>> रविवारच्या बैठकीत 27 युरोपीयन देशांचा सहभाग
>> अमेरिकेची युक्रेनला होणारी मदत थांबली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या खडाजंगीनंतर युरोप खंडातील सर्व राष्ट्रे युक्रेनच्या समर्थनार्थ एक झाली असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शनिवारी अमेरिकेहून थेट लंडनला पोहोचले. संध्याकाळी उशिरा त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. स्टार्मर यांनी युक्रेनच्या समर्थनार्थ रविवारी युरोपियन नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. जर्मनी, फ्रान्स आणि इटलीसह 27 देशांचे नेते यात सहभागी होतील.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की यांच्यावर युद्धखोर असल्याचा आरोप केला होता. यावेळी ट्रम्प यांनी, युक्रेन कोणत्याही परिस्थितीत रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकणार नाही, परंतु झेलेन्स्की युद्धाचा आग्रह धरत आहेत. मात्र मला युद्ध संपवायचे आहे आणि शांतता प्रस्थापित करायची आहे असे सांगितले.
ट्रम्प यांनी संयम दाखवला ः रशिया
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती व्हान्स यांनी खूप संयम दाखवला. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, असे म्हणत झेलेन्स्की हे बेईमान नेता असल्याची टीका केली आहे.
युक्रेनला अमेरिकेची मदत थांबली
यानंतर आता ट्रम्प यांनी युरोपीय देश नाटोमध्ये त्यांचा कोटा खर्च करत नाहीत. त्यामुळे अमेरिका नाटोमधून बाहेर पडू शकते. यासंबंधी बोलातना नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारले पाहिजेत असे मत व्यक्त केेले. ट्रम्प युक्रेनला अमेरिकेची मदत थांबवण्याचा निर्णय घेऊ शकतात. तथापि, अमेरिका युक्रेनला 10.5 लाख कोटी रुपये देईल असा ट्रम्प यांचा दावा आहे.
ट्रम्प- झेलेन्स्की वादविवाद
व्हाईट हाऊसमध्ये चर्चेदरम्यान, झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात 35 मिनिटांचा वादविवाद झाला. या चर्चेनंतर, ट्रम्प व्हाईट हाऊसमधील त्यांच्या कामकाजाच्या खोलीत गेले. चर्चेनंतर झेलेन्स्की यांनी, अशी चर्चा दोन राष्ट्राध्यक्षांमध्ये होऊ नये परंतु मी ट्रम्प यांची माफी मागणार नाही असे सांगितले.
सुरक्षेच्या हमीनंतरच खनिज करार ः वोलोदिमिर झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी यानंतर स्पष्टपणे, अमेरिकेसोबत खनिज करार सुरक्षा हमी मिळाल्यानंतरच केला जाऊ शकतो असे सांगितले आहे. युक्रेन गेल्या तीन वर्षांपासून आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे, तो मागे हटणार नाही. आम्हाला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या अटींवर नव्हे तर न्याय्य युद्धविराम हवा आहे. पुतिन यांना थांबवण्याची गरज आहे असे सांगून झेलेन्स्की यांनी अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी झेलेन्स्की यांनी, अमेरिकेने युक्रेनच्या बाजूने अधिक मजबूतपणे उभे राहावे अशी आपली इच्छा व्यक्त केली आहे.