महासचिव श्रीकांत शर्मा यांनी केला. विद्यमान भाजप सरकार निवडक उद्योगांची भलावण करीत असल्याचा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळला.
कॉंग्रेस पक्ष हा दलालीवर चालणारा पक्ष असल्याचा आरोपही शर्मा यांनी यावेळी केला. केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहार धोरणामुळे निधी जमा करण्याचे मनसुबे अपयशी ठरणार असल्याने कॉंग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त बनल्याचा दावाही त्यांनी केला.
यूपीएच्या १० वर्षांच्या सत्ता काळात अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण १३२ टक्क्यांवर गेले व त्या सरकारने कंपन्यांना ३६ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी बहाल केली असे शर्मा म्हणाले. मात्र या आकड्याविषयी तपशिलवार स्पष्टीकरण त्यांनी केले नाही. असे असूनही या आर्थिक दरोडेखोरीविषयी राहुल गांधी बोलत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तथ्यहीन आरोप करत असल्याचे सांगताना शर्मा यांनी राहुल गांधी यांना लक्ष वेधून घेण्याचा रोग जडला असल्याची टिका केली. राहुल यांनी आरोप करण्याआधी गृहपाठ करावा आणि शक्य झाल्यास आपल्या मतांविषयी माजी वित्त मंत्री चिंदबरम यांच्याकडे खातरजमा करावी असा सल्लाही त्यांनी दिला. मोदी यांनी बिर्ला व सहारा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याविषयीच्या आरोपाबद्दल छेडले असता शर्मा यांनी सांगितले की त्यावेळी केंद्रात यूपीएचे सरकार होते व त्यांच्या ताब्यात सीबीआय, ईडी व प्राप्ती कर खाते या सर्व यंत्रणा होत्या. त्या यंत्रणांना याबाबत काहीच सापडले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कामगिरीविषयी राहुल गांधी मौन का बाळगून आहेत असा सवाल शर्मा यांनी केला. त्या राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारी फोफावली असूनही तेथील सरकारला राहुल गांधी पाठिंबा देतात असे ते म्हणाले.