>> दुसर्या दिवशी युक्रेनियन सैनिकांसह १३७ जणांनी गमावले प्राण; मालमत्तेची मोठी हानी
बलाढ्य रशियाशी युक्रेनचे सैन्य नेटाने आणि गनिमी काव्याने लढा देत असून, काल युद्धाच्या दुसर्या दिवशी युक्रेनने केलेल्या प्रतिहल्ल्यात १००० रशियन सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे रशियाला मोठा हादरा बसला आहे. तसेच रशियाच्या हल्ल्यात दुसर्या दिवशी युक्रेनियन सैनिकांसह १३७ नागरिकांनी प्राण गमावले आहेत, तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या युद्ध सामुग्रीचा विध्वंस चालवला आहे. रशियाने युक्रेनच्या ११८ लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या, तर युक्रेनने रशियाचे ३० टँक आणि १३ विमाने नष्ट केली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध आता चांगलेच भडकले आहे. काल युद्धाचा दुसरा दिवस होता. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये घुसून हल्ल्या केल्यानंतर अनेक शहरांना युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. रशियन फौजा राजधानी कीव शहरापर्यंत पोहचल्या असून, या शहरावर कब्जा मिळवण्याचे रशियाचे मनसुबे उधळण्यासाठी युक्रेनी सैनिक प्राणपणाने लढत आहेत. कीव शहर हाय अलर्टवर असून, शहरात सातत्याने सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. सातत्याने बॉम्बहल्ले होत असल्याने नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कीवमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्यात आला असून, स्वसंरक्षणासाठी नागरिकांना शस्त्रे वाटण्यात आली आहेत.
युक्रेनची कोंडी करण्यासाठी रशियन सैन्य चहुबाजूने आगेकूच करत असून, उत्तर युक्रेनमधील चेर्निगोव्ह शहरालाही चोहोबाजूने घेरण्यात आले आहे. दुसरीकडे इव्हानकीवमधून रशियन सैन्य कीव शहरात दाखल होईल ही शक्यता लक्षात घेत त्यांना रोखण्यासाठी तेतरीव नदीवरील पूल युक्रेनने पाडला आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये घुसू नये यासाठी युक्रेनच्या लष्कराने हे पाऊल उचलले आहे.
असे असले तरी रशियाचे सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच राजधानी कीवचा पाडाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच राजधानी कीवच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येत होते. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे.
युक्रेनच्या ११८ लष्करी पायाभूत सुविधा नष्ट
आतापर्यंत २४३ युक्रेनियन सैनिक आणि एक मरीन ब्रिगेडने आत्मसमर्पण केले आहे, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेनच्या ११८ लष्करी पायाभूत सुविधा देखील नष्ट केल्या आहेत. त्यामध्ये ११ लष्करी हवाई क्षेत्रे, १३ कमांड आणि कम्युनिकेशन केंद्रे, १४ एस-३०० क्षेपणास्त्र प्रणाली आणि ३६ रडार स्टेशन यांचा समावेश आहे. याबरोबरच युक्रेनची ५ लढाऊ विमाने, १ हेलिकॉप्टर, ५ ड्रोन, १८ रणगाडे, ७ रॉकेट लॉंचर, लष्कराच्या ४१ गाड्या आणि ५ लढाऊ नौका नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे.
दोन्ही देश चर्चेस तयार
रशिया-युक्रेन युद्धात गेल्या दोन दिवसांत शेकडो सैनिक व नागरिकांचे बळी गेल्यानंतर आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर आता दोन्ही देश चर्चेसाठी तयार झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचा दावा काल रशियाच्या सरकारी मीडियाकडून करण्यात आला आहे. तसेच रशियानेही युक्रेनशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
भारतीयांना आणण्यासाठी विमाने रवाना
रशिया-युक्रेनमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांची चिंता आहे. त्यासाठीच भारताने मिशन एअरलिफ्ट सुरू करणार आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची २ विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे उड्डाण करतील. एक विमान मुंबईतून आणि एक दिल्लीतून युक्रेनमध्ये पाठवणार आहे. ही विमाने मुंबई आणि दिल्लीहून बुडापेस्टला पाठवण्यात येणार आहेत.
गोमंतकीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
>> अनिवासी भारतीय आयुक्तांची माहिती
युद्धग्रस्त युक्रेन देशात काही गोमंतकीय अडकले असून, त्यात प्रामुख्याने उच्च शिक्षणासाठी गेलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युद्धामुळे हे सर्व गोमंतकीय तेथे अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्यासाठी आपण परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा केली असल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी काल सांगितले.
आता या परिस्थितीवर केंद्र सरकार तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. या भारतीयांना देशात परत कसे आणावे यावर तोडगा निघाला की गोमंतकीय विद्यार्थ्यांनाही परत आणणे शक्य होईल, असेहीसावईकर म्हणाले.
गोव्यातील युक्रेनियनांकडून हल्ल्याचा निषेध
पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या युक्रेनमधील काही नागरिकांनी काल पणजीतील चर्च स्क्वेअरजवळ निदर्शने करून युक्रेनवर हल्ला करणार्या रशियाचा निषेध केला.
युद्धाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम
रशिया-युक्रेन यांच्यातील युध्दामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाबरोबरच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, असे पर्यटन खात्याचे संचालक मिनिनो डिसोझा यांनी काल सांगितले. रशिया-युक्रेन यांच्यातील युध्दामुळे चार्टर्ड विमाने रद्द करण्यात आली आहेत. रशियातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. चार्टर्ड विमाने रद्द झाल्यास गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार आहे, असेही ते म्हणााले.