या चिमण्यांनो…

0
3

योगसाधना- 667, अंतरंगयोग- 253

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आतादेखील अनेक लेखक, कवी लिहितात. संदर्भ वेगळा असतो, विषय वेगळा असतो. समाजात सध्याच्या क्षणी ज्या विविध समस्या आहेत त्यांवर त्यात भाष्य असते. मार्गदर्शन असते. बोध असतो. पण आपण तसे वागतो का?

भगवंताने अफाट विश्व बनवले. त्यात विविध राष्ट्रे… प्रत्येक राष्ट्र वेगळे- वंश, धर्म, भाषा, रंग, संस्कृती… त्या राष्ट्रांतील एक अत्यंत जुने राष्ट्र म्हणजे भारत. भारतातदेखील वेगवेगळ्या भाषा आहेत; पण आपली संस्कृती एक, अनेक सण एक. थोडाफार फरक अवश्य आहे, पण मूळ गाभा तोच आहे. आपला इतिहासदेखील विस्तृत. या देशावर अनेक राजांनी, राष्ट्रांनी आक्रमणे केली. काही प्रथा, गोष्टी भारतीयांनी इतरांकडून उचलल्या, पण मूळ संस्कृतीचा गाभा तसाच सांभाळलेला दिसतो.

अनेक क्षेत्रांत आपला भारत देश प्रगत होता. आतादेखील आहे. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतो. पण भारताचा मूळ गाभा आहे तो आध्यात्मिकतेचा. या क्षेत्रात आपण विश्वाला मार्गदर्शक ठरतो.
आपले अध्यात्म म्हणजे फार उच्च दर्जाचे तत्त्वज्ञान आहे. स्थूल, सूक्ष्म, तसेच अतिसूक्ष्म. सामान्य व्यक्तीला अनेक गोष्टींचा सहज बोध होत नाही. त्यामुळे हे कठीण तत्त्वज्ञान समजण्यासाठी महाकाव्ये, रामायण, महाभारत, भागवत, पुराणे… कथागोष्टीच्या रूपात लिहिली गेली. वेगवेगळ्या स्वरूपात ती समाजापुढे मांडली गेली- कथा, भजने, कविता, कीर्तने, नाटके. या सर्व साहित्यात काहीतरी बोध होता, हेतू प्रामाणिक होता. ऐकणाऱ्यांनी, वाचणाऱ्यांनी स्वतःच्या जीवनात हे महान सिद्धांत आणून जीवनविकास करावा- स्वतःचा, इतरांचा व समाजाचा.

आतादेखील अनेक लेखक, कवी लिहितात. संदर्भ वेगळा असतो, विषय वेगळा असतो. समाजात सध्याच्या क्षणी ज्या विविध समस्या आहेत त्यांवर त्यात भाष्य असते. मार्गदर्शन असते. बोध असतो. पण आपण तसे वागतो का?
अशीच एक कथा वाचली. मला ती आवडली. म्हटले थोडक्यात साररूपात ती लिहावी. कोकणातील एका लहानशा गावातील कुटुंबाची ही कथा. संदर्भ आजच्या परिस्थितीला थोडाफार जुळणारा-
वसंतराव व त्यांची पत्नी सुमित्रा- खेड्यात राहणारी. एकुलता एक मुलगा. चांगला शिकला. इंजिनिअर झाला. अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला. उदय त्याचे नाव. एका पंजाबी मुलीच्या प्रेमात पडला. तिचे नाव रसिका. ती फिजिओथेरपिस्ट. चांगल्या हॉस्पिटलात नोकरी करणारी. तिचे आईवडील अमेरिकेत स्थायिक झालेले. तीदेखील त्या देशात, त्या संस्कारात वाढलेली.

