यापुढे केजींना एनपीईअंतर्गत नोंदणी सक्तीची

0
9

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> पर्वरीत विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन

राज्यातील सर्व बालवाडी (केजी) तसेच शाळांना एनईपीअंतर्गत नोंदणी करणे सक्तीचे आहे. पूर्वनोंदणीशिवाय केजी वर्ग सुरू करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देताना राज्यात विद्या समीक्षा केंद्राच्या शुभारंभामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या क्रांतीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांची तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे शैक्षणिक क्रांतीची दृष्टी आहे. व्हीएसके डॅशबोर्ड आणि जिल्हा, ब्लॉक आणि वैयक्तिक शाळांसाठी अहवाल सादर करेल. हा रिअल-टाइम डेटा विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षक प्रशिक्षण आणि एकूणच शाळेच्या कामगिरीबद्दल अमूल्य अंतर्दृष्टी देईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर पर्वरी येथे बोलत होते.

विद्यार्थी व शिक्षकांवर लक्ष
राज्यातील सुमारे 2 लाख विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकांच्या कामगिरीवर विद्या समीक्षा केंद्राद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या केंद्राकडून साधारणपणे दर 15 दिवसांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्यात सुधारणा करण्यात मदत केली जाणार आहे.

अध्यापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षकांनी आयुष्यभर शिक्षण आणि सुधारणेसाठी समर्पित राहणे आवश्यक आहे. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला म्हणजे काम झाले, असा विचार करू नये. त्यांनी सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित, करिअरबाबतीत मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हाने आणि संधींसाठी तयार करण्यासाठी ही निरंतर प्रक्रिया आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

गुजरातपाठोपाठ गोवा हे एआय-सक्षम विद्या परीक्षा केंद्राचे उद्घाटन करणारे दुसरे राज्य ठरले आहे. जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडत आहेत, त्यांच्यासाठी उपचारात्मक वर्ग घेण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विद्या समीक्षा केंद्राची स्थापना विद्यार्थी आणि शिक्षकांना यशासाठी सर्वोत्तम साधने देण्यासाठी करण्यात आली आहे. रिअल-टाइम डेटा आणि फीडबॅक लूप वापरून गोव्यातील शिक्षण परिष्कृत करण्यासाठी हे पुढचे मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्राची मेसर्स एअर विंग इंजिनिअरकडून उभारणी

गोवा समग्र शिक्षासाठी विद्या समीक्षा केंद्राची उभारणी पेडे-म्हापसा येथील मेसर्स एअर विंग इंजिनिअरने केली आहे. सुमारे 38 लाख 27 हजार रुपये खर्चून या केंद्राची अंतर्गत रचना, विद्युतीकरण व अन्य कामे करण्यात आली आहेत.

पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी सरकारी शाळांची दुरुस्ती आत्तापासूनच हाती घेणार येणार आहे. शिक्षण खात्याचे पथक पुढील महिन्यापासून प्रत्येक तालुक्याला भेट देणार आहे. या पथकाकडून एनईपी 2020 च्या पायाभरणीच्या प्रशिक्षणाचे निरीक्षण केले जाणार आहे, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
राज्य सरकारने शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत नवीन आणि जुन्या पूर्व प्राथमिक शाळेसाठी नोंदणी अनिवार्य केली आहे. यापुढे प्रत्येक शाळेची निगराणी आणि तपासणीनंतर प्रतवारी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीचे संचालक डॉ. शंभू घाडी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.