- प्रा. रमेश सप्रे
या महापुरुषाच्या, खरं तर युगपुरुषाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभर कार्यक्रम साजरे केले जातील. पण ते कंठाळी घोषणा, कंटाळवाण्या भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. एखाद्या टुथपेस्ट किंवा लिप्स्टिकसारखे दिखाऊ असू नयेत. या कार्यक्रमातून अर्थपूर्ण, कल्याणकारी उपक्रम निर्माण व्हावेत, हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली ठरेल!
‘आजपासूनच्या तिसर्या पिढीतील लोकांचा या पृथ्वितलावर महात्मा गांधींसारखी व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली यावर विश्वासदेखील बसणार नाही’- हे उद्गार जगविख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईनचे आहेत. लुई फिशर नावाच्या लेखकाने गांधीजींच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रांतील संपूर्ण जगातील नामवंत व्यक्तींच्या प्रतिक्रिया एका ग्रंथात संकलित केल्या आहेत. त्यात आईन्स्टाईनने महात्माजींना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे.
१९४८ साली घडलेल्या या घटनेनंतर सुमारे पन्नास वर्षांनी नवं सहस्रक उजाडलं. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगातील अनेक वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, अन्य सामाजिक संस्था यांनी ‘मॅन ऑफ द् मिलनियम्’ म्हणजे गेल्या हजार वर्षांतील जगाच्या इतिहासावर नि एकूणच विचारसरणी अन् जीवनपद्धतीवर सर्वाधिक प्रभाव पाडलेल्या व्यक्तींच्या याद्या (नावं) प्रकाशित केल्या, त्यांपैकी जवळजवळ सर्व याद्यांतील प्रथम पाच व्यक्तींच्या नावांत महात्मा गांधींचा समावेश होता.
अगदी अलीकडे विविध क्षेत्रांतील जागतिक विचारवंतांनी एकत्र येऊन अनेक देशांचा प्रवास नि ग्रंथांचा अभ्यास करून त्यावर आधारित केलेल्या विचारमंथनाचं नवनीत होतं गांधी तत्त्वज्ञान नि गांधीमार्ग (गांधियन वे ऑफ लाइफ). गांधीवाद (गांधीइझम्) नव्हे. या विचारमंथनाचा विषय होता- ‘विश्वशांतीचं भवितव्य.’
जगातील सर्वोच्च अशा नोबेल पारितोषिकासाठी जेव्हा अर्थशास्त्र या ज्ञानशाखेचा नि कार्यक्षेत्राचा समावेश केला तेव्हा गुन्नार मिर्डल यांच्या ‘एशियन ड्रामा’ या ग्रंथाचा प्रथम सन्मान केला. त्यानंतर या विचारवंताने अनेक व्याख्यानांत जगातील राष्ट्रपुरुषांना नि राष्ट्रीय धोरण ठरवणार्या बुद्धिवंतांना गांधींच्या विचारसरणीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तो एखाद्या द्रष्ट्याच्या भविष्यवाणीसारखेच बोलत होता.
त्यानंतर गाजलेल्या (केवळ वाचकांच्या दृष्टीने नव्हे तर विचारवंतांच्या दृष्टिकोनातून) शूमाकर नावाच्या अर्थतज्ज्ञाने लिहिलेल्या ‘स्मॉल इज ब्युटिफूल’ या ग्रंथाचा संदेश असाच होता.
या सर्वांची दृष्टी म. गांधीजींकडे केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावी राजकीय नेता एवढी संकुचित अर्थातच नव्हती. ते केवळ या महात्म्याच्या जीवनकार्याचं एक अंग होतं. याशिवाय अनेक तेजस्वी पैलू या अद्भुत दंतकथेसारख्या वाटणार्या व्यक्तिमत्त्वाला होते.
त्यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने यातील काही विशेष पैलूंवर सहचिंतन करू.
२ ऑक्टोबर १८६९ या दिवशी पोरबंदर येथे एका सामान्य गुजराती कुटुंबात मोहनदास (म्हणजेच भावी काळातील महात्मा गांधी) यांचा जन्म झाला. आईचं नाव पुतळीबाई नि वडिलांचं नाव करमचंद. पारंपरिक व्यवसाय किराणा मालाच्या दुकानाचा होता. पण गांधी (किंवा गंधी) या शब्दाचा अर्थ सुगंधी द्रव्यांचे व्यापारी असाही होतो.
मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव. मोहनदासचं शालेय शिक्षण पोरबंदर- राजकोट येथील विद्यालयात झालं. शालेय जीवनात त्यांची कामगिरी नेत्रदीपक नव्हती. सहज सांगायचं तर स्वामी विवेकानंदसुद्धा शैक्षणिक जीवनात एक सामान्य विद्यार्थीच होते. आपल्या वाणी-लेखणीने या दोन महामानवांनी ज्या इंग्रजी भाषेतून सार्या जगातील विचारवंतांवर प्रभाव पाडला त्या इंग्रजीत यांची शैक्षणिक परीक्षेतील कामगिरी साधारणच (ऍव्हरेज) होती. एका चरित्रकाराने याचा उल्लेख करून म्हटलंय, ‘…म्हणजे त्याही काळात शैक्षणिक कामगिरी आणि प्रत्यक्ष जीवनकार्यातील गुणवत्ता यांचा काहीही संबंध नव्हता.’ आज तर याविषयी विचारच न केलेला बरा. जीवनातील यशोगाथा (सक्सेस स्टोरिज) या केवळ ‘यशावर’ अवलंबून असण्याचा काळ दुसर्या महायुद्धानंतर मागे पडला. त्यावेळी यश मिळवण्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, गुणवत्ता (मेरिट), चारित्र्य अशा गोष्टींची आवश्यकता होती. आता ‘फ्रॉम झिरो टू हिरो’ होण्यासाठी साधनं आणि मार्ग (वेज् ऍण्ड मीन्स) यांचा विधिनिषेध राहिलेला नाही. भ्रष्ट व्यक्ती सर्वच क्षेत्रांत अग्रेसर होताना दिसतात, तर नेतेपदी पोचल्यावर सत्ता नि भ्रष्टाचार (सेवा नि सदाचार नव्हे) हाच एकसूत्री कार्यक्रम राबवताना दिसतात, ही खरी क्षणोक्षणी होणारी गांधीहत्या आहे. असो.
एक विशेष म्हणजे मोहनदासची आई ज्या कुटुंबातून आली होती ते होतं भक्तिसंप्रदायी ‘प्रणामी’ परंपरेतलं. या संप्रदायात भागवत, भगवद्गीता या ग्रंथांबरोबरच वेद, बायबल, कुराण यांच्यातील प्रभावी आचारसूत्रांचा समावेशही होता. अशा सर्वमतांचा आदर करणार्या विचारसरणीचा प्रभाव कळत-नकळत मोहनदासच्या बालमनावर निश्चित पडला होता. यात भर म्हणून त्याच्या जीवनावर झालेला सत्यवचनी हरिश्चंद्र नि मातृपितृभक्त श्रावणबाळ अशा चरित्रांचा खोल परिणाम. पुढे राजकीय जीवनाच्या धकाधकीत नि देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या धामधूमीतही हे बालपणीचे संस्कार जिवंत होते. गांधीजींनी लिहिलेल्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ (द स्टोरी ऑफ माय एक्स्पेरिमेंट्स विथ ट्रुथ) या त्यांच्या आत्मचरित्रात याचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं.
कोणाही नेत्याची राजकीय मतं नि धारणं याबद्दल टोकाचे मतभेद असतात. काळाच्या ओघात नंतर घडलेल्या ऐतिहासिक घटनांनी यातील विसंगती-सुसंगती लक्षात येतात. पण महात्मा गांधीजी हे केवळ राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व नव्हते. गांधीजींचं जीवन हे अनेक पैलू असलेला तेजस्वी हिरा होता, ज्याची पारख त्यांच्या चरित्राचा सर्वांगीण आणि तटस्थपणे विचार करणार्या अभ्यासकाला होते. दुर्दैवानं असे अभ्यासक आपल्या देशापेक्षा परदेशांतच अनेक आहेत ज्यांनी कोणत्याही रंगाचा चष्मा न घालता अभ्यास केलाय. यातील काही उद्बोधक पैलूंचे दर्शन त्यांच्या जीवनात घडलेल्या ज्ञात-अज्ञात प्रसंगांतून घेऊया.
