यापुढे सरकारी नोकरभरती आयोगामार्फतच : मुख्यमंत्री

0
21

>> मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत गोवा कर्मचारी निवड आयोग आणि गोवा ऊर्जा विकास एजन्सीसाठी आवश्यक असलेल्या पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर बैठकीनंतर मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यापुढे गोवा कर्मचारी निवड आयोगाद्वारेच नोकरभरती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
याशिवाय आरोग्य खाते, गोमेकॉमध्ये व अन्य काही खात्यांना पूर्वलक्षी प्रभावाने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात गोमेकॉला कोविडसाठी लागणार्‍या साहित्याचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच बांबोळी येथील मानसोपचार इस्पितळात एका वर्षासाठीचे काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

गोवा सरकारने राबवलेली ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम पूर्णपणे यशस्वी ठरला असून, दोन महिन्यानंतर हा उपक्रम पुन्हा राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

भारत सरकार व केंद्रीय गृह खात्याने २७ व २८ ऑक्टोबर रोजी हरियाणा येथे एका चिंतन शिबिराचे आयोजन केले असून, आपण व राज्याचे मुख्य सचिव या चिंतन शिबिराला हजेरी लावून राज्याचे प्रश्‍न केंद्र दरबारी मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात रस्ता अपघातात
वर्षभरात २५०-३०० मृत्यू

गोव्यात दरवर्षी रस्ता अपघातात २५० ते ३०० मृत्यू होत असून, हे अपघात कमी व्हायला हवेत. या वाढत्या अपघातांवर उपाययोजना आखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते व पोलीस वाहतूक विभाग यांच्यातर्फे एका शिबिराचे व खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे हा कार्यक्रम होईल.