>> भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम
>> अजून ७ हजार नागरिक युक्रेनमध्ये
रशिया व युक्रेन या दोन देशांत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारद्वारे ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू करत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यात येत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण २० हजार भारतीयांपैकी आतापर्यंत १३ हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. मात्र अजून सुमी भागात अडकलेल्या ७०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे जिकिरीचे काम आहे. कारण त्याच परिसरात युद्ध सुरू आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय विद्यार्थ्यांना खार्किवमधून बाहेर काढण्यात आले आहे. पिसोचिनमधून काही तासांत सर्वांची सुटका केली जाईल. आता सरकारचा भर ङ्गक्त सुमीवर आहे. त्यांच्यासाठी, सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे. ते विद्यार्थी तणावाखाली असले तरी ते सुरक्षित ठिकाणी असून सरकार त्यांच्या सतत संपर्कात असल्याचे पराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
आज १३ विमाने युक्रेनमधून भारतात शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशी परतणार आहेत. काल रविवारी सकाळी युक्रेनमधील १८३ भारतीयांना घेऊन एक विशेष विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून राष्ट्रीय राजधानीत पोहोचले आहे.
११ मार्चपर्यंत १०० उड्डाणे निश्चित
आतापर्यंत सुमारे १३ हजार भारतीय ६३ विमानाने घरी पोहोचले आहेत. ११ मार्चपर्यंत एकूण १०० उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. हवाई दलात ६ खासगी कंपन्यांची विमानेही सहभागी होती.
भारताचे युद्धविरामाचे आवाहन
भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सुमी भागातील लोकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी त्वरित युद्धविराम करण्याचे आवाहन केले. जेणेकरून लोकांना संघर्षग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढता येईल.
‘ऑपरेशन गंगा’ हे भारतीय सामर्थ्याचे प्रतिक ः मोदी
पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन गंगाचा उल्लेख भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक असा केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुणे येथे बोलताना, इतर कोण्यत्याही देशाला जमले नाही ते भारताने करुन दाखवले आहे. ऑपरेशन गंगा हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. सर्व अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतिक असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी झाली तेव्हा ते बोलत होेते.
पंतप्रधान मोदी यांनी, भारत आता अनेक क्षेत्रात अव्वल होत आहे, भारत आज दुसर्या क्रमांकाचा मोबाईल निर्माण करणारा देश आहे. आधी संरक्षणक्षेत्रात आयात करावी लागत होती, आता आपण ती तयार करू लागलो आहोत. देशातील सरकार आज देशातील तरुणांच्या बळावर अवलंबून आहे. म्हणूनच सरकार तुमच्यासाठी एकामागून एक सेक्टर उघडणार आहे. या संधींचा पुरेपूर ङ्गायदा घ्या’, असे आवाहन केले.