यम-नियम अष्टांग योगाची मुळे

0
73
  • डॉ. मनाली महेश पवार

अष्टांग योगातील ‘यम व नियम’ हे आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी यांचे मूळ आहे. मुळे घट्ट असतील तरच हा डोलारा चांगला बहरणार. म्हणून योगासने, प्राणायाम, ध्यान करण्याअगोदर षड्रिपूंचा नाश करा.

आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात निरोगी, स्वस्थ जीवन जगणे मुश्कील झाले आहे. पूर्वी ऋतूबदलाने उत्पन्न होणारे काही आजार व वयोमानानुसार होणारे शरीर-मानस बदल व त्यातून उत्पन्न होणारे काही क्षुल्लक आजार, यापलीकडे गंभीर स्वरूपाचे आजार काही कुणाला होत नसत. पूर्वीची पिढी शारीरिक-मानसिकदृष्ट्या सुदृढ होती. आजचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. शारीरिक असंख्य तऱ्हेच्या व्याधी तर आहेतच, त्याचबरोबर मानसिक असंख्य आजारही मनुष्याला कमकुवत बनवत आहेत. शारीरिक आजारांतून मानसिक त्रास म्हणा किंवा मानसिक आजारांतून शारीरिक त्रास- बळी तर मनुष्यप्राणीच पडत आहे! शारीरिक आजार असो वा मानसिक- प्रत्येक वेळी गोळ्या-औषधांनी तो बरा होत नाही. कित्येक वेळा हे आजार योगसाधनेने बरे होतात. मग ही योगसाधना म्हणजे नक्की काय? फक्त योग, आसने, प्राणायाम म्हणजे योग का?

योग म्हणजे काय?
दर्शनशास्त्र या स्वरूपात योगशास्त्राची मांडणी प्रथम पतंजलिमुनींनी केली म्हणूनच योगाला ‘पातंजलयोग’ असे म्हणतात. आरंभीच्या काळात योगग्रंथाचा भर मोक्षप्राप्तीकडे आहे, म्हणूनच ऋषिमुनी याचा अवलंब, आचरण करीत. पण कालांतराने शरीर व मन योगाला अनुकूल असे तयार करण्याच्या दृष्टीने शिकवण व आचरणपद्धती सांगितली व आजच्या काळात तर या योगसाधनेची नितांत गरज आहे. म्हणूनच ही योगसाधना संपूर्ण विश्वाने स्वीकारली आहे.

  • योग म्हणजे ‘चित्तवृत्तिनिरोधः।’ मनात येणाऱ्या चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. मनात परस्परविरोधी अनेक वृत्ती (विचार) निर्माण होत असतात व त्यांना अडविणारी प्रक्रिया (विचार) ही मनातच निर्माण होत असते. ‘हे करा’ हे मन सांगते व ‘हे टाळा, थांबवा’ हेही मनच सांगते. म्हणजे मनात उठणाऱ्या या परस्परविरोधी वृत्तींच्या आहारी न जाता, त्याकडे त्रयस्थ बनून पाहण्याची कला म्हणजे निरोध होय. उदा. टीव्ही पाहता पाहता खाणे ही वृत्ती झाली. टीव्ही पाहता पाहता खाऊ नये हीदेखील वृत्ती झाली. पण टीव्ही पाहताना खात बसू नये हे मनाला वारंवार सांगत न बसता, विचार आल्यावर त्याच क्षणापासून आपण टीव्ही बंद करून शांत मांडी घालून जेवणे हा निरोध होय. यालाच योग म्हणतात. चित्तामध्ये (मनामध्ये) येणाऱ्या विचारांचा नाश करणे किंवा विरोध करणे म्हणजे योग असून त्यावर योग्य कृती करणे म्हणजे योग.
  • परस्पर विरुद्ध घटकांना सारखेपणाने सांभाळणे म्हणजे योग.
  • योग हा शरीर सहनन- धातुसौष्ठव मिळविण्याचा उपाय.
