>> सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन
>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची घोषणा
>> पर्वरीत बगल रस्त्याचे उद्घाटन
अत्यंत महत्त्वाच्या अशा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाची काल घोषणा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र खाते स्थापन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. जलाशयापर्यंत पाण्याचा पुरवठा करणे ही जबाबदारी यापुढे जलस्रोत खात्याकडे असेल. या कामाकडे योग्य ते लक्ष न देणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. लोकांना रोज किमान चार तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पर्वरी येथे काल एक हजार क्युबिक मीटर जलकुंभासाठीची कोनशिला बसवल्यानंतर ते बोलत होते. पर्यटनमंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हेही यावेळी उपस्थित होते.
स्वतंत्र पाणीपुरवठा खाते लवकरच अस्तित्त्वात येणार असल्याचे सांगून लोकांची पाण्यासाठी परवड होऊ नये यासाठी हे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम खात्यात सध्या रस्ते, इमारती व पाणी विभाग येतो. रस्ते व इमारतींच्या बांधकामामुळे पाणीपुरवठ्याकडे हवे तेवढे लक्ष देता येत नसल्याचे दिसून आल्याने हे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील 25 वर्षांसाठीच्या नियोजनाचा हा भाग असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोवा व महाराष्ट्र राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारीचे कालवे आता पुन्हा पुन्हा फुटू लागल्याने समस्या निर्माण होऊ लागलेली असल्याने गोवा सरकारने आता राज्यातच नवे जलस्रोत शोधून ते उपयोगात आणण्याचे ठरवले असल्याचे ते म्हणाले.
पर्वरी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग 66 च्या बगल मार्गाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या बगलमार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने हा बगलमार्ग विकासाच्या दृष्टीने आणखी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे ते म्हणाले.
कोमुनिदादने या प्रकल्पासाठी सढळ हस्ते जमीन दान केल्याने या प्रकल्पाला विनाविलंब मूर्तरूप प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
5 किलोमीटरचा उड्डाणपूल
पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी राज्यातील पहिला-वहिला 5 किलोमीटरचा उड्डाणपूल पर्वरीत उभारण्यात येत आहे. एवढा मोठा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र यात वाहनचालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. या सहापदरी उड्डाणपुलाचा केवळ पर्वरीवासीयांनाच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीयांना फायदा होणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
पाणी जपून वापरा
गोव्यात 16 क्युबिक मीटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या स्थानिकांना सरकारकडून पाण्याच्या बिलाची वसुली केली जात नाही, त्यामुळे सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. गरजेशिवाय बागायतींमध्ये किंवा गाड्या धुण्यासाठी पाण्याचा कमीतकमी वापर करून पाण्याचा अपव्य टाळावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
उड्डाण पुलाचे काम 2026 पर्यंत पूर्ण
पर्वरी येथील उड्डाण पुलाचे काम हे अत्यंत जलदगतीने चालू असून ते ठरवून दिलेल्या अवधीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. उत्तर ते दक्षिण गोव्याला जोडून ठेवणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिकांनी थोडीशी कळ सोसून मदत करावी असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. वर्ष 2026 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या उड्डाण पुलाच्या कामामुळे जनतेला बराच त्रास सहन करावा लागत आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, आणखी जास्त काळ लोकांना हा त्रास सहन करावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.