>> राणे ः प्रादेशिक आराखडा 21 हा घोटाळा
राज्यातील प्रादेशिक आराखडा 2021 हा एक मोठा घोटाळा आहे. राज्यात नवीन प्रादेशिक आराखडा तयार केला जाणार नाही. तर, यापुढे फक्त क्षेत्रीय आराखडे तयार केले जाणार आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये करण्यात आलेले घोटाळे आगामी विधानसभा अधिवेशनात उघडकीस आणणार आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
नगरनियोजन मंत्री राणे यांनी प्रादेशिक आराखडा 2021 मधील जमीन रूपांतराच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची निवड केली आहे. प्रादेशिक आराखडा 2021 तयार करताना राज्य पातळीवरील समितीने मोठा घोटाळा केला आहे. अनेक नागरिकांच्या जमिनीचे रूपांतर करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. नगरनियोजन खात्याकडून कायद्याच्या आधाराला अनुसरून न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची तयारी नाही. तर, व्यवसाय सल्लागार एजन्सीच्या मदतीने क्षेत्रीय आराखडे तयार करून सर्व प्रकारच्या जमिनींचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक आराखडा 2021 या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप संघटन यांच्याशी चर्चा केलेली आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.