युद्धाचे ढग

0
12

इराणने गेल्या एक ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या दोनशेहून अधिक क्षेपणास्रांच्या माऱ्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने इराणच्या काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याने मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. इस्रायलच्या ह्या प्रतिहल्ल्यात इराणचे जरी मर्यादित नुकसान झालेले असले, तरीदेखील इस्रायलच्या ह्या हल्ल्यालाही पुन्हा प्रत्युत्तर देण्याची धमकी इराणने दिलेली असल्याने त्यातून प्रादेशिक युद्धाचा भडका उडू शकतो. गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलमध्ये केलेल्या रानटी हल्ल्यानंतर गाझामध्ये रणकंदन सुरू झाले, ते अजून संपुष्टात आलेले नाही. जवळजवळ अर्ध्याहून अधिक गाझापट्टी आजवर बेचिराख झाली आहे. हमासच्या भूमीगत तळांचे मोठे नुकसान इस्रायलने केले, त्याच्या अनेक नेत्यांना लक्ष्य केले, तरी हमास अजून संपलेली नाही. इतर देशांतून वावरणारे हमासचे हिज्बुल्ला, हौथींसारखे पाठीराखे इस्रायलला अनेक आघाड्यांवर लढण्यास भाग पाडत राहिले. येमेनमधून हौथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्र हल्ले चढवले. लेबनॉनमधून इराण समर्थित हिज्बुल्लाने मोठी आघाडी उघडली. सीरियामधून देखील इस्रायलला लक्ष्य करण्यात आले. हे सगळे कमी की काय म्हणून शेवटी इराणनेच अत्यंत नाट्यमयरीत्या इस्रायलवर थेट क्षेपणास्त्रे चालवली. गेल्या एक ऑक्टोबरच्या त्या भीषण क्षेपणास्र हल्ल्याला इस्रायलच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने निकामी केले, परंतु ह्या हल्ल्याचा सूड आपण योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घेऊ असा इशाराही दिला होता. त्या इशाऱ्याबरहुकूम इस्रायलने इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करणारा प्रतिहल्ला नुकताच चढवला. मात्र, हा प्रतिहल्ला करताना तो मर्यादित प्रमाणातच असेल व त्यातून युद्धाला तोंड फोडण्याची संधी इराणला मिळणार नाही याची पुरती खबरदारी घेऊनच इस्रायलने हा मर्यादित स्वरूपाचा प्रतिहल्ला चढवल्याचे दिसते. इस्रायलने चढवलेले हल्ले अत्यंत विचारपूर्वक चढवले गेल्याचे दिसते. मुख्यतः इराणच्या क्षेपणास्त्रांसाठी लागणारे इंधन जेथे तयार केले जाते, त्या लष्करी तळाला आणि लढाऊ वापराच्या द्रोन निर्मिती प्रकल्पांना इस्रायलने लक्ष्य केले. म्हणजेच इराणला आपल्यावर क्षेपणास्त्र किंवा द्रोन हल्ले करता येऊ नयेत ह्याचा इस्रायलने बंदोबस्त केला. इस्रायलने ह्या प्रतिहल्ल्याचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे जारी केली आहेत, ती पाहिली तर इराणवर हल्ले चढवलेली ही अत्याधुनिक एफ 35 लढाऊ विमाने महिला वैमानिक चालवत असल्याचे दिसते. खरे तर इस्रायलने ठरवले असते, तर तो इराणच्या तेलविहिरींनाही लक्ष्य करू शकला असता, कारण इराणपाशी जी संरक्षक यंत्रणा आहे, ती अत्याधुनिक एफ 35 विमानांना अटकाव करूशकत नाही. त्यामुळे इस्रायल सध्याच्या प्रतिहल्ल्यापेक्षा अधिक जबर प्रतिहल्ला सहज चढवू शकले असते, परंतु त्याने तसे केलेले दिसत नाही. इस्रायलने अगदी नेमकेपणाने आपल्याला हव्या त्याच लष्करी तळांवर हल्ले चढवले. इराणच्या अणुयोजनेशी संबंधित शास्त्रज्ञांसही त्याने ठार मारण्यास कमी केलेले नाही. विशेष म्हणजे क्षेपणास्त्रांसाठी इंधननिर्मिती करणारा प्रकल्प उद्ध्वस्त करून इस्रायलने इराणच्या वर्मावरच घाव घातला आहे. इस्रायलच्या पाठीशी असलेल्या अमेरिकेने ह्यासंदर्भात आणखी प्रत्युत्तर न देण्यास इराणला बजावले आहे, परंतु पुन्हा प्रतिहल्ल्याचा इशारा इराणने दिला आहे. खरोखरच पुन्हा एकवार इस्रायलला इराणने लक्ष्य केले तर मात्र परिस्थिती बिघडू शकते. इराणला रशियाचे समर्थन आहे हे तर स्पष्ट दिसतेच आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे युक्रेनमध्ये पडद्याआडून अमेरिकाच रशियाशी लढते आहे, तसाच प्रकार मध्यपूर्वेतही होऊ शकेल. इस्रायल आणि इराण हे दोघांचे मोहरे असतील. भारताने ह्यासंदर्भात तटस्थ भूमिका स्वीकारलेली आहे आणि इस्रायल व इराण ह्या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असे म्हटले आहे, कारण हे दोन्हीही भारताचे मित्रदेश आहेत. पाकिस्तान – चीन हातमिळवणीला शह देण्यासाठी ग्वादार बंदराला काटशह म्हणून इराणच्या मदतीने भारताने छाबहर बंदर विकसित केलेले आहे. भारताचे जवळचे इराणशी व्यापारी संबंधही आहेत आणि तेल व नैसर्गिक वायूवाहिनीबाबत भारताने करारही केलेला आहे. इस्रायल हा तर भारताचा मित्रदेशच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानप्रणालींसाठी भारत इस्रायलचे वेळोवेळी साह्य घेत आलेला आहे. शिवाय इस्रायल – इराण थेट संघर्ष भडकला, तर त्याचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसू शकतो, कारण ते एक प्रकारचे उघड प्रादेशिक युद्धच असेल आणि त्याच्या आढून दोन जागतिक महासत्ता एकमेकांसमोर उभ्या राहतील. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीने इराणला इस्रायलवर प्रति वार न करण्याचा इशारा दिला आहे, त्याचा अर्थच हा आहे. जोवर हमास, हिज्बुल्ला, हौथी अशा दहशतवादी संघटनांना इस्रायलद्वारे लक्ष्य केले जात राहिले आहे, तोवर युद्धाचे स्वरूप मर्यादित राहील, परंतु जेव्हा इराणसारखा देशच इस्रायलशी आमनेसामने येईल, तेव्हा ते दुसरे तिसरे काही नव्हे, तर प्रकट युद्धच असेल. शेवटी युद्ध हे वाईटच असते, मानवजातीसाठी घातकच असते. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागू शकतात.