  • इंद्रियांना ताब्यात ठेवणे म्हणजे योग.
  • प्राण व अपान यांचे कार्य समस्थितीत राखणे म्हणजे योग.
    व्यायामाने फक्त मांस, सांधे, स्नायू यांची क्षमता सुधारते. पण माणसाच्या मज्जासंस्थेस, चेतासंस्थेस योग्य व्यायाम हा योगाद्वारेच होतो. माणसाच्या मनाला ताण-तणाव देणाऱ्या बाबी वाढत आहेत. त्यामुळे मांस, अस्थी यांच्यावरचा ताण पूर्वीपेक्षा कमी होऊन मज्जासंस्थेच्या क्षमतेचा वापर वाढला आहे म्हणून योगाचरण करावे.
    आज योग म्हटल्यावर योगाची तिसरी व चौथी पायरी म्हणजे आसन व प्राणायाम यांचाच विचार होतो. पण योग-अभ्यासाचा प्रारंभ हा आसन व प्राणायाम नसून यम व नियम आहे. या यम व नियमाकडे दुर्लक्ष करून योगाभ्यास सुरू केला तर त्याला अपेक्षित परिणाम कधीच मिळणार नाही. म्हणून योग-अभ्यासाचा अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी यम व नियमाचे निष्ठेने पालन करावे. प्रथमदर्शनी यम व नियम म्हणजे अटी किंवा बंधने आहेत असे वाटते. पण दैनंदिन जीवनात आपण काही स्वतः बंधने लादतो. आपल्या कर्मामुळे काही बंधने निर्माण होतात. यम आणि नियम यांचा अभ्यास म्हणजे अशा बंधनांपासून मुक्तता.
    पातंजल योगानुसार पाच यम व पाच नियम आहेत. सामान्य माणसाने समाजात कसे वागले पाहिजे याबद्दल यम मार्गदर्शन करतो, तर नियम वैयक्तिक वर्तनाबद्दल मार्गदर्शन करतो.
  • यम
    अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत.
  1. अहिंसा ः अहिंसा म्हणजे कोणाचीही हत्या न करणे हा एवढाच अर्थ योगशास्त्राला मान्य नाही. अहिंसा म्हणजे कोणालाच दुःख न देणे. अहिंसामध्ये शारीरिक, मानसिक, मौखिक अशा सर्व पैलूंचा समावेश होतो. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार जरी आला तरी अहिंसा ठरते. प्रत्यक्षात जरी दुसऱ्याला इजा केली नाही, मनात इजा करण्याचा विचार आला, दूषणे दिली, वेडेवाकडे बोललात, भांडण केले तरी ती हिंसाच होय.
    जो अहिंसेचे पालन करतो तो शत्रुत्वाच्या भावना दूर करण्यात यशस्वी होतो. म्हणजेच अहिंसेच्या दीर्घकाळ पालनाने योग अभ्यास करणारा स्वतःही शारीरिक, मानसिकदृष्ट्या आनंदी राहतो व त्याचा परिणाम परिसरावरही होतो.
  2. सत्य ः सत्य म्हणजे सतत खरे बोलणे, मग ते अगदी साधे का असेना! सत्य म्हणजे फक्त खरे बोलणे एवढेच नसून कुठलीही कृतीदेखील (आचरण) सत्यच हवे. उदा. बऱ्याच वेळा आपण आपल्याला एखाद्याशी बोलायचे नसेल तर मुलांना फोन घ्यायला लावतो व ‘घरी नाही, फोन विसरून गेले’ अशी उत्तरे द्यायला लावतो. कारण क्षुल्लक असते, आपल्याला बोलायचे नसते किंवा काहीही… हे म्हणजे काही मोठे पातक नसते, पण मुले बरोबर याचे अनुकरण करतात व शाळेत गेल्यावर ‘होमवर्क’ न करता ‘वही घरी विसरलो’ अशा प्रकारच्या सबबी देतात. यातही मोठे पातक नाही. पण योग्य वेळेला ‘सत्य’ याचा अर्थ जर समजला नाही तर प्रत्येक साध्या-साध्या गोष्टीला आपण असत्य बोलतो व ही सवय होऊन जाते. याचा परिणाम मनावर टांगती तलवार- सत्य कधी बाहेर पडले तर…? म्हणजेच मनावर ताण होय. देवाने आपल्याला जीभ सर्वांच्या हितासाठी दिली आहे; नाशासाठी नाही!
