पर्यटन खात्याला अपेक्षा : देशभरात प्रचार
यंदाच्या वर्षी सुमारे ४० लाख पर्यटक गोव्याला भेट देतील अशी अपेक्षा राज्याच्या पर्यटन खात्याला आहे. हा आकडा गेल्या वर्षी भेट दिलेल्या पर्यटकांपेक्षा १५ टक्के जास्त आहे.
गेल्या वर्षी सुमारे ३१.३० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा त्यात १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्याने पर्यटनाच्या प्रसारासाठी विशेष पुढाकार घेतला असून कार्निव्हल, शिगमो, वारसा महोत्सव आदी स्थानिक सोहळ्यांसाठी पर्यटक आकर्षित होत आहेत. शिवाय आता गोवा हे विवाह सोहळ्यांचे केंद्र बनत चालले आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखील देसाई यांनी दिल्लीत बोलताना दिली.
शिवाय यंदा दहा वर्षांतून एकदा होणारा सेंट फ्रांसिस झेवियर शव दर्शन सोहळा २२ नोव्हेंबर ते ४ जानेवारी या काळात होत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येचे लक्ष्य गोवा नक्की गाठणार असेही देसाई म्हणाले.
गोव्याला उत्सवांचे पर्यटन स्थळ तसेच लग्न समारंभांसाठीचे, साहसी पर्यटनाचे, विशिष्ट कार्यक्रम आयोजित करण्यासाठीचे तसेच सुट्टीसाठीचे पर्यटन स्थळ बनविण्याकरिता गोवा पर्यटन खाते नियोजनबद्धरित्या प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणार्या काळात गोवा हे पूर्ण वर्ष पर्यटन मोसमाचे स्थळ बनेल, असे पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले. गोव्याचे अनेक उत्सव देशभरात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. त्यात कार्निव्हल, शिगमो, गोवा वारसा महोत्सव, सांजाव, फ्लॅग फेस्टिव्हल, वाईन महोसव यांचा समावेश आहे. शिवाय गोव्यात येऊन लग्नसमारंभ आयोजित करण्याकडेही वाढता कल असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात पर्यटनाला वाव देण्यासाठी गोव्यात मरिना प्रकल्प, थीम पार्क, कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या उत्पन्नात पर्यटनाचा १८ टक्के वाटा असल्याचे ते म्हणाले.