यादोंकी बारात!

0
22

वाईट बातम्या येतात तेव्हा त्या एकेकट्या येत नाहीत, पाठोपाठ येतात. रवींद्र महाजनी, जयंत सावरकर आणि आता शिरीष कणेकर. मराठी चित्र, नाट्य, साहित्यक्षेत्रातली तीन दिग्गज व्यक्तिमत्त्वे बघता बघता काळाच्या पडद्याआड गेली. तिघांचेही जाणे चुटपूट लावणारे. कणेकरांची लोकप्रियता तर अफाट. ‘सिनेमा’, ‘क्रिकेट’ आणि ‘राजकारण’ ह्या गोष्टी मुळातच मराठी माणसाला अतिप्रिय. या तिन्ही विषयांवरचे किस्से आणि कहाण्यांचा अफाट खजिना असलेला आणि गप्पा माराव्यात एवढ्या सहजतेने आपल्या लेखणी आणि वाणीतून तो मनसोक्त उधळणारा; जितके चटपटीत लिहिणारा, तितकेच चुरूचुरू बोलणारा ‘शिरीष कणेकर’ नावाचा अवलिया बघता बघता मराठीजनांच्या गळ्यातला ताईत बनला यात नवल ते काय? उणीपुरी पन्नास वर्षे कणेकरांनी आपल्या बहारदार सदाहरित लेखणीने वर्तमानपत्रांचे स्तंभ आणि खुसखुशीत किश्शांनी खच्चून वाहत्या वाणीने रंगमंचावरचे एकपात्री प्रयोग तुफान गाजवले. या किश्शांची, व्यक्तिचित्रांची, आठवणींची असंख्य पुस्तके निघाली. वाचकांच्या त्यावर उड्या पडत राहिल्या. ती आऊट ऑफ प्रिंट होत राहिली. कणेकर या नावाची जादूच अशी होती. ‘कुठल्याही एका विषयाला धरून नसलेला वन मॅन स्टँडअप टॉक शो’ अशी ते आपल्या ‘कणेकरी’च्या प्रयोगांची जाहिरात करीत आणि मराठी माणूस दोन तास खळखळून हसण्यासाठी अक्षरशः तिकीट काढून त्या कार्यक्रमांना गर्दी करी. ‘जशी चिकन करी, फिशकरी, तशी ही कणेकरी, जी श्रावणात, चातुर्मासात आणि अगदी एकादशीलाही चालू शकेल,’ अशी तिची तितकीच फर्मास जाहिरात चाले. स्टँड अप कॉमेडी भारतीय रंगमंचावर सुरुवातीला ज्यांनी रुजवली, त्यात कणेकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ आणि ‘कणेकरी’ हे त्यांचे सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणविषयक कार्यक्रम गाजले. सिनेमावर कार्यक्रम करता, मग क्रिकेटवर का नाही या मागणीतून ‘फटकेबाजी’ सुरू झाला. आपले कार्यक्रम ते अमेरिकेतही घेऊन गेले. तिथल्या अनुभवांवर मग ‘डॉलरच्या देशा’ हे प्रवासवर्णन लिहिले. कणेकरांच्या कार्यक्रमांच्या फॉर्ममध्ये नंतर अनेकांनी कार्यक्रम केले, पण ‘कॉपी केल्यानं कोणाचं अस्तित्व निर्माण होत नाही’ असे ते म्हणायचे आणि त्यात तथ्यही होते.
वर्तमानपत्रांत सातत्य राखून हुकुमी आणि शैलीदार लेखन करणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी लेखनाला शिस्त लागते, शब्दांवरची हुकूमत लागते, तसा व्यासंगही लागतो. स्तंभलेखनातही कणेकरांना स्वतःची अशी शैली गवसली होती. जगावेगळी परंतु आकर्षक, चटपटीत सुरुवात, चुरचुरीत पण टोकदार, तिरकस भाष्य, मधूनच एखाद्याला चिमटा, अशा टिवल्याबावल्या चालल्या असताना मग पोतडीतून एकाहून एक फर्मास किस्से बाहेर निघत. आजच्या भाषेतल्या ‘सेलिब्रिटीं’बद्दलचे हे अगदी जवळून पाहिलेले, अनुभवलेले किस्से वाचताना आणि ऐकताना लोक मंत्रमुग्ध होऊन जात. मराठीमध्ये विनोदाची अत्यंत सकस, समृद्ध परंपरा आहे. बाळकरामची शैली वेगळी, चि. विं. ची, अत्र्यांची, पुलंची, दळवींची वेगळी. दळवींच्या ‘ठणठणपाळ’ सारखा कणेकरी विनोद ‘निर्विष’ म्हणता येणार नाही. त्यात थोडा डंख आणि उपरोधही जरूर असे, परंतु त्यात त्यांनी कधी मर्यादा सोडली नाही. विषयावर मुळापासून प्रेम असल्याने एका किश्शातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असा हा टारझन लीलया उड्या टाकत जायचा. ‘विसंगतीतून विनोद’ अशी विनोदाची व्याख्या आहे. पण ती विसंगती हेरायला लागणारी तीव्र निरीक्षणशक्ती, अफाट वाचन आणि बहुश्रुतता त्यांच्यापाशी होती. त्यातूनच त्यांची आगळीवेगळी ‘कणेकरी शैली’ निर्माण झाली. ‘आवडीच्या विषयांवर लिहित गेलो, वाचकांनीच मोठे केले’ असे ते नम्रपणे म्हणायचे. लता, दिलीपकुमार ही त्यांची दैवते होती. त्यांच्यावर बोलता, लिहिताना ते देहभान हरपायचे, भाबडे व्हायचे. लतावर त्यांनी ‘एक वेडा पीर लताला भेटतो’ असा प्रदीर्घ लेख लिहिला होता, जो माधव मनोहरांसारख्या समीक्षकास भावला. ‘यादोंकी बारात’मध्ये त्यांनी मीनाकुमारीपासून मुमताजपर्यंतच्या सिनेजगतातल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे लिहिली. तरी बरेच दिग्गज राहून गेले. मग आशा भोसलेंपासून मन्ना डेंपर्यंतच्या दिग्गजांवर ‘पुन्हा यादोंकी बारात’ लिहिले. नव्या कलावंतांवर दुसऱ्या कोणीतरी लिहावे व मी वाचावे असे वाटतेय असेही त्यात ते लिहून गेले. ‘फटकेबाजी’मध्ये कणेकर लिहितात, ‘क्रिकेट बघणे, त्यावर आसुसून बोलणे व झपाटून लिहिणे ही मला जडलेल्या क्रिकेटवेडाची लक्षणे. आता ती माझ्याबरोबरच जाणार. जाताना कुठे मॅच चालू असेल तर मी ताजा स्कोअर विचारूनच जाईन.’ नशीब, मॅच परवाच आटोपली!