>> पाकिस्तानच्या विजयात हफीझ, सर्फराज, वहाबची चमक
पाकिस्तानने काल सोमवारी यजमान इंग्लंडचा १४ धावांनी पराभव करत यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करत ३४८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडचा डाव ९ बाद ३३४ धावांत रोखला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला ठराविक अंतराने धक्के बसत राहिले. २२व्या षटकांत त्यांची ४ बाद ११८ अशी नाजुक स्थिती झाली होती. माजी कर्णधार ज्यो रुट व जोस बटलर यांनी पाचव्या गड्यासाठी १३० धावांची भागीदारी करत इंग्लंडला २४८ धावांपर्यंत पोहोचविले. शादाबने रुटला बाद करत ही जोडी फोडली. रुटने आपले पंधरावे वनडेशतक ठोकताना १०४ चेंडूंत १०७ धावा झळकावल्या. रुट परतल्यानंतर बटलरने हार मानली नाही. त्याने केवळ ७६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०३ धावा जमवल्या. परंतु, मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्याने इंंग्लंडचा पराभव निश्चित झाला. इंग्लंडच्या शेपटाने प्रतिकार केला. परंतु, पराभवाचे अंतर कमी करण्यापलीकडे त्यांना अजून काही करता आले नाही.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने ३४८ धावांचा डोंगर उभारला. पाकने विंडीजविरुद्ध दारुण पराभव स्वीकारलेल्या संघात दोन बदल करताना हारिस सोहेल व इमाद वासिम यांना वगळताना शोएब मलिक व आसिफ अली यांचा संघात समावेश केला. तर इंग्लंडने लियाम प्लंकेटच्या वैविध्यतेला बगल देत मार्क वूडच्या वेगाला प्राधान्य दिले.
पाकिस्तानकडून खेळताना इमाम उल हक आणि फखर झमान यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यांनी ८२ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर झमान बाद झाला. त्याने ३६ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. मोईन अलीने त्याचा काटा काढला. यष्टीरक्षक बटलर याने त्याला चपळाईने यष्टिचीत केले. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम उल हक याने दमदार फलंदाजी करत ५८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ४४ धावा केल्या होत्या. फिरकीपटू मोईन अली याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचून षटकार लगावण्याच्या नादात इमाम बाद झाला. वोक्सने धावत जाऊन त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर आलेल्या बाबर आझमने अर्धशतक झळकावले. त्याने ६६ चेंडूत ६३ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. पाठोपाठ मोहम्मद हफीझनेही इतर फलंदाजांच्या साथीने चांगली खेळी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून दिली. जेसन रॉय याने वैयक्तिक १४ धावांवर दिलेल्या जीवदानाचा हफीझने पुरेपूर लाभ उठवला. कर्णधार सर्फराज अहमदने ५५ धावांची खेळी केली.
आपल्या सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला हरविल्यामुळे इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, पाकिस्तानविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंडला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे.
धावफलक
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. वोक्स गो. अली ४४, फखर झमान यष्टिचीत बटलर गो. अली ३६, बाबर आझम झे. वोक्स गो. अली ६३, मोहम्मद हफीझ झे. वोक्स गो. वूड ८४, सर्फराज अहमद झे. व गो. वोक्स ५५, आसिफ अली झे. बॅअरस्टोव गो. वूड १४, शोएब मलिक झे. मॉर्गन गो. वोक्स ८, वहाब रियाझ झे. रुट गो. वोक्स ४, हसन अली नाबाद १०, शादाब खान नाबाद १०, अवांतर २०, एकूण ५० षटकांत ८ बाद ३४८
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ८-१-७३-३, जोफ्रा आर्चर १०-०-७९-०, मोईन अली १०-०-५०-३, मार्क वूड १०-०-५३-२, बेन स्टोक्स ७-०-४३-०, आदिल रशीद ५-०-४३-०
इंग्लंड ः जेसन रॉय पायचीत गो. शादाब ८, जॉनी बॅअरस्टोव झे. सर्फराज गो. वहाब ३२, ज्यो रुट झे. हफीझ गो. शादाब १०७, ऑईन मॉर्गन त्रि. गो. हफीझ ९, बेन स्टोक्स झे. सर्फराझ गो. मलिका १३, जोस बटलर झे. वहाब गो. आमिर १०३, मोईन अली झे. झमान गो. वहाब १९, ख्रिस वोक्स झे. सर्फराज गो. वहाब २१, जोफ्रा आर्चर झे. वहाब गो. आमिर १, आदिल रशीद नाबाद ३, मार्क वूड नाबाद १०, अवांतर ८, एकूण ५० षटकांत ९ बाद ३३४
गोलंदाजी ः शादाब खान १०-०-६३-२, मोहम्मद आमिर १०-०-६७-२, वहाब रियाझ १०-०-८२-३, हसन अली १०-०-६६-०, मोहम्मद हफीझ ७-०-४३-१, शोएब मलिक ३-०-१०-१