    सत्याचे सतत पालन केल्याने आणि त्याप्रमाणे वर्तन केल्याने वाचासिद्धीदेखील प्राप्त होते. आपल्या चांगल्या कर्माचे फळ सत्य बोलण्याने स्वतःला व इतरांनाही मिळते.
  3. अस्तेय ः अस्तेय म्हणजे चोरी न करणे. व्यापक अर्थाने स्वतःच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट स्वतःजवळ न ठेवणे. उदा. एखादी रस्त्यावर पडलेली वस्तू दिसली आणि आपण ती उचलायचा विचार केला किंवा आपण नाही उचलली तरी कोणीतरी उचलेलच या विचाराने आपण उचलतो. मग आपल्याला कुणी पाहिले असेल का? ते कुणाचे असेल? असे विविध प्रश्न व भीती आपल्या मनात उद्भवते. अशावेळी आपली सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला उचलण्यापासून परावृत्त करते. पण दुसऱ्याच क्षणी वाईट विवेक आपल्यावर हावी होतो व आपण वस्तू उचलतो. यात मग हृदयाचे ठोके वाढणे, भयभीत व्हायला होणे, मन अस्वस्थ होणे इत्यादी शारीरिक व मानसिक त्रास उद्भवतात. म्हणजे चोरीचा विचार मनात डोकावला तरी त्याचा परिणाम मनावर व त्याचप्रमाणे शरीरस्वास्थ्यावर होतो. पण जेव्हा साधक (योग-अभ्यासक) अस्तेय साधतो तेव्हा त्याला सर्व गुण प्राप्त होतात.
  4. ब्रह्मचर्य ः याचा व्यापक अर्थ म्हणजे ब्रह्माचे (ईश्वराचे) चिंतन करणे. चांगल्या गुणांचे-कर्मांचे आचरण होय. इच्छेचा नियंत्रित उपयोग, धर्म आणि विज्ञानाच्या मर्यादेत राहणे म्हणजे संयमाने वागणे. आपण आज अर्थ समजून त्यानुसार आचरण केले म्हणजे योग-अभ्यासात आपण सहज प्रगती करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, ईश्वराप्रमाणे आपले आचरण असावे व ईश्वराला स्मरून आपली कार्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर करावीत. उदा. ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे शास्त्र सांगते म्हणजे सकाळचा काळ हा सात्त्विक काळ. या काळात ईश-चिंतन, व्यायाम, स्वाध्याय करावा. म्हणजेच यालाही आपण ब्रह्मचर्य म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इच्छांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेदेखील ब्रह्मचर्य होय. इच्छा आपल्यावर राज्य करू लागल्या की आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. इच्छा पूर्ण न झाल्यास आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडते.
  5. अपरिग्रह ः कोणत्याच वस्तूंचा साठा करू नये. आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टींचा साठा करणे म्हणजे परिग्रह. उदा. आपल्याला तहान लागली असेल तर आपण एकच ग्लास पाणी पितो, तर तेवढेच पाणी आणावे. पूर्ण हंडा घेऊन पाणी आणणार नाही. कारण ते आणण्यासाठी लागणारे कष्ट, पाणी वायाच जाणार, तहान तर एका पाण्याच्या ग्लासातून भागते. तसेच इतर खाण्या-पिण्याचे, कपडेलत्ते, दागदागिने, घरे-दारे, जमिनी इत्यादी भौतिक सुखे… या सगळ्यांचा साठा कधीच करून ठेवू नये. जेवढे पाहिजे तेवढेच घ्यावे. आवश्यक नसलेल्या गोष्टींच्या मागे धावू नये. योग-अभ्यास करणाऱ्याने प्रयत्नपूर्वक टाळावे. वस्तुभंडार, त्याचप्रमाणे ज्ञानभंडाराचादेखील साठा करून ठेवू नये. ‘दिल्याने वाढते’ हे नेहमी ध्यानात ठेवावे.
