पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आजच्या आमसभेतील आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. मात्र भारताने आधी पुढाकार घेतल्याशिवाय भारताबरोबर द्विपक्षीय बोलणी होण्याची शक्यता पाकिस्तान सरकारकडून फेटाळण्यात आली.
वरील विषयांच्या अनुषंगाने पाकिस्तानचे विदेश सचिव अजाझ अहमद चौधरी यांनी पत्रकारांना माहिती दिली. संयुक्त राष्ट्र आमसभेत पाकिस्तानने कश्मीरचा मुद्दा मांडू नये यासाठी कोणतेही कारण नाही असे चौधरी यावेळी म्हणाले. काश्मीर प्रश्न निकालात काढण्यासाठी सार्वमत हा उपाय असल्याची अजूनही पाकिस्तानची धारणा असल्याचे ते म्हणाले. उभय देशांदरम्यान कोणत्याही स्वरुपाची बोलणी सुरू करण्याची जबाबदारी भारताची आहे. असे सांगून याआधी विदेश सचिव पातळीवरील बोलणी भारतानेच थांबवली होती असे ते म्हणाले. द्विपक्षीय बोलण्यासाठी भारताने पुढाकार घेतला तर पाकिस्तान त्या बाबत विचार करील असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल
आपल्या पाच दिवसीय अमेरिका दौर्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल येथे आगमन झाले. यावेळी अमेरिकेला त्यांनी नैसर्गिक जागतिक भागीदार असे संबोधले.
फ्रँकफर्ट येथे त्याआधी रात्री मुक्काम करून एअर इंडियाच्या खास बोईंग विमानाने येथे दाखल झाले. आज संयुक्त राष्ट्र आमसभेत त्यांचे भाषण होणार आहे. येथे दाखल होण्याआधी मोदी यांनी आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.