गोव्याची गेल ठरली प्रिन्सेस
गोमंतकीय सुंदरी गेल दा सिल्वा हिने दक्षिण अमेरिकेतील ‘मिस युनायटेड कॉन्टीनेन्टस’ या स्पर्धेतील प्रथम प्रिन्सेस बनण्याचा मान मिळविला.२१ वर्षीय कुमारी गेल हिचे काल संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आगमन झाले तेव्हा कुटुंब आणि मित्र परिवाराने तिचे जोरदार स्वागत केले. १३ सप्टेंबर रोजी दक्षिण अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम प्रिन्सेस बनण्याचा मान तिने राखला. आतापर्यंत अमेरिकेतील सुंदरी या किताबाच्या मानकरी असायच्या.
काल दाबोळी विमानतळावर आगमन होताच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण आपली पुढील वाटचाल ‘बॉलीवूड’कडे करणार असल्याचे बोलून दाखवले. भारतात झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत दुसर्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करून गेल इक्वेडरला मीस युनायटेड कॉन्टीनेन्टस स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या कोणीच किताब प्राप्त केला नव्हता. पणजी येथील धेंपो महाविद्यालयात बीबीएच्या दुसर्या वर्षात शिकणार्या गेल हिने आपण शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सांगितले. आपण आपल्या यशावर खूष असल्याचे ती म्हणाली. तिच्या यशाबद्दल तिच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला. तसेच लहानपणापासूनचे तिचे स्वप्न ते तिने साकार केल्याचे ते म्हणाले.