विवाह अमेरिकेतच पार पाडण्याचा त्यांचा बेत ठरला. त्याप्रमाणे उदयने आईवडिलांना कळवले. विमानाची तिकिटेदेखील पाठवली. वसंतरावांना वाईट वाटले. त्यांनी कितीतरी स्वप्ने रंगवलेली, पण परिस्थितीसमोर नाईलाज होता. सुमित्राबाई मात्र फार रागावली. तिने लग्नाला जायला नकारच दिला. गेलीदेखील नाही.
वेळकाळ कुणासाठी थांबत नाही. दोघांचा संसार चाललेला, पण आता त्या घटनेमुळे पूर्वीचा गोडवा राहिला नव्हता. वसंतराव सकाळी दोघांसाठी चहा बनवत असत. चहा तयार झाल्यानंतर सुमित्राबाईंना उठवीत. मग पती-पत्नी एकत्र बसून चहा पीत.

एक दिवस चहा झाल्यावर त्यांनी पत्नीला हाका मारल्या, पण तिचे उत्तर मिळेना म्हणून ते खोलीत गेले तर तिचा चेहरा वाकडा झालेला. एक हात कॉटखाली लोंबत होता. ते चित्र बघून वसंतरावांना भीतीच वाटली. त्यांनी सुमित्राबाईंच्या शरीराला हात लावून बघितले. शरीर गरम होते, म्हणजे तिला लकवा आलेला.
रात्री अकरापर्यंत दोघांनी बरोबरच टीव्हीवरचे कार्यक्रम बघितले. त्यावेळी तर ती बरी होती. पण उदयच्या लग्नानंतर तिचा रक्तदाब वाढत असे. डॉक्टर म्हणाले की त्या मनात राग घेऊन बसल्या आहेत म्हणून कदाचित तसे होत आहे. वसंतरावांनी शेजारचा बाळ्या व त्यांची पत्नी अरुणा यांना हाका मारल्या. त्यांनी थंड पाणी तोंडावर शिंपडले, कांदा कापून नाकासमोर धरला, पण प्रतिसाद नाही. लगेच त्यांनी सुमित्राबाईंना डॉ. राणेंच्या हॉस्पिटलात बाळ्याच्या रिक्षातून हलवले.
डॉ. राणेंनी औषधे चालू केली. दोन-तीन दिवसांनी त्यांची तब्येत थोडी सुधारू लागली. बाळ्या व अरुणा जवळच्या नातेवाइकासारखी सेवा करायची. डॉ. राणे म्हणाले की, सुनिताबाईंना नियमित फिजिओथेरपी देणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्यासाठी तिला पुणे-मुंबईला न्यावे लागेल. वसंतरावांनी उदयला फोन करून सर्व परिस्थिती कळवली. त्याला वाईट वाटले. त्याने म्हटले की, एका तासात तो परत फोन करून पुढचा बेत कळवणार. ठरल्याप्रमाणे उदयचा फोन आला. तो म्हणाला, “बाबा, माझा एक प्रोजेक्ट चालू आहे. दोन महिने लागतील, तद्नंतर मी येईन. पण माझी पत्नी रसिका उद्याच निघते. ती फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे आईसाठी तिचा जास्त उपयोग होईल.”

दरम्यान वसंतरावांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडे मुंबई व पुणे येथे राहण्यासाठी चौकशी केली पण त्यांच्या काही अडचणींमुळे तिथे राहणे शक्य नव्हते.
दोन दिवसांनी सुमारे 25 वयाच्या आसपास असलेली एक देखणी तरुणी डॉ. राणेंच्या हॉस्पिटलात आली. वसंतरावांना भेटली व नंतर डॉ. राणेंना. ती रसिका होती. तिने डॉक्टरांकडून सुमित्राबाईंची संपूर्ण जबाबदारी घेतली. दोन दिवसांनी मंडळी घरी आली. दोन महिन्यांनी बाई संपूर्ण बऱ्या झाल्या. त्यांना फक्त बोलता येत नव्हते. पण त्या वसंतरावांना तिच्याबद्दल खुणेने विचारत होत्या. पण त्यांनी तिला काही सांगितले नाही. कारण तिचा सुनेवर फार राग होता. ते फक्त गालातल्या गालात हसायचे.
रसिका एवढी गोड होती की तिने हॉस्पिटलातील परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची मनेदेखील जिंकली होती. आश्चर्य म्हणजे ती मराठीदेखील बोलायला थोडी थोडी शिकली.

