यजमान इंग्लंडचा मालिका विजय

0
136

>> तिसर्‍या कसोटीत विंडीजवर २६९ धावांनी मात

यजमान इंग्लंडने तिसर्‍या व शेवटच्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा २६९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची ‘विस्डेन’ मालिका २-१ अशी जिंकली. विंडीजने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने उर्वरित दोन्ही कसोटी एकतर्फी जिंकल्या. तिसर्‍या सामन्यात ६७ धावा देत १० गडी बाद केलेला स्टुअर्ट ब्रॉड सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

इंग्लंडने विजयासाठी समोर ठेवलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसअखेर वेस्ट इंडीजची २ बाद १० अशी दयनीय स्थिती झाली होती. सलामीवीर जॉन कॅम्पबेल (०) व नाईट वॉचमन किमार रोच (४) माघारी परतले होते. यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ झाला नाही. संपूर्ण एक दिवस वाया गेल्याने वेस्ट इंडीजला सामना अनिर्णीत राखण्याची नामी संधी होती. परंतु, त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर नांगर टाकून खेळण्यास अपयशी ठरले. पाचव्या दिवशी ब्रेथवेट व शेय होप यांनी सावध खेळ केला. होपने काही आक्रमक फटके खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला तर ब्रेथवेटने आपल्या नेहमीच्या शैलीत बचावाला प्राधान्य दिले. ब्रॉडने ब्रेथवेटला पायचीच करत ही जोडी फोडली. ब्रॉडचा हा ५०० वा कसोटी बळी ठरला. ब्रॉडचा सहकारी गोलंदाज अँडरसन याचादेखील ब्रेथवेट पाचशेवा बळी होता. पहिल्या दोन्ही कसोटींत सपशेल अपयशी ठरलेल्या शेय होप याच्या खांद्यावर संघाचा कोसळता डोलारा सावरण्याची जबाबदारी येऊन पडली. परंतु, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर वोक्सच्या एका उसळत्या चेंडूवर ‘पूल’चा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.

ब्रॉडने मिडऑनवरून धावत येत होपचा सोपा झेल घेतला. होपने ३८ चेंडूंत ६ चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. होप परतला त्यावेळी फलकावर केवळ ७१ धावा लागल्या होत्या. नवोदित शमार ब्रूक्सने २२ धावा केल्या. वोक्सच्या झपकन आत आलेल्या चेंडूवर यष्टिरक्षक जोस बटलरकरवी तो झेलबाद झाला. वेस्ट इंडीजचा दुसर्‍या डावातील स्पेशलिस्ट रॉस्टन चेज याला ब्लॅकवूडचा चोरटी धाव घेण्याची हाव महागात पडली. चेंडू ‘कव्हर पॉइंट’च्या दिशेने हलकेच ढकलून एकेरी धाव घेण्याच्या ब्लॅकवूडच्या प्रयत्नामुळे डॉम बेसच्या थेट फेकीवर चेज धावबाद झाला.

‘बॅकवर्ड पॉइंट’वरून धावत येत बेसने यष्ट्यांचा वेध घेतला. ब्लॅकवूडने २३ तर होल्डरने १२ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडीजचा दुसरा डाव ३७.१ षटकांत १२९ धावांत संपला. इंग्लंडकडून दुसर्‍या डावात स्टुअर्ट ब्रॉडने ८.१ षटकांत ३६ धावा मोजून ४ गडी बाद केले. ख्रिस वोक्सने ५० धावांत ५ बळी घेतले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३६९ धावांना उत्तर देताना वेस्ट इंडीजचा पहिला डाव १९७ धावांत आटोपला होता. इंग्लंडने आपला दुसरा डाव २ बाद २२६ धावांवर घोषित करत विंडीजसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने या विजयासह आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ४० मौल्यवान गुणांची कमाई केली.