यापुढे सर्व पश्‍चिमी राज्यांत समान मच्छीमारी बंदी काळ

0
118
पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग. सोबत खासदार ऍड. नरेंद्र सावईकर.

केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांची माहिती
पश्‍चिमेकडील राज्यांमध्ये पावसाळ्यातील मच्छिमारी बंदीचा काळ वेगवेगळा असतो. त्यात समानता आणण्यासाठी सरकार लवकरच गोव्यासह चारही राज्यांतील कृषी व मच्छीमारी मंत्र्यांची बैठक घेऊन मच्छिमारी बंदीचा समान काळ निश्‍चित करणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात काजू व मसाला उत्पादनाच्या क्षेत्राला चालना देऊन विकास करण्यासाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा मनोदय सिंग यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने गोकुळ मीशन स्थापन केले असून या माध्यमातून गाईंचा सांभाळ करून दूध उत्पादन वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगून त्यासाठी वेगळी सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात कृषी व मसाला संशोधन केंद्र स्थापन केल्यास नवी बियांणी विकसीत करण्याच्याबाबतीत वाव मिळू शकेल, असे ते म्हणाले.
फळांची व भाज्यांची अन्य भागात निर्यात करणारे गोवा हे राज्य होऊ शकेल, असे सिंग यांनी सांगितले. सिंग यांनी परवा शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व अन्य मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांवर चर्चा केली होती.
यावेळी गोव्यातील खाजन जमिनीचा संवर्धन करण्यासाठी केंद्राने खास योजना तयार करावी, अशी मागणी गोवा सरकारने सिंग यांच्याकडे केली. राज्यात फुलांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सिंग यांच्याकडे ४० कोटी रुपयांची केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन सिंग यांनी राज्य सरकारला दिले आहे.
पत्रकार परिषदेस दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.