सगळे ठीक चालले होते. तेवढ्यात कोरोनाची साथ आली. त्यामुळे रसिकाला अमेरिकेत जाता येईना आणि उदयला भारतात येता येईना.
दरम्यान रसिका गावात फिरायला लागली. घरात असलेली विहीर, नारळी-पोफळीच्या बागा, तुळशी वृंदावन, देवासाठी पूजेची स्वतंत्र खोली- तिला फार आवडले. कोकणातील दगडाची उतरत्या छप्परांच्या घरांची तिने चित्रेच बघितली होती; आता प्रत्यक्ष बघितली!
तसेच महाराष्ट्रीय पद्धतीचा स्वयंपाक, भाजी, चपाती, कुळथाचे पिठले, भाकरी, नारळ किसून वापरणे…. वगैरे विविध गोष्टी बनवायला ती शिकली.
शिवाय तिने येताना मसाजसाठी खास अमेरिकन कंपनमशीन आणले होते. सारांश काय तर सुमित्राबाईंची तब्येत लगेच सुधारली. रसिकाने त्यांची मनोभावे, प्रेमाने सेवा केली होती. सर्वांची ती आवडती झाली. अशावेळी डॉ. राणेंनी रसिकाची सुमित्राबाईंकडे ओळख करून दिली. बाईंना धक्काच बसला. स्वतःच्या वागण्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांने रसिकाची क्षमा मागितली. त्या रडत रडत म्हणाल्या, ‘गोड माझी पोर… लाखात सापडणार नाही!’
वेळ पुष्कळ होता म्हणून वसंतराव गावातली आपली पडीक जमीन तिला दाखवायला घेऊन गेले आणि रसिकाच्या सांगण्यावरून बाळ्याबरोबर वसंतरावांनी त्या जमिनीची डागडुजी करून घेतली. वेंगुर्ल्याहून आंब्या-काजूची रोपे आणली. कोरोनाचा काळ असल्यामुळे बांधकाम साहित्य माफक दरात मिळाले. त्याशिवाय स्थानिक कामगार- गवंडी, मदतनीस… यांनादेखील गावातच काम मिळाले. बाग तयार होता होता अनेकांचे जीवन सुखकर झाले.
मध्ये मध्ये उदयकडे रसिकाचा वार्तालाप चालू होता. खर्चाचा मोठा वाटादेखील त्यांनीच उचलला. दरम्यान, त्यानेदेखील आता निर्णय घेतला की आता कोकणातच आपल्या गावी आईवडिलांसोबत राहायचे.

लेखकाने लिहिलेली गोष्ट फार मोठी आहे. येथे फक्त मूळ संदर्भ बघितला. कथेचे नावदेखील गोड आहे- ‘या चिमण्यांनो.’ खरेच इथेच सर्व तत्त्वज्ञान आले. डॉ. राणेंनी विविध मासिकांमध्ये व वैद्यकीय जर्नलमध्ये या घटनेबद्दल लेख लिहिले. ही बातमी भारतभर झाली.
एरव्ही समाजात काय घडते सर्वांना माहीत आहे. पालकांची मंडळे, वृद्धाश्रम असतात. मुले, नातवंडे परदेशात. मध्ये मध्ये येऊन जातात. भारतातले जीवन विचित्र झाले आहे.

कथेतील घटना सत्य असेलच असे नाही. लेखक काल्पनिक लिहितात. त्यांची एक सुप्त इच्छा असते की अशा सकारात्मक घटना घडाव्यात. अपवाद असतीलही. आता पुराणातील गोष्टींबरोबर अशा कथादेखील सांगायला हव्यात. कोण जाणे, काही घटना सत्यदेखील होतील. तसे घडले तर भारताचे नंदनवन घडेल. आपल्या रक्तात संस्कार आहेतच.