गांधीजींचा सोपं पण वाचकांच्या विचारांवर प्रभाव पाडणार्या इंग्रजीत लेखन करण्यात हातखंडा होता. त्यांना इंग्रजी मातृभाषा असलेल्या ज्ञाती मंडळींनी ‘एमपी’ ही पदवी दिली होती. ‘एमपी’ म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट नव्हे तर ‘मास्टर ऑफ प्रेपोझिशन्स.’ प्रत्येक भाषेचं एक महत्त्वाचं अंग असतं शब्दयोगी अव्यय (प्रेपोझिशन). म्हणजे शब्दांना जोडून येणारे वर, खाली, जवळ, दूर असे शब्द. इंग्रजीत त्यांचा अचूक वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. नाहीतर जवळून गेलेली (पास्ड बाय्) व्यक्ती थेट स्वर्गवासीही (पास्ड अवे) होऊ शकते. असो. अशा सोप्या पण थेट मन आणि मस्तकाचा वेध घेणार्या इंग्रजीतील गांधीजींचं लेखन वाचलं मात्र पाहिजे. त्यांनी इंग्रजीबरोबरच गुजराती, हिंदी या भाषांतूनही लेखन केेलंय. ‘कंफ्लिट् वर्क्स ऑफ गांधीजी’ या महाकाय अनेक ग्रंथांचं वाचन सोडा निदान दर्शन तरी घेतलं पाहिजे. त्यांची धर्म, प्रार्थना, मौन, सहिष्णुता अशा विषयांंवरची छोटी अन् सोपी पुस्तकं तर ‘वाचलीच पाहिजेत’ अशा प्रकारची आहेत. दैवदुर्विलास म्हणजे यापैकी काहीही न वाचता ‘गांधीजी मुर्दाबाद’ किंवा ‘जिंदाबाद’ म्हणणारी असंख्य मंडळी आहेत. दोन्हीही प्रकारची मंडळी अप्रामाणिक नि दोषी आहेत. असो.
गांधीजींची शिक्षणविषयक चिंतनप्रणाली- मौलिक (मूलभूत), शिक्षण (बेसिक एज्युकेशन) म्हणून अभ्यासली जाते. विशेष म्हणजे शैक्षणिक तत्त्वज्ञानात मोलाची आणि मूलभूत भर टाकणार्या आधुनिक काळातील भारतीय शिक्षण तज्ज्ञांत गांधीजींचा समावेश अग्रक्रमाने होतो. पायाभूत किंवा मूलभूत शिक्षणपद्धतीची मुळे आपल्या मातीत, जीवनपद्धतीत नि संस्कृतीत घट्ट रुजलेली असायला हवीत. साहजिकच असं शिक्षण मातृभाषेतूनच सहज नि उत्स्फूर्त पद्धतीनं दिलं-घेतलं जातं. ही संकल्पनाच मुळात क्रांतिकारक होती. दुर्दैवानं ज्यावेळी गांधीजी ती स्पष्ट करून सांगत होते त्या काळात दुसरं महायुद्ध झालं. ते मध्यावर आलं तेव्हा इंग्लंडची सर्व बाजूंनी होणारी पीछेहाट पाहून गांधीजींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना ‘भारतातून चालते व्हा (क्विट इंडिया)’ हा निर्वाणीचा इशारा देणारं राष्ट्रव्यापी आंदोलन उभं केलं जे एखाद्या अरण्यात लागलेल्या आगीसारखं देशभर फैलावलं. त्या राजकीय धुमश्चक्रीत गुंतल्यामुळे ‘मूलभूत शिक्षण प्रणाली’चा सर्वांगीण नि सखोल विचार करणं राहून गेलं. नंतर त्याचे जे प्रयोग ‘बुनियादी तालीम’ म्हणून केले गेले त्यामागे गांधीजींची दूरदृष्टी नि चिंतन नसल्याने सारे असफल नि कालबाह्य ठरले. पण त्यातील प्राणसूत्र किंवा मध्यवर्ती कल्पना आजही बदलत्या स्वरूपात प्रभावी ठरू शकते. निदान ‘ग्रामस्वराज्य’ स्थापनेसाठी! ‘ग्रामराज्या’प्रमाणेच ‘रामराज्य’ हे गांधीजींचे आणखी एक स्वप्न होते. एका विचारवंताने मार्मिकपणे म्हटले होते- ‘ग्रामराज्यातून रामराज्याकडे जाण्यासाठी ग्रामराज्यातला ‘ग’ आधी काढला पाहिजे, तरच रामराज्याचं स्वप्न साकारेल.’ हा ‘ग’ म्हणजेच संकुचित, स्वार्थी, अहंकार (‘ग’ची बाधा म्हणजे गर्व- इगो)!
स्वराज्य, स्वभाषा, स्वदेश अशा त्रिसूत्रीतून खरं स्वातंत्र्य उगवेल अशी गांधीजींची ठाम श्रद्धा होती. आज आपण या सार्यांपासून किती दूर आलो आहोत नि किती वेगाने दूर जात आहोत याचा विचार राजकीय क्षेत्रातील जरी नाही तरी शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मंडळींनी, शिक्षकांनी जरूर केला पाहिजे असे नाही वाटत?
हल्ली संगणकीय महाजालातून (इंटरनेट) महान व्यक्तींच्या जीवनपटाविषयी अक्षरशः हिमालयाहून मोठ्या, आकाशाहून असीम अशा माहितीचा महापूर ओसंडत असतो. त्यातील एका लेखाच्या उपशीर्षकात गांधीजींना ‘एक महान राजनैतिक तथा आध्यात्मिक नेता’ असे म्हटलेय ते अनेक दृष्टींनी योग्य आहे.
रामाचं चरित्र नि रामनाम यावर गांधीजींची अपार श्रद्धा होती. त्यांचे अखेरचे शब्द ‘हे राम!’ असे होते. ही तर आध्यात्मिक दृष्टीने मोठी गोष्ट आहे. ‘अंते मतिःसा गति’ असा सिद्धांत गीतेतही सांगितलाय- ‘अंतकाले च मां एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्’ असं भगवंतानी मुक्तिदायी मृत्यूविषयी म्हटलंय, तसाच अंत गांधीजींचा अतिशय आकस्मिक रीतीने झालेल्या मृत्यूच्या क्षणीही रामनामात झाला. ‘रघुपती राघव राजाराम, पतितपावन सीताराम’ हे त्यांचं नित्यप्रार्थनेतील भजन होतं. त्यातील ‘सबको सन्मती दे भगवान’ ही ओळ हृदयस्पर्शी अन् चिरकालीन सत्य सांगणारी आहे.
‘आपण आजारी का पडलो?’ यावर गांधीजींचं सदैव चिंतन सुरू असे. त्यात एक विशेष घटक असे तो म्हणजे रामनामाचा विसर. याविषयी अधिक मार्गदर्शनासाठी त्यांचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे अर्थात गीतेला आई (गीताई) मानणार्या आचार्य विनोबा भावे यांच्याशी. विनोबांचं नाव तसं विनायक. पण पहिल्या भेटीतच गांधीजी म्हणाले, ‘अरे, तू महाराष्ट्रातून आलायस ना? मग जसा विठोबा- ज्ञानोबा- तुकोबा तसा तू आमचा विनोबा!’ आश्चर्य म्हणजे हे नाव विनोबांना आयुष्यभर चिकटले. एवढेच नव्हे तर त्यांच्यातील संतपणाचा परिचय करून देत राहिले. महान व्यक्तींचं सारं महान असतं हे खरं, पण हे समजण्यासाठी आपण स्वतःला ‘लहान’ मानलं पाहिजे.
असाच एक प्रसंग सांगितला जातो. गांधीजींना ‘महात्मा’ पदवी लोकांनी दिली त्याचे अनेक प्रसंग सांगितले जातात. पण त्या पदवीला प्रतिष्ठा नि लोकमान्यता प्राप्त झाली ती या प्रसंगापासून असं म्हणायला हरकत नाही. त्याचं असं झालं-
आपल्या भारतभ्रमणातून गांधीजी ज्यावेळी रवींद्रनाथ टागोरांच्या भेटीसाठी शांतिनिकेतनमध्ये गेले तेव्हा हात पसरून अभिवादन करत रवींद्रनाथ उद्गारले, ‘आओ महात्मा!’ तत्क्षणी त्यांना नमस्कार करत गांधीजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘नमस्ते गुरुदेव!’ तो ऐतिहासिक क्षण नुसता डोळे मिटून मनाच्या पडद्यावर पाहिला तरी रोमांचित व्हायला होते. अर्थातच त्यासाठी संवेदनक्षमता हवी. त्यानंतर गांधीजी बनले महात्मा तर रवींद्रनाथ बनले गुरुदेव!
विनोबा नि गांधीजी यांच्यातील संबंध अभ्यासण्यासारखे चिंतनीय आहेत. ‘रामनाम’ ही उपचारपद्धती (थेरपी) म्हणून कशी वापरावी याविषयी झालेल्या पत्रव्यवहाराची एक पुस्तिका आहे ‘रामनाम’ नावाची. ‘आपला पहिला सत्याग्रही’ म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली होती. तुरुंगात गेल्यावर संस्कृत भाषेचा अभ्यास नि गीतापठण व चिंतन करण्यासाठी म्हणून गांधीजींनी विनोबांनाच मार्गदर्शक म्हणून निवडले होते.
साप्ताहिक उपवास नि मौन ही केवळ राजकीय हत्यारं म्हणून गांधीजींनी वापरली नाहीत, तर आत्मशुद्धीची नि सत्याग्रहासाठी शक्ती प्राप्त करण्याची ती साधनं होती. उपवासानं देहाची शुद्धी तर मौनानं चित्तशुद्धी असं ते व्रत होतं. आजच्या जीवनात निदान वानप्रस्थी, ज्येष्ठ नागरिकांनी तरी एक प्रयोग म्हणून हे करून पाहायला काय हरकत आहे? गांधीजींना अजून दोन नावांनी आपण ओळखतो. त्यातलं एक आहे बापूजी नि दुसरं आहे राष्ट्रपिता. दोघांचा अर्थ नि त्यामागची भावना एकच आहे. एक प्रसंग पाहूया.
लहान मुलांशी गांधीजींचं विशेष नातं होतं. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे साने गुरुजींचे सूत्र गांधीजी त्यांच्या आश्रमात जगत होते. अशाच एका बालसभेत एका छोट्यानं विचारलं, ‘बापूजी, तुम्ही अंगात सदरा का घालत नाही?’ यावर बापूजींनी विचारलं, ‘तुझे वडील कोण आहेत?’ जेव्हा सांगितलं गेलं की ते कापडाच्या गिरणीचे श्रीमंत मालक आहेत तेव्हा सद्गदित होऊन बापूजी म्हणाले, ‘तुझ्या पिताजींकडून पस्तीस कोटी सदरे आण, मग मीही घालीन सदरा.’ ही विचारसरणी घराघरातील पित्याचीच नाही का? म्हणून गांधीजी होते बापूजी नि राष्ट्रपिता!
त्यांनी सर्व मानवजातीसाठी (विशेषतः धोरणं आखून राबवणार्यांसाठी) एक जादूचा मंत्र (तालिस्मान- ताईत) दिलाय- ‘जेव्हा जेव्हा तुम्ही जीवनात एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला माहीत असलेल्या सर्वात दीनदुःखी माणसाचा चेहरा डोळ्यांसमोर आणा नि स्वतःला विचारा की माझ्या निर्णयामुळे या व्यक्तीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कल्याण होणार आहे का? …उत्तर होकारार्थी असेल तरच तो निर्णय आत्मविश्वासानं घ्या.’
आज या सूत्राचा उपयोग (किंवा प्रयोग) आपण आपल्या वैयक्तिक- कौटुंबिक- व्यावसायिक पातळीवर केला तरी आपल्या मानसिक समाधानात मोलाची भर पडेल, नि ज्यासाठी मानवजात तडफडतेय ती मनःशांती (त्यातून विश्वशांती) आपल्याला निश्चित मिळेल. या शांतीचे दूत होते गांधीजी. या महापुरुषाच्या, खरं तर युगपुरुषाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभर कार्यक्रम साजरे केले जातील. पण ते कंठाळी घोषणा, कंटाळवाण्या भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. एखाद्या टुथपेस्ट किंवा लिप्स्टिकसारखे दिखाऊ असू नयेत. या कार्यक्रमातून अर्थपूर्ण, कल्याणकारी उपक्रम निर्माण व्हावेत, हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली ठरेल!