युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील भारतीय अधिकार्यांच्या कुटुंबीयांना देशात परतण्यास सांगितले आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सरकारी लष्कर आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच युक्रेनच्या पूर्व सीमेजवळ रशियाने सुमारे दीड लाख सैन्य तैनात केले असून रशियाने अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. तसेच डोनेत्स्क प्रांतातील नागरिकांनी रशियाकडे स्थलांतर सुरू केले आहे. यामुळे पाश्चात्य नेत्यांनी रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य आक्रमणाबद्दल गंभीर इशारा दिला.