    जो संपूर्णपणे अपरिग्रह शिकतो आणि त्याचे पालन करतो त्याला भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान प्राप्त होते असे शास्त्रात लिखित आहे. योग-अभ्यास करणाऱ्यांनी म्हणा किंवा सर्वांनीच देश उन्नतीसाठी या पाचही ‘यम’ साधनेचे आचरण करावे.
  • नियम ः हा स्वतःचे निरीक्षण करून स्वतःबद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा. नियम हे पाच प्रकारचे आहेत. सौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान.
  1. सौच ः सौच म्हणजे शुद्धता, स्वच्छता. स्वतःची व बाह्य वातावरणाची. दिनचर्येचे पालन करून हात-पाय धुणे, स्नान करणे, पंचकर्मे करणे, व्यायाम इत्यादीने आपले शरीर-मन स्वच्छ-शुद्ध करणे. त्याचबरोबर बाहेर कचरा न फेकणे, प्लास्टिकचा वापर न करणे, नद्या स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर न थुंकणे, घर व घराच्या आजूबाजूचा परिसर, रस्ते, नद्या, समुद्रकिनारे, किल्ले इत्यादी स्वच्छ ठेवणे, याने स्वतःचे व इतरांचे आरोग्य टिकून राहील.
  2. संतोष ः संतोष म्हणजे समाधान. ज्याने आपल्यामध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास मिळतो, आयुष्याला स्थैर्य प्राप्त होते. आपली हाव, लालसा कमी होते, गरजा कमी होतात. आपण मृगजळामागे धावणे थांबवतो. याने आपल्या जीवनात प्रेम व आनंद टिकून राहतो.
  3. तापस ः हा स्वयंशिस्तीचा आणि हिम्मतीचा सराव आहे. योगासने करायची झाली तर त्याला एका जागी स्थिरता असण्याची गरज असते. खूप वेळा बसता आले पाहिजे, एकाग्रतेची गरज असते, या सगळ्याची पूर्वतयारी म्हणजे तप.
  4. स्वाध्याय ः स्वाध्याय म्हणजे सतत स्वतःचा अभ्यास करणे, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न. यामध्ये आपल्याला आपले गुण-दोष समजतात. आपणासाठी कोणती कृती योग्य-अयोग्य याची जाणीव होते. चांगल्या विचारांचे सतत मनन-चिंतन होते व त्यातून सकारात्मक कृती घडते.
  5. ईश्वरप्रणिधान ः एकनिष्ठता व ईश्वराला शरण जाणे. म्हणजे आपल्यातील षड्रिपूंचा नाश करणे. अहंकेंद्री स्वभाव विरघळून टाकणे. फक्त स्वतःपुरती विचार न करता मनामध्ये निःस्वार्थ भाव, दया, प्रेम, आदर, एकजुटीपणा इत्यादी गुणांचा उत्कर्ष करणे.

हे पाचही नियम स्वतःला घालून घेतले व पाचही यमाचे पालन केले तरच आपण पुढची पायरी म्हणजे आसनांचा व प्राणायामचा सराव करू शकतो व त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला होऊ शकतात. अष्टांग योगातील ‘यम व नियम’ हे आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी यांचे मूळ आहे. मुळे घट्ट असतील तरच हा डोलारा चांगला बहरणार. म्हणून योगासने, प्राणायाम, ध्यान करण्याअगोदर षड्रिपूंचा नाश करा. स्वतःला काही नियम घाला व त्यांचे पालन करा. त्याचप्रमाणे समाजाप्रति, राष्ट्राप्रति आपले देणे आहे ही भावना कायम तेवत